उत्तर प्रदेश सरकारने यूपी बोर्ड आणि सीबीएसई बोर्डाच्या अभ्यासक्रमात मोठे बदल केले आहेत. २०२३-२४ या शैक्षणिक सत्रात इयत्ता १२वी मध्ये शिकवल्या जाणाऱ्या इतिहासाच्या पुस्तकातून मुघलांचा धडा काढून टाकण्यात आला आहे. इयत्ता ११ वीच्या अभ्यासक्रमात बदल करून इस्लामचा उदय, औद्योगिक क्रांती, संस्कृतींचा संघर्ष आणि काळाची सुरुवात हे प्रकरणही इतिहासाच्या पुस्तकातून काढून टाकण्यात आले आहे. शालेय अभ्यासक्रमात परकीय आक्रमकांची भलावण करणारे धडे मागील ७० वर्षांत शिकवले गेले. पण या आक्रमकांना थोपवण्याचे शौर्य हिंदुस्थानातील शूर राजा-महाराजांनी दाखवले आहे. त्यांचे शौर्य वाचून भारतातील पिढ्या घडतील. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याची सुरुवात केली, हे कौतुकास्पद आहे. पण राष्ट्रीय पातळीवर यात अमुलाग्र बदल घडवला पाहिजे. त्यासाठी केंद्रीय शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमातील पुस्तकांची पुनर्रचना करावी लागणार आहे, इतका तो खटकणारा आहे.
शालेय अभ्यासक्रमात इतिहास हा विषय असा असतो की, या विषयाचा त्यांना पुढील जीवनातील तंत्रज्ञान, वैद्यक, अशा अनेक शाखांमध्ये काहीही उपयोग नसतो. तरीही हा विषय सर्वच विद्यार्थ्यांना सक्तीचा असतो. याचे कारण म्हणजे, या इतिहासामुळे त्यांना पुढील जीवनभर प्रेरणा मिळत असते आणि या प्रेरणेतून भारावलेले पुन्हा इतिहास रचता येईल, असे कार्य करत असतात. छत्रपती शिवरायांना जिजामातांनी भगवान राम आणि कृष्ण यांचा इतिहास सांगितल्याने, त्यांनी प्रेरणा घेऊन पाच मोगल पातशाह्यांना नमवत हिंदवी स्वराज्याची स्थापना करत दैदिप्यमान इतिहास रचला. असेच महाराणा प्रताप, पृथ्वीराज चौहान, राणी चेन्नम्मा, झाशीची राणी लक्ष्मीबाई, बाजीराव पेशवे, बाप्पा रावल, लचित बरफुकन आदी अनेक हिंदु पराक्रमी आणि शूरवीर यांचा दैदिप्यमान इतिहास आहे; मात्र मागच्या काही दशकांमध्ये राष्ट्रीय स्तरावर अभ्यासक्रम निश्चित करणाऱ्या ‘एन.सी.ई.आर.टी.’ म्हणजे, ‘राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण मंडळा’ने पुढच्या पिढीला भारतीय इतिहासाची सविस्तर जाण होणार नाही, अशी इतिहासाच्या अभ्यासक्रमाची रचना केल्याचे दिसून येत आहे.
एन.सी.ई.आर.टी.चा अभ्यासक्रम कायमच वादग्रस्त ठरला आहे. कधी त्यातून भगतसिंग, चंद्रशेखर आझाद आदी क्रांतीकारकांना ‘दहशतवादी’ संबोधून त्यांचा अपमान केला गेला, तर कधी भारताच्या मूळ परंपरांचा, जगातील सर्वांत प्राचीन हिंदु संस्कृतीचा विकृत इतिहास मांडला गेला. जगातील कोणत्याही देशात आक्रमकांचा इतिहास गौरवपूर्ण करून त्यांच्याशी लढा देणाऱ्या स्वकीय योद्ध्यांचा इतिहास दाबून टाकण्याचे कुकृत्य केले जात नसेल! लक्षावधी ‘ज्यूं’ना ठार मारणाऱ्या ‘हिटलर’चा इतिहास इस्रायलमध्ये शिकवला जाऊ शकेल का? मात्र आपल्या देशात परकीय आक्रमकांचा इतिहास मोठ्या प्रमाणात शिकवून त्यांचे उदात्तीकरण केले जात आहे. हा या देशातील राष्ट्रपुरुषांचा अपमान आहे. यामुळे अभ्यासक्रम निश्चित करणारे समिती कोणासाठी काम करते, हा संशोधनाचा विषय आहे.
