वाढते तापमान महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा

भविष्यात मुंबईसारख्या सर्व मोठ्या शहरांचे तापमान वाढणार असून हवामानाच्या अनेक समस्या निर्माण होणार असल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले आहे. या उष्णता वाढीमुळे हवामानात प्रचंड बदल होऊन उष्ण लहरीत वाढ, अति पाऊस, हवेचा दाब, आर्द्रता आणि वाऱ्याच्या दिशेवर विपरीत परिणाम होणार आहे.

486

मागील आठवड्यात नवी मुंबईत एका मोठ्या कार्यक्रमात १३ नागरिकांचा उष्माघाताने नाहक बळी गेला. विदर्भातील कोरड्या ४५ डिग्री तापमानापेक्षा मुंबईचे ३५ डिग्री दमट तापमान जास्त धोकादायक असते. तापमानामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण सतत कमी होत असते आणि त्यामुळे शरीराचे तापमान वाढते, रक्तदाब वाढतो त्यामुळे आधीच रुग्ण असलेल्या विशेषत: वृध्द नागरिकांनी उन्हात जाणे टाळावे. अशा नागरिकांना ऊन धोकादायक असते. शरीर आणि डोके पांढऱ्या सुती कापडाने झाकलेले असावे, सतत साधे पाणी पीत असले पाहिजे, औषधे घेवून उन्हात जावू नये, निंबू पाणी, कांदा सेवन केले पाहिजे. अगत्याचे काम असेल तरच उन्हात बाहेर जावे. एसी, कुलर्समधून अचानक बाहेर जाऊ नये, हळूहळू शरीराचे तापमान वाढवून पाच मिनिटाने पाणी पिऊनच बाहेर निघावे. चहा, कॉफी, कोल्डड्रिंक, दारू पिऊन उन्हात जाऊ नये, त्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते.

अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांनी केलेल्या अभ्यासात जागतिक हवामान बदल होऊन पृथ्वीचे सरासरी तापमान वाढत असल्याचे निरीक्षणात आढळून आलेले आहे. आज कार्बन वायू उत्सर्जन ४२५ कण प्रती मीटर इतके वाढले असून त्यामुळे पृथ्वीचे सरासरी तापमान १.०२ सेल्सियसने वाढले आहे. तापमान १.५ सेल्सियसच्या पुढे गेल्यास भारताला भयानक संकटांना तोंड द्यावे लागणार आहे. आयपीसीसीसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांनी तर सविस्तर अहवाल प्रकाशित करून मुंबई आणि पुणे सारख्या शहरांना हवामान बदलाचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असे म्हटले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील हवामान बदल यावर तज्ज्ञांनी प्रकाशित केलेल्या एका संशोधनामुळे अतिशय धोक्याची बाब समोर आली आहे. प्रदूषणामुळे आणि हरित वायुमुळे जमिनीवर हरित गृहाचा परिणाम होऊन तापमान वाढले हे आपणांस माहिती आहे, परंतु या हरित वायुमुळे पृथ्वीचे ट्रोपोस्फिअर हे खालील वातावरण हे सुद्धा तापले असून त्याची उंची आणि सीमा गेल्या ४० वर्षांत २०० मीटरने वाढली असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे भविष्यात मुंबईसारख्या सर्व मोठ्या शहरांचे तापमान वाढणार असून हवामानाच्या अनेक समस्या निर्माण होणार असल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले आहे. या उष्णता वाढीमुळे हवामानात प्रचंड बदल होऊन उष्ण लहरीत वाढ, अति पाऊस, हवेचा दाब, आर्द्रता आणि वाऱ्याच्या दिशेवर विपरीत परिणाम होणार आहे. मुंबई हे शहर समुद्र किनारी असल्याने तिथे दमट हवामान असते. खूप थंडी किंवा खूप उष्णता तिथे नसावी असे अपेक्षित आहे, परंतु गेल्या दोन दशकांतील मुंबईचे बदलत चाललेले हवामान, पाऊस आणि तापमान पाहता भविष्यात ही धोक्याची घंटा समजली पाहिजे आणि त्यासाठी तत्काळ उपाययोजना केल्या पाहिजे.

