कारवाई टाळण्यासाठी सोमय्या पिता-पुत्र गुजरातमध्ये?

74

आयएनएस विक्रांत ही युद्धनौका वाचविण्यासाठी किरीट सोमय्या यांनी मुलगा नील आणि इतर कार्यकर्त्यांसह २०१३-१४मध्ये मुंबईत सहाय्य निधी जमा केला होता. जमा झालेला निधी राज्यपाल सचिव कार्यालयात जमा न करता त्याचा अपहार केला असल्याच्या आरोपावरून एका माजी सैनिकाने ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गून्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी चौकशीला बोलावल्यापासून सोमय्या पिता-पुत्र गायब आहेत. ते कारवाई टाळण्यासाठी गुजरातला गेले असल्याचे सांगितले जात आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनीही किरीट सोमय्या गुजरातला जाऊन लपले असल्याचा आरोप केला आहे.

अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज

ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात फसवणूक, अपहार केल्याप्रकरणी किरीट आणि नील सोमय्या या पिता-पुत्रांवर गुरुवारी गुन्हा दाखल झाला आहे. ट्रॉम्बे पोलिसांनी पिता-पुत्राला समन्स पाठवून शनिवारी चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हजर होण्यास सांगितले होते, मात्र दोघेही चौकशीला गैरहजर राहिले. त्यांच्या वकीलांनी पोलीस ठाण्यात येऊन किरीट सोमय्या हे पूर्वीच ठरल्याप्रमाणे दिल्लीला गेले असून ते हजर राहू शकत नाहीत असे पत्र पोलिसांना देऊन वेळ मागून घेतला होता. दरम्यान या प्रकरणात अटक टाळण्यासाठी किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांचे वकील यांनी अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता.

( हेही वाचा : कोरोना गेला आणि संपही मिटला, एसटी पूर्वीप्रमाणे धावणार! )

गुजरातमध्ये असल्याची माहिती

सोमवारी किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन सत्र न्यायालयाने नाकारला असून नील यांच्या जामिनावर मंगळवारी सुनावणी होणार असल्याचे समजते. हे प्रकरण ट्रॉम्बे पोलीस ठाण्याकडून काढून आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले आहे, आर्थिक गुन्हे शाखेकडून किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता ते नॉट रीचेबल असल्याचे समजते. मात्र काही माध्यमांनी किरीट सोमय्या हे गुजरात राज्यात असल्याचे म्हटले आहे. किरीट सोमय्या हे दिल्लीहून मुंबईत न येता ते गुजरातमध्ये गेले व ते गुजरातमध्ये असल्याचे वृत्त माध्यमातून समोर आले आहे. याबाबत आर्थिक गुन्हे शाखेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोमय्या पिता-पुत्राचा शोध घेण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत, यासाठी एक पथक देखील गठीत करण्यात आले आहे, मात्र त्यांचा थांगपत्ता कुठेही लागलेला नाही. किरीट सोमय्या हे गुजरातमध्ये असल्याची माहिती माध्यमातून आम्हाला समजली असून त्यांचा शोध घेतला जात असल्याचे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.