(हेही वाचा खलिस्तानी अमृतपाल सिंग पोलिसांच्या ताब्यात)
‘इयत्ता ७ वी’च्या इतिहासाच्या ‘हमारे अतीत’ या पाठ्यपुस्तकातील आक्षेपार्ह मुद्दे
या पुस्तकातील १५४ पृष्ठांपैकी बहुतांश पृष्ठे हिंदुस्थानावर आक्रमण करून हिंदूंना पारतंत्र्यात ढकलणाऱ्या, त्यांच्यावर अनन्वित अत्याचार करणाऱ्या मोगल आक्रमकांच्या ऐतिहासिक माहितीसाठी खर्ची घातली आहेत, तर ज्या छत्रपती शिवरायांनी मोगलांशी लढा देऊन ‘हिंदवी स्वराज्या’ची स्थापना केली, त्यांचा संपूर्ण इतिहास केवळ ६ ओळींतच मांडण्यात आला आहे. तसेच या पुस्तकात अकबरासह प्राणपणाने लढा देणारे महाराणा प्रताप आणि अन्य पराक्रमी राष्ट्रपुरुष यांच्या नावाचाही उल्लेख करण्यात आलेला नाही.
या पुस्तकातील धडा ३. ‘दिल्लीचे सुलतान’ यातील १५ पृष्ठांत दिल्ली येथील सुलतान, सुलतानीचा विस्तार, अल्लाउद्दीन खिलजी, मुहम्मद तुघलक यांच्या वंशावळीची माहिती देण्यात आली आहे. तसेच धडा ४. ‘मोगल साम्राज्य’ यात १५ पृष्ठे खर्ची घालून त्यात मोगलांची फौज, त्यातही पुढे बाबर, अकबर, हुमायुन, जहांगीर, औरंगजेब आदी मोगल राजांची चित्रांसह माहिती देण्यात आली आहे. धडा ५. ‘शासक आणि इमारती’ यात कुतुबमिनार, दिल्लीची कुव्वत अल-इस्लाम मस्जिद, मक्का, हुमायूनचा मकबरा, दिल्ली येथील ‘दिवाण-ए-आम’चे सिंहासन आणि ताजमहाल यांची माहिती देण्यात आली आहे. जणू भारत हा इस्लामी देश आहे, असेच चित्र यातून उभे केले गेले.
या पुस्तकातील ‘धडा १०. ‘अठराव्या शतकातील राजनैतिक गठन’ यात 17 व्या शतकातील मोगल साम्राज्याची सीमा, नादिरशहाचे आक्रमण, हैद्राबादचा निजाम, बंगालचा अलीवर्दी खान यांच्या माहितीसाठी बहुतांश पृष्ठे दिली आहेत; तर राजपूत, शीख, मराठा आणि जाट या हिंदुस्थानी राजेशाह्यांसाठी केवळ ६ पृष्ठे देण्यात आली आहेत. हा जाणीवपूर्वक भेद करण्यात आला आहे.
(हेही वाचा कोल्हापुरात लव्ह जिहाद! वातावरण तणावग्रस्त, हिंदुत्वादी संघटना उतरल्या रस्त्यावर)
8 वीच्या ‘सोशल सायन्स’च्या ‘अवर पास्ट’ (पार्ट III) पुस्तकातील आक्षेपार्ह सूत्रे
- ‘सोशल सायन्स’च्या ‘अवर पास्ट (III) पार्ट -1’ या इंग्रजी पुस्तकात जेम्स रेनेल यांनी वर्ष १७८२ मध्ये काढलेले चित्र प्रसिद्ध केले आहे. त्यात भारतीय ब्राह्मण ब्रिटानियाला धर्मग्रंथ देताना दाखवले आहेत. यात पुढे म्हटले आहे की, भारतीयांनी ब्रिटानियाला प्राचीन ग्रंथ स्वेच्छेने दिले आहेत. ब्रिटिशांच्या वर्चस्वाचे हे प्रतिक असल्याचे दाखवत जणू भारतीय संस्कृतीचे रक्षक होण्यास तिला सांगत आहेत. अशा प्रकारे ब्रिटिशांचे उदात्तिकरण करून भारतीय विद्वानांना कमी लेखण्यात आले आहे.
- ‘सोशल सायन्स’च्या ‘अवर पास्ट (III) पार्ट -2’ या इंग्रजी पुस्तकात हनुमान आणि जाम्बुवंत यांच्यातील लढाईचे चित्र छापले आहे. यामध्ये हनुमंताने पादत्राणे परिधान केली असल्याचे दाखवले आहे. तसेच चित्रकाराने पारंपरिक घटनांना आधुनिक करण्याच्या नावाखाली हनुमानाच्या पायांमध्ये स्लीपर असल्याचे दाखवले असल्याचे म्हटले आहे. यातून देवतांना चुकीच्या पद्धतीने दाखवून त्यांचे विडंबन केले आहे, तसेच अशा प्रकारे विद्यार्थ्यांना रेखाटण्यासाठी प्रवृत्त करण्यात येत आहे.
इयत्ता १० वीच्या पाठ्यपुस्तकातील आक्षेपार्ह मुद्दे
‘इयत्ता १० वी’च्या पुस्तकात ‘हिस्ट्री ॲन्ड सिव्हिक्स’ या पुस्तकातील ‘रिव्हिव्हल ऑफ टेरॉरिझम’ या धड्यात थोर क्रांतीकारक भगतसिंग, राजगुरु, सुखदेव, लाला लजपतराय, खुदीराम बोस आणि रासबिहारी बोस यांना ‘दहशतवादी’ म्हणून संबोधले आहे. त्यांच्या कारवायांना थेट ‘दहशतवादी कारवाया’ म्हणून संबोधण्यात आले आहे. अशा प्रकारची माहिती अन्य कुठे आहे का, ते पहायला हवे.
इयत्ता १० वीच्या ‘भारत आणि समकालिन जग -२’ या पाठ्यपुस्तकात
- पृष्ठ ७० वर – लोकमान्य टिळक यांचे छायाचित्र देऊन त्यांच्या शेजारी दिलेल्या चौकटीत ‘टिळकांच्या सभोवती असणाऱ्या एकतेच्या प्रतिकांची नोंद घ्या. विविध धर्मांची पवित्र धार्मिक स्थळे (उदा. मंदिर, चर्च, मशिद) यांनी वेढलेली आकृती’ असे सांगण्यात आले आहे. यात मशीद म्हटलेली आकृती ‘ताजमहाल’ची आहे. तसेच या पुस्तकात लोकमान्य टिळक यांच्याविषयी एका ओळीचीही माहिती दिलेली नाही. लोकमान्य टिळक यांचा स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाचा वाटा असतांना त्यांचा इतिहासच वगळला आहे.
- पृष्ठ ७१-७२ वर : भारतमातेची दोन चित्रे दाखवून ‘सर्व जाती-धर्मांना ही चित्रे आवाहन करू शकतील, असे तुम्हाला वाटते का ?’, असा विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम निर्माण करणारा आक्षेपार्ह प्रश्न विचारण्यात आला आहे.
- पृष्ठ ४४ वर : छायाचित्रात फ्रेंच कमांडर जनरल हेन्री नवार्रे यांना धूम्रपान करतांना दाखवले आहे. केंद्र सरकारने धूम्रपानाच्या विरोधात कडक भूमिका घेतलेली असतांना, अशी चित्रे पाठ्यपुस्तकांमध्ये छापून विद्यार्थ्यांना धुम्रपानाला प्रवृत्त केले जात आहे. यामुळे पाठ्यपुस्तकांच्या माध्यमांतून विद्यार्थ्यांच्या मनावर कुसंस्कारच होतील.
प्रेरणादायी इतिहास राष्ट्रीय स्तरावर शिकवावा !
