खारघरमधील एका कार्यक्रमात १३ जणांचा मृत्यू झाला. मुंबई पोलीस भरतीसाठी मैदानी चाचण्या सुरु आहेत, त्यामध्ये आतापर्यंत ४ उमेदवारांचा मृत्यू झाला आहे. थोडक्यात काय तर राज्यात वाढत्या तापमानाचे बळी जाणाऱ्यांची संख्या वाढत आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये उष्णतेने आपला विक्रम मोडीत काढला आहे. उन्हामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. देशातील अनेक भागात पारा ४५ अंशांवर पोहोचला असून उष्माघातापासून वाचण्यासाठी लोक अनेक मार्गांचा अवलंब करत आहेत. बऱ्याच जणांना खरोखरच उष्माघाताबद्दल नीट माहिती नसते. त्यामुळे उष्माघात म्हणजे काय, त्याची लक्षणे कोणती आणि कोणत्या घरगुती उपायांनी उष्माघातापासून मुक्ती मिळू शकते याबद्दल प्राथमिक माहिती जाणून घ्या.
उष्माघात म्हणजे काय?
उष्माघात किंवा सन स्ट्रोक याला सामान्यत : ‘लू लागणे’ असे म्हणतात. जेव्हा तुमचे शरीर तापमान नियंत्रित करू शकत नाही तेव्हा अशी स्थिती निर्माण होते. उष्माघातात शरीराचे तापमान झपाट्याने वाढते आणि त्वरित ते कमी करता येत नाही. एखाद्याला उष्माघात झाला की व्यक्तीला शरीरात अजिबात घाम येत नाही. उष्माघातानंतर १० ते १५ मिनिटांत शरीराचे तापमान १०६°F किंवा त्याहून अधिक वाढू शकते. यावर वेळीच उपचार न केल्यास मानवी मृत्यू किंवा अवयव निकामी होऊ शकतात.
(हेही वाचा महाविकास आघाडी टिकणार का? शरद पवारांचे धक्कादायक उत्तर )
उष्माघाताची लक्षणे काय?
उष्माघाताची लक्षणे दिसल्यास वेळीच उपचार घ्यावा. त्यामुळे उष्माघाताची सर्व लक्षणे माहिती असणे गरजेचे आहे. डोकेदुखी, स्मृतिभ्रंश, उच्च ताप, शुद्ध हरवणे, मानसिक स्थितीत बिघाड, मळमळ आणि उलटी होणे, त्वचा लाल होणे, हृदयाची गती वाढणे, त्वचा मऊ होणे, त्वचा कोरडी पडणे.
उष्माघाताची कारणे काय आहेत?
गरम वातावरणात दीर्घकाळ राहिल्याने उष्माघात होऊ शकतो. जर कोणी अचानक थंड वातावरणातून उष्ण ठिकाणी गेले तर त्याला उष्माघात होण्याची शक्यता असते. उष्माघाताचे एक मुख्य कारण गरम हवामानात अति व्यायाम करणे हे देखील आहे. उन्हाळ्यात जास्त घाम आल्यावर पुरेसे पाणी न प्यायल्याने देखील याचा त्रास होऊ शकतो. जर कोणी जास्त प्रमाणात मद्यपान केले तर शरीराचे तापमान सुधारण्याची शक्ती कमी होते. हे देखील उष्माघाताचे कारण असू शकते. उन्हाळ्यात असे कपडे परिधान केले की ज्यातून घाम व हवा निघत नसेल तरीही उष्माघाताचा धोका वाढू शकतो.
उष्माघातापासून बचाव कसा करावा?
एखाद्याला उष्माघाताचा झटका आला आणि त्यावर वेळीच उपचार न केल्यास अवयव निकामी होणे, मृत्यू होणे, मेंदू मृत होणे अश्या काही गंभीर समस्या उद्भवू शकतात. जर एखाद्याला उष्माघात झाला असेल, तर लगेचच खालील पद्धतींचा अवलंब करावा. उष्माघाताने त्रस्त असलेल्या व्यक्तीला आणखी उन्हात ठेवू नका, कपड्यांचा जाड थर काढा आणि हवा खेळती राहू द्या, शरीर थंड करण्यासाठी कूलर किंवा पंख्यामध्ये बसवा/ बसा, थंड पाण्याने आंघोळ करा, थंड पाण्याच्या कपड्याने शरीर पुसा, डोक्यावर बर्फाचा पॅक किंवा कापड थंड पाण्याने ओले करून ठेवा, थंड पाण्यात भिजवलेला टॉवेल डोके, मान, कोपरा आणि कंबरेवर ठेवा. या प्राथमिक उपायांनंतरही जर शरीराचे तापमान कमी होत नसेल तर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.
Join Our WhatsApp Community