भारताचे भौगोलिक स्थान आणि तापमान

भारत हा २३ डिग्री उत्तरेपर्यंत उष्णकटीबंदीय प्रदेशात मोडतो, त्यात महाराष्ट्राचा समावेश आहे. महाराष्ट्र प्रदेश हा १५.५ ते २२ डिग्री उत्तर ह्या अक्षावर आहे, त्यामुळे प्राचीन काळापासून हा प्रदेश उष्ण प्रदेश आहे, त्यातील समुद्राजवळ आणि समुद्र सपाटीच्या खूप उंचीवरील प्रदेश सोडले तर विदर्भ आणि मराठवाडा हा सर्वाधिक उष्ण प्रदेश आहे. त्यातही विदर्भ हा देशाच्या मध्यभागी, सपाट आणि उष्ण कटिबंधीय प्रदेशात मोडत असल्याने येथे नैसर्गिकरित्या तापमान जास्त आहे.

(हेही वाचा पाकिस्तानसुद्धा सांगेल शिवसेना कुणाची; निवडणूक आयोगाला मोतीबिंदू झालाय; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल )

महाराष्ट्रातील तापमानात वाढ

गेल्या १०० वर्षांच्या तुलनेत २००० पासून उष्ण लहरीचे प्रमाण वाढत चालले आहे. २०१० ते २०२२ हे सर्वाधिक तापमानाचे वर्ष ठरले. त्यातही २०१६ आणि २०२२ हे उष्ण लहरींचे वर्ष ठरले. जागतिक हवामान बदलाच्या परिणामामुळे अति पाऊस, ढग फुटी, थंड-उष्ण लहरींचे प्रमाण वाढले आहे. एप्रिल ते जून या महिन्यात येथील तापमान ४४ ते ४७ डिग्री असते. महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान चंद्रपूरमध्ये ७ जून २००७ रोजी ४९.० डिग्री सेल्सियस नोंदविले गेले होते. यावरून मध्य भारतातील उष्ण तापमानाची कल्पना करता येते. केंद्र सरकारच्या भूविज्ञान मंत्रालयाच्या निरीक्षणानुसार १९८६ ते २०१० या काळात भारतात एकूण वार्षिक सरासरी तापमानात ०.१५ अंश प्रती दशक वाढ झाली आहे. उन्हाळ्यातील तापामानाची वाढ ०.५ इतकी झाली. महाराष्ट्रात ही वाढ ०.३ अंश प्रती दशक झाली. मुंबई शहरात ही वाढ ०.२५ अंश प्रती दशक इतकी झाली आहे.

पृथ्वीचे वातावरण सुद्धा तापले

पृथ्वीचे वातावरण १०० किमी आणि त्याहीपेक्षा उंचीपर्यंत असते परंतु त्यातील सर्वात खाली आणि हवामानाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे तपाम्बर (troposphere), हे ध्रुवावर १० तर विषुववृत्तावर २० किमी उंचीचे आवरण असते. ह्याच थरात हवामानाच्या सर्व घडामोडी घडत असतात. ढगांची निर्मिती, वाऱ्याची गती, हवेचा दाब, आर्द्रता, तापमान, विजा, पाऊस अशा सर्व घडामोडी ह्याच थरात घडत असल्यामुळे त्यात बदल होणे हा धोक्याचा इशारा आहे. आपल्याला जिवंत ठेवणारा ऑक्सिजनही याच थरात आहे. या आवरणावर २ किमी जाडीचे तपस्तब्धी (tropopause) सीमा आहे. आता ही सीमा २०० मीटर रुंदावली आहे. त्यावरील स्थितांबर (ओझोन थर – stratosphere) हे अतिशय महत्त्वाचे आवरण आहे ज्यामुळे सूर्याची अतिनील किरणे पृथ्वीवर येत नाही आणि जमिनीवरील सजीव सृष्टीचे संरक्षण होते. सध्या हा थर २००० सालापासून काही प्रमाणात भरून निघाला असला तरी अजूनही विरळ झाला आहे. पुढे त्यावरील उष्ण थर म्हणजे आयनांबर (Ionsphere) आणि बाह्यांबर (Exosphere) आहे. त्याहीवर गुरुत्वावरण हे थर असून हे अवकाशातील सर्व थर पृथ्वीचे सूर्याच्या हानिकारक किरणांपासून आणि पृथ्वीला धोका असणाऱ्या उल्कापासून आपले संरक्षण करते.