- देशभरात सुमारे १३.३३ टक्के विद्यालयांतून गेल्या काही दशकांपासून एन.सी.ई.आर.टी.चा अभ्यासक्रम शिकवला जात आहे. याद्वारे लाखो विद्यार्थ्यांवर चुकीचा इतिहास बिंबवला जात आहे. त्यामुळे एन.सी.ई.आर.टी.च्या पाठ्यपुस्तकांतील इतिहासाचे विकृतीकरण करणारा, परकीय आक्रमकांचा उदोउदो करणारा, खोटा, संदर्भहीन, जातीय तेढ निर्माण करणारा, कुसंस्कार करणारा मजकूर त्वरीत बदलण्यात यावा.
- एन.सी.ई.आर.टी.च्या काही पाठ्यपुस्तकांतील लक्षात आलेली ही सूत्रे येथे दिली आहेत. अन्य पुस्तके अभ्यासल्यास त्यातही असे आक्षेपार्ह आणि चुकीचे संदर्भ सापडू शकतील. त्यामुळे सर्वच पुस्तकांचा या दृष्टीने अभ्यास करून सर्व चुकीची माहिती काढून टाकण्याची गरज आहे.
- याठिकाणी हिंदुस्थानचा सत्य इतिहास, संदर्भासहित शिकवला जावा. यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये शौर्य जागरण करणारा, स्वाभिमान निर्माण करणारा, देशभक्तीची भावना निर्माण करणारा इतिहास शिकवला जावा.
- भारतीय इतिहास योग्य पद्धतीने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणाऱ्या इतिहास अभ्यासकांचा समावेश अभ्यासक्रम निश्चित करणाऱ्या मंडळात करावा.
हिंदु राष्ट्रपुरुषांचा इतिहास हा सध्या प्रांतनिहाय त्या-त्या राज्यांत शिकवला जातो; मात्र त्यांनी केलेले कार्य हे एका राज्यापुरते मर्यादित नसून देशभरात शिकवण्यासारखे आहे. विदेशांत सैनिकी शिक्षण देतांना जगातील १० महत्त्वाच्या लढाया शिकवतांना त्यात छत्रपती शिवरायांनी अफझलखानाचा केलेला वध आणि थोरले बाजीराव पेशवे यांच्या लढाया शिकवल्या जातात; मात्र दुर्दैवाने छत्रपती शिवाजी महाराज हे देशभरात नव्हे, तर महाराष्ट्रातच शिकवले जातात. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनंतर त्यांचे सुपुत्र छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्याचा विस्तार पाचपट केला होता. मोघलांमध्ये इतकी दहशत निर्माण केली की, औरंगजेबाला दिल्लीचे तख्त सोडून मराठ्यांशी लढण्यासाठी महाराष्ट्रात यावे लागले.
छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतरही मराठ्यांनी २७ वर्षे औरंगजेबाला महाराष्ट्र जिंकू दिला नाही. यानंतर पहिल्या बाजीराव पेशव्यांनी हिंदु साम्राज्याचा विस्तार अफगाणिस्तानातील अटकेपर्यंत केला. औरंगजेबाने छत्रपती शिवरायांचे सिंहासन फोडले, त्याचा सूड मराठ्यांनी दिल्लीचे तख्त (राज सिंहासन) घनाचे घाव घालून फोडले होते. असा प्रेरणादायी इतिहास राष्ट्रीय स्तरावर शिकवला गेला पाहिजे. तसेच महाराणा हमीरसिंग, महाराणा कुंभा, बाप्पा रावल, महाराणा सांगा आदींचा इतिहासही त्या-त्या प्रांतात काही अंशी शिकवला जातो. तरी असे सर्व हिंदु राजे, योद्ध्ये, राष्ट्रपुरुष यांचा इतिहास हा राष्ट्रीय स्तरावर शिकवण्यात यावा.
कोणत्याही मोघल आक्रमकाची पूर्ण सत्ता कधीही भारतात नव्हती. मोघल आक्रमक अनेक हिंदू राजांशी संधान साधून देशातील केवळ काही भागांवर शासन करत होते. त्यांच्यासाठी ‘साम्राज्य’सारखा शब्द वापरणे हा एक विनोद आहे. साम्राज्य शिकवायचे तर मगध साम्राज्य, चोला साम्राज्य, चेरा साम्राज्य, पांड्येन साम्राज्य, हिंदवी स्वराज्य आदी साम्राज्यांविषयी विद्यार्थ्यांना शिकवले पाहिजे.
(लेखक – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता हिंदू जनजागृती समिती)
Join Our WhatsApp Community