World Malaria Day: मुंबईतील हिवतापाच्या डासांचे तब्बल दहा हजार अड्डे केले नष्ट

मलेरियाच्या बाबतीत सुद्धा मलेरियाचे परजीवी (Plasmodium Species) पसरविणाऱ्या `ऍनॉफिलीस स्टीफेन्सी' डासाची उत्पत्ती देखील साचलेल्या स्वच्छ पाण्यात होते. (World Malaria Day)

215
World Malaria Day destroyed ten thousand of bases mosquitoes in Mumbai were
World Malaria Day: मुंबईतील हिवतापाच्या डासांचे तब्बल दहा हजार अड्डे केले नष्ट

मुंबई महानगरपालिकेच्या कीटकनाशक विभागामार्फत हिवतापविरोधी मोहीमे अंतर्गत हिवताप प्रसारास कारणीभूत ठरणाऱ्या ‘ॲनोफिलिस स्टिफेन्सी’या प्रजातीच्या डासांच्या उत्पत्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कीटकनाशक विभाग वर्षभर कार्यरत असतो. हिवताप (मलेरिया) नियंत्रणाच्या मोहीमे अंतर्गत १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ या वर्षभराच्या कालावधीदरम्यान महानगरपालिकेच्या कीटकनाशक विभागाने मुंबईतील तब्बल १० हजार ७८८ डासांची उत्पत्ती स्थाने शोधून ती नष्ट केली आहेत, अशी माहिती जागतिक मलेरिया दिनाच्या निमित्ताने (World Malaria Day) कीटकनाशक खात्याद्वारे देण्यात आली आहे.

हिवतापावर नियंत्रण आणण्यासाठी विविध उपाययोजना आणि सर्वस्तरीय कार्यवाही ही महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनात नियमितपणे राबविण्यात येते. हिवताप पसरवणाऱ्या ॲनोफिलीस डासांच्या उत्पत्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी डासांच्या उत्पत्ती स्थानांमध्ये घट करणे हे हिवतापविरोधी विविधस्तरिय कार्यवाहीचे उद्दिष्ट असते. यामध्ये प्रामुख्याने अभियांत्रिकीय व तांत्रिक उपाययोजना, जीवशास्त्रीय उपाययोजन इत्यादींचा समावेश होतो. जीवशास्त्रीय उपाययोजनांमध्ये प्रामुख्याने डासांच्या अळ्या खाणाऱ्या अर्थात ‘डास अळीभक्षक’ असणाऱ्या गप्पी माशांचा प्रभावी वापर करण्यात येतो. तर अभियांत्रिकीय व तांत्रिक स्वरुपाच्या उपाययोजनांमध्ये धूम्रफवारणीसह परिणामकारक रसायनांचा वापर करुन करण्यात आलेल्या रासायनिक उपाययोजनांचा समावेश होतो. (World Malaria Day)

१ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ या वर्षभराच्या कालावधीदरम्यान महानगरपालिकेच्या कीटकनाशक विभागामार्फत मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये साधारणपणे ४९ हजार ४७६ घरांना भेटी देण्यात आल्या. या भेटींमध्ये एकूण ४ लाख ४७ हजार १८८ पाण्याच्या टाक्या तपासण्यात आल्या. तर एकूण ४ लाख २८ हजार १९६ पाण्याच्या टाक्यांमध्ये औषध फवारणी करण्यात आली. तपासणी दरम्यान एकूण १० हजार ७८८ इतक्या मोठ्या प्रमाणात ॲनोफिलीस या डासांची उत्पत्ती स्थाने आढळली. ही उत्पत्ती स्थाने महानगरपालिकेच्या संबंधित चमुद्वारे तात्काळ नष्ट करण्यात आली. यानुसार डासांची हजारो उत्पत्तीस्थाने तात्काळ नष्ट करण्यात आल्यामुळे डासांच्या भविष्यातील उपद्रवास प्रतिबंध करण्यास मोठी मदत झाली आहे.

अॅनोफिलीस डासांची तब्बल दहा हजार उत्पत्तीस्थळे नष्ट

ॲनोफिलीस या डासांची वर्षभरात १० हजार ७८८ एवढी उत्पत्तीस्थळे शोधून नष्ट करण्यात आली. यापैकी सर्वाधिक म्हणजे २ हजार ४१८ एवढी उत्पत्तीस्थळे जुलै २०२२ मध्ये नष्ट करण्यात आली. तर त्याखालोखाल ऑगस्ट महिन्यात २ हजार १२८, जून महिन्यात १ हजार ४९६, सप्टेंबर महिन्यात १ हजार ३३७ इतकी उत्पत्तीस्थळे शोधून नष्ट करण्यात आली आहेत. (World Malaria Day)

मलेरिया, डेंग्यू यासारख्या रोगांना आळा बसावा व त्यांच्या प्रसारास प्रतिबंध व्हावा, यासाठी डासांची उत्पत्तीस्थाने शोधण्याच्या दृष्टीने घरांची व घरांच्या जवळपासच्या परिसराची तपासणी महापालिकेच्या कीटकनाशक खात्याद्वारे नियमितपणे करण्यात येत असते. तर पावसाळ्यापूर्वी व पावसाळ्यात ही तपासणी मोहीम स्वरूपात केली जाते. या मोहिमेदरम्यान कीटकनाशक खात्यातील बहुतांश सर्व कामगार-कर्मचारी-अधिकारी यांनी मोहिमेत सहभागी होऊन तपासणी करतात. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कीटकनाशक खात्यातील सुमारे १ हजार ५०० कामगार, कर्मचारी, अधिकारी या मोहीमेत कार्यरत असतात.

