Mumbai Corona Updates: रुग्णालयात मास्क सक्ती; सर्व ज्येष्ठ नागरिकांना मास्क लावण्याचे महापालिकेचे आवाहन

125

देशातील विविध राज्यांमध्ये कोविड-१९ विषाणू संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले असून मुंबईतही मागील काही दिवसांमध्ये रुग्णसंख्या वाढली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अंदाजानुसार मे महिन्यामध्ये कोविड संसर्ग बाधितांची संख्या वाढण्याची शक्यता असून या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेची सर्व रुग्णालये, तसेच सर्व खासगी रुग्णालयांनी देखील कोविड उपचारांसाठी सुसज्ज रहावे, अशी सूचना मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी केली आहे. विशेषतः ६० वर्षे वयावरील ज्येष्ठ नागरिकांना सक्ती नसली तरी त्यांनी गर्दीच्या ठिकाणी वावरताना खबरदारीचा उपाय म्हणून मास्क लावणे आवश्यक आहे. मात्र महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये सर्व कर्मचारी, रूग्ण तसेच येणाऱ्या अभ्यागतांना यापुढे मास्क लावणे सक्तीचे असेल, असेही चहल यांनी निर्देश दिले.

कोविडच्या वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील आरोग्य व्यवस्थेच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी सोमवारी १० एप्रिल २०२३ रोजी तातडीची आढावा बैठक घेतली. या बैठकीस महापालिका अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, अतिरिक्त आयुक्त (शहर) आशीष शर्मा, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांच्यासह सर्व संबंधित सहआयुक्त, उपआयुक्त, सहायक आयुक्त तसेच खातेप्रमुख उपस्थित होते.

याप्रसंगी महानगरपालिका आयुक्त चहल म्हणाले की, केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने कोविड रूग्णसंख्या वाढीबाबतचा वर्तवलेला अंदाज पाहता संपूर्ण यंत्रणेने सज्ज राहण्याचा सल्ला सरकारने दिला आहे. सक्ती नसली तरी काही मार्गदर्शके खबरदारीचा उपाय म्हणून निर्गमित करावयाची आहेत. वैद्यकीय अंदाजानुसार येत्या मे महिन्यामध्ये कोविड संसर्गाच्या रूग्णांची संख्या वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे, मुंबईतील महानगरपालिकेच्या सोबतच खासगी रुग्णालयांच्या ठिकाणीही रूग्णशय्या सज्ज ठेवणे आवश्यक आहे, असे सांगितले.

महानगरपालिकेच्या सर्व रूग्णालयांमधील सर्व कर्मचारी, रुग्ण तसेच अभ्यागतांना देखील मास्क लावणे हे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सक्तीचे करण्यात येत आहे. त्याबाबतची सूचना आरोग्य विभागाकडून तातडीने प्रसारित करण्यात यावी,असे निर्देश त्यांनी दिले.

मुंबईतील महानगरपालिकेची रुग्णालये व खासगी रुग्णालये यांनी कोविड पूर्वसज्जतेचा भाग म्हणून रंगीत तालीम (मॉक ड्रिल) करावी, ही रंगीत तालीम करताना केंद्र सरकारच्या सूचनेनुसार आवश्यक ती सर्व कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देशही आयुक्त तथा प्रशासक यांनी दिले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.