अ‍ॅड. जयश्री पाटील यांच्या विरोधातही गुन्हा दाखल

109
संपकरी एसटी कामगारांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला केल्यानंतर अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांना पोलिसांनी अटक केली. त्यानंतर आता सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील यांच्यावरही अकोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसटी कर्मचाऱ्यांना भूलथापा देत पैसे गोळा करणे या आरोपाखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसटी कामगार सेनेच्या कार्याध्यक्षांनी अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते, त्यांच्या पत्नी अ‍ॅड. जयश्री पाटील आणि अजयकुमार बहादूरसिंग गुजर यांच्याविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे.

१ कोटी ८० लाख जमा केले 

महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष विजय मालोकार यांनी ही तक्रार दाखल केली आहे. एसटीच्या संपकरी कामगारांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानावर हल्ला केल्यानंतर या कामगारांचे नेतृत्व करणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली. त्यानंतर पोलीस सदावर्ते यांची चौकशी करत आहेत. त्यामध्ये सदावर्ते यांनी एसटी कामगारांकडून १ कोटी ८० लाख रुपये घेतले, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या पाच महिन्यांपासून विविध मागण्यांसाठी एसटीचे संपकरी कामगार मुंबईतील आझाद मैदानात ठाण मांडून आहेत. या काळात गुणरत्न सदावर्ते यांनी प्रत्येक एसटी कर्मचाऱ्यांकडून ५३० रुपयांप्रमाणे १.८० कोटी रुपये गोळा केले, तशी माहिती सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सत्र न्यायालयात दिली. आता या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी  जयश्री पाटील यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.