डास निर्मूलन व पर्यायाने मलेरिया प्रतिबंधात नागरिकांची भूमिका

महानगरपालिकेद्वारे डास निर्मूलनासाठी विविधस्तरिय प्रयत्न नियमितपणे करण्यात येतात. यामध्ये डास उत्पत्तीस्थाने शोधून नष्ट करण्यासारख्या प्रभावी उपाययोजनांचाही समावेश आहे. ही डास उत्पत्तीस्थाने प्रामुख्याने घरामध्ये किंवा घराजवळच्या परिसरात साचलेल्या पाण्यामध्ये आढळून येतात. ही बाब लक्षात घेता नागरिकांनी आपल्या घरामध्ये व घराजवळच्या परिसरात कुठेही साचलेले पाणी असणार नाही, याबाबत सजग व सतर्क राहणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच साचलेले पाणी आढळून आल्यास ते तात्काळ नष्ट करण्याची कार्यवाही करणेही अत्यंत आवश्यक आहे.

एकाच वेळी एक मादी घालते १०० ते १५० अंडी

डासांच्या प्रत्येक उत्पत्तीस्थानाच्या ठिकाणी एकावेळी एक मादी डास १०० ते १५० अंडी घालते. एका मादी डासाचे सरासरी आयुर्मान हे ३ आठवड्यांचे असते. या तीन आठवड्यांच्या कालावधीत मादी डास किमान ४ वेळा साचलेल्या पाण्यात अंडी घालते. म्हणजेच एका मादी डासामुळे साधारणपणे ४०० ते ६०० डास तयार होत असतात. हे डास मलेरिया, डेंग्यू सारख्या आजारांच्या प्रसारास कारणीभूत ठरतात. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेच्या कीटकनाशक खात्याद्वारे डासांची उत्पत्तीस्थाने शोधण्याची कार्यवाही नियमितपणे केली जात असते. तर पावसाळ्यापूर्वी व पावसाळा दरम्यान पाणी साचलेल्या ठिकाणांची संख्या वाढते, हे लक्षात घेऊन या कालावधीदरम्यान ही कार्यवाही मोहीम स्वरूपात केली जाते. या मोहिमे अंतर्गत आढळून आलेली डासांची उत्पत्तीस्थाने तात्काळ नष्ट देखील केली जातात. ज्यामुळे मलेरिया, डेंग्यू इत्यादींच्या भविष्यातील संभाव्य प्रसारास आळा बसण्यास मोठी मदत होत असते. (World Malaria Day)

आठवड्यातून एक दिवस पाळा ‘कोरडा दिवस’

अनेक घरांच्या बाहेर पाणी साठवण्यासाठी पिंप वा ड्रम ठेवलेले असतात. यातील पाण्यात डासांच्या अळ्या वेळोवेळी मोठ्या प्रमाणात आढळून आल्या आहेत. याकरिता हे पिंप व इतर पाणी साठवण्याची भांडी आठवड्यातून एक दिवस पूर्णपणे कोरडी ठेवून आठवड्यातून एक दिवस ‘कोरडा दिवस’ म्हणून पाळावा. या दिवशी पाणी साठवण्याची भांडी – पिंप इत्यादी प्रथम पूर्णपणे उलटे करुन ठेवावीत.

कुठे होते मलेरियाचा प्रसार करणाऱ्या डासांची उत्पत्ती?

मलेरियाच्या बाबतीत सुद्धा मलेरियाचे परजीवी (Plasmodium Species) पसरविणाऱ्या `ऍनॉफिलीस स्टीफेन्सी’ डासाची उत्पत्ती देखील साचलेल्या स्वच्छ पाण्यात होते. या प्रकारच्या डासांची प्राधान्य उत्पत्तीस्थळे ही मुख्यतः विहिरी, पाण्याच्या टाक्या, कारंजे, कूलींग टॉवर, पाण्याचे हौद, इमारत बांधकामाच्या ठिकाणी साचवलेले पाणी इत्यादी आहेत.

परिसरातील डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी घ्यावयाची खबरदारी!

घराशेजारील परिसरात असणारे टायर्स, नारळाच्या करवंट्या, फोडलेली शहाळी, थर्माकोल, पत्रे, पन्हाळे, घरावर टाकलेले प्लास्टिक, पाण्याच्या बाटल्या, पाण्याच्या बाटल्यांची झाकणे, पाण्याचे पिंप, मनी प्लांट – बांबू यासारख्या शोभेच्या झाडांसाठी ठेवण्यात येणारे पाणी, काचेची किंवा धातूची कासवाची मूर्ती ठेवण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी, कुंड्यांखालील ताटल्या, यासारख्या विविध वस्तुंमध्ये पावसाचे पाणी साचते व या पाण्यातही डास अंडी घालतात. त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारच्या निरुपयोगी वस्तू त्वरीत नष्ट कराव्यात, असेही आवाहन महापालिकेच्या कीटकनाशक खात्याने यानिमित्ताने केले आहे. (World Malaria Day)

(हेही वाचा – शिवसेना भवनाच्या अंगणात उभे राहणार शेलार?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.