टाटानगर रेल्वे विभागांतर्गत येणाऱ्या कोटशिला जंक्शन येथे आदिवासी कुर्मी समाजाचे आंदोलन सुरू आहे. तसेच खेमसुली रेल्वे स्थानकावर सुद्धा आंदोलन सुरू असून यामुळे हावडा मार्गे ये-जा करणाऱ्या बहुतांश रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. काही रेल्वे शॉर्ट टर्मिनेशन, शॉर्ट ओरिजिनेटेड, तर काही अन्य मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. ७ ते १२ एप्रिल दरम्यान हावडा मार्गे येणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या रद्द झाल्या आहेत.
( हेही वाचा : राज्यात अस्मानी संकट! राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी, मदतीपासून वंचित राहू देणार नाही; कृषीमंत्र्यांचे आश्वासन)
‘या’ गाड्या रद्द
हावडा-मुंबई, हावडा-पुणे, हावडा- चैन्नई, हावडा-अहमदाबाद मेल, एक्स्प्रेस, गितांजली, समसरता अशा विविध रेल्वे गाड्या ७ एप्रिलपासून रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून प्रवाशांनी आखलेले नियोजन पूर्णतः कोलमडले आहे. आंदोलकांनी रेल्वे रूळाची प्रचंड हानी केल्याची माहिती रेल्वेकडून मिळाली आहे. रेल्वे रूळाचे काम पूर्वपदावर आणण्यासाठी किमान पाच दिवस लागणार आहे. त्यामुळे १२ एप्रिलपर्यंत हावडाहून येणाऱ्या सर्व प्रकारच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. कोटशिला जंक्शन आणि खेमसुली रेल्वे स्थानकाला आंदोलकांनी लक्ष्य केले होते.
या परिसरातील ट्रॅक उखडून टाकले आहेत, दुरूस्तीच्या कार्याला युद्धस्तरावर प्रारंभ झाल्याची माहिती भुसावळ मध्य रेल्वे विभागाचे जनसंपर्क अधिकारी जीवन चौधरी यांनी दिली.
Join Our WhatsApp Community