एकूणच मानवाच्या हस्तक्षेपामुळे जमीन आणि वातावरण आपण दूषित केले आहे. निरीक्षणात आढळले की १९६० पूर्वी हे आवरण स्थिर होते. परंतु पृथ्वीवर मानवनिर्मित ग्रीन हाउस गॅसेसची निर्मिती होत असल्याने हे वायू या थरात गोळा होऊन पृथ्वीचे आवरण उष्ण होते. सूर्याची उष्णता पृथ्वीवर येते परंतु प्रदुषित वायुमुळे ही उष्णता वरील वातावरणात परत जात नाही, यालाच ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणतात. सन २००० पासून या आवरणाचे तापमान ८० टक्क्याने वाढले आहे. अलीकडे तपाम्बर हे आवरण प्रदूषण आणि हरित वायुमुळे गतीने वर सरकत असून हा दर दशकात ५० ते ६० मीटर वेगाने होत असून सर्वाधिक उंची मागील २० वर्षांत वाढली आहे. आजतागायत ही उंची २०० मीटरने वाढली असल्याचे संशोधनात म्हटले आहे. ऋतुमानानुसार हा थर खाली-वर जात असतो, परंतु अलीकडे मानवनिर्मित कारणामुळे हे अतिशय संवेदनशील आवरण २०० मीटर उंचावणे ही धोक्याची घंटा आहे, असेही संशोधनात म्हटले आहे. गेल्या १०० वर्षांतील तापमानाचे रेकाॅर्ड तुटले असून मार्च महिन्यातच उष्ण लहरी सुरु झाल्या असून एप्रिल आणि मे महिन्यातही सतत सुरु आहेत. हा परिणाम पृथ्वीचे ट्रोपोस्पिअर हे आवरण तापल्यामुळेच आहे. अति पाऊस, ढगफुटी होणे, वादळे येणे, विजांची निर्मिती होते. आवरण तापल्यामुळे वाऱ्याची गती आणि आर्द्रतेवर परिणाम होऊन एकूणच हवामानावर, ऋतूवर दूरगामी परिणाम होतात.

तापमान वाढीची मानव निर्मित कारणे

निर्वनीकरण लोकसंख्या वाढ, शहरीकरण आणि अर्बन हिट, औद्योगिक क्षेत्रात प्रचंड वाढ, कोळसा आधारीत उर्जा, उद्योग, क्रूड तेलाचा अति वापर, प्रदूषण आणि हरित वायू परिणाम, भू वापर बदल इत्यादी कारणामुळे हवामान बदल आणि तापमान वाढ झाली आहे.

तापमान वाढीची नैसर्गिक कारणे

तापमान हे स्थळ आणि स्थितीवर आधारित असते, त्यात अक्षांसाची स्थिती, समुद्रापासून अंतर, समुद्र सपाटीपासून उंची, महासागरीय जलधाराचे तापमान, व्यापारी वारे, जेट वारे याची स्थिती, समुद्राचे तापमान, जमिनीचे तापमान, जमीन आणि परिसंस्थेचा प्रकार, सौर वात-सौर ज्वाळा इत्यादी कारणामुळे प्रत्येक स्थळाचे तापमान वेगवेगळे असते, परंतु अलीकडील निसर्गात मानवी हस्तक्षेपामुळे जागतिक आणि स्थानिक तापमान वाढले आहे.

