वेबसीरिज तसेच हिंदी चित्रपटात काम करणाऱ्या एका अभिनेत्रीला हॉलिवूडसाठी ऑडिशन देण्याच्या बहाण्याने दुबई येथे पाठवून तिला ‘शारजाह’मध्ये ड्रग्ज तस्करीत अडकवणाऱ्या अँथॉनि पॉल याच्यासह दोघांना मुंबई गुन्हे शाखेने सोमवारी सायंकाळी मुंबईतून अटक केली आहे. अभिनेत्रीच्या आईने केलेल्या अपमानाचा सूड घेण्यासाठी त्याने हे कृत्य केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. अभिनेत्री ख्रिसन परेरा (Chrisann Pereira) (वय २७) ही १ एप्रिलपासून शारजाहमध्ये ड्रग्ज तस्करी प्रकरणात अटकेत आहे. ख्रिसन परेरा ही बोरिवली येथे कुटुंबियांसह राहण्यास असून तिने ‘सडक २’ ‘बाटला हाऊस’ या चित्रपटात तसेच अनेक वेबसीरिजमध्ये काम केले आहे.
नक्की काय घडले?
मुंबईच्या गुन्हे शाखा कक्ष १०च्या पथकाने सोमवारी अँथनी पॉल आणि राजेश बोराटे या दोघांना अटक केली असून पॉल हा बेकरीचा मालक असून रवