गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक नेत्यांच्या मागे आयकर विभाग (इन्कम टॅक्स), अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि सीबीआयचा ससेमिरा सुरू आहे. यातील काही नेत्यांना कारागृहातही जावे लागले आहे. आता यामध्ये आणखी एका नेत्याचे नाव समोर आले आहे. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांना आयकर विभागाने वाराणसीतील विनायक ग्रुपमधील कथित गैरव्यवहार प्रकरणात नोटीस बजावली आहे. येत्या २० एप्रिलला त्यांची चौकशी होणार आहे.
१६० कोटींच्या टॅक्स चोरीच्या आरोप प्रकरणात चौकशीसाठी आयकर विभागाने अबू आझमी यांना नोटीस बजावली आहे. माहितीनुसार, अबू आझमींना आतापर्यंत ४० कोटी रुपये मिळाल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.
वाराणसीच्या विनायक ग्रुपची आयकर विभागाकडून चौकशी सुरू असताना समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांचे नाव समोर आले होते. वाराणसीमध्ये विनायक ग्रुपने अनेक इमारती, शॉपिंग सेंटर आणि मॉल तयार केले आहेत. सर्वेश अग्रवाल, समीर दोषी आणि आभा गुप्ता या कंपनीमधील पार्टनर आहेत. आभा गुप्ता यांचे पती गणेश गुप्ता हे अबू आझमींचे निकटवर्तीय असून त्यांचे काही दिवसांपूर्वीच निधन झाले. त्या आधी ते समाजवादी पक्षाचे महाराष्ट्राचे महासचिव म्हणून कार्यरत होते.
(हेही वाचा – मुख्यमंत्री शिंदे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; नाशिकमधील नुकसानग्रस्त शेतीची केली पाहणी)
Join Our WhatsApp Community