मुंबईचे हवामान आणि तापमान

मुंबईचे भौगोलिक स्थान पाहता इथले हवामान उबदार आणि दमट असते. डिसेंबर ते जानेवारीपर्यंत साधारण थंड, मार्च ते मे पर्यंत उष्ण दमट हवामान असते. तर जून ते सप्टेंबर पर्यंत पावसाळा असतो. येथील सरासरी तापमान २७ डिग्री सेल्सियस असले तरी उन्हाळ्यातील सर्वाधिक सरासरी तापमान ३२ डिग्री सेल्सियस असते. किमान सरासरी तापमान १८ डिग्री सेल्सियस असते आणि पाऊस २४२ सेंटीमीटर पडतो. हवामान विभागाचे जुने आणि नवीन आकडे तपासले असता मुंबईचे हवामान बदलले असल्याचे लक्षात येते. म्हणूनच मुंबई प्रशासनाने मुंबई हवामान बदल कृती आराखडा आखला आहे. (Mumbai Climate change action plan) मुंबई, कोलाबा येथील १९९१-२०२० काळातील वार्षिक सर्वाधिक तापमानाची आकडेवारी पाहिल्यास मुंबईच्या हवामान बदलाची गंभीरता लक्षात येते.

(हेही वाचा महाविकास आघाडी टिकणार का? शरद पवारांचे धक्कादायक उत्तर )

मुंबईचे तापमान का वाढते?

मुंबई शहर हे समुद्राच्या किनारी असल्याने ३५ डिग्री तापमानात सुद्धा उकाडा हा असहनशील असतो, त्यातही अँटी सायक्लोनिक स्थिती, वाऱ्याची दिशा, ट्रोपोस्फिअरचे तापमान ही नैसर्गिक कारणे असली तरी वाढते औद्योगिकरण, शहरीकरण, कॉंक्रेटीकरण, प्रदूषण, ह्यातून निर्माण झालेले ग्रीन हाऊस इफेक्ट आणि हिट आयलॅंड इफेक्ट हे घटक कारणीभूत आहेत.

उष्ण तापमानापासून आपले कसे संरक्षण करावे?

मुंबई प्रशासनाने हवामान बदल रोखण्यासाठी मुंबई हवामान बदल कृती आराखडा बनविला आहे, परंतू कागदावर आराखडे बनवून हवामान बदल रोखता येणार नाही, त्यासाठी जमिनीवर शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म कृती कार्यक्रम आखून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी लागेल.

शॉर्ट टर्म कार्यक्रमात शहरात वृक्षारोपण मोहीम राबविणे, रेन वॉटर हार्वेस्टिंग योजना राबवविणे, घरांना आणि सिमेंट रस्त्यांना पांढरे रंग, मुलामा देणे, घराच्या छतावर आणि खिडक्यात लहान रोपटी लावणे अशा अनेक बाबींचा समावेश करता येईल.

लॉंग टर्म अॅक्शन प्लॅनमध्ये शहरांचे नियोजन, प्रदूषण कमी करणे, उद्योगांचे विकेंद्रीकरण, सौर उर्जेवर भर देणे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था विकसित करणे, सौर ऊर्जा बॅटरीवर चालणारी वाहने आणणे, वृक्षारोपण आणि बगीचे तयार करणे, अति पाऊस आणि पाण्याचा निचरा, घन कचरा निर्मूलन ह्यासाठी कडक नियम बनविणे, जंगलावरील अतिक्रमण हटविणे, शहरात पुन्हा नव्याने कार्यालये, व्यावसायिक कार्यालय न सुरु करता शहराबाहेर नेली पाहिजेत आणि विकेंद्रीकरण व्यवस्था निर्माण केली पाहिजे.

लेखक – प्रा. सुरेश चोपणे, पर्यावारण / हवामान अभ्यासक, अध्यक्ष – ग्रीन प्लानेट सोसायटी, सदस्य- केंद्रीय वने,पर्यावरण आणि जल वायू परिवर्तन मंत्रालय,दिल्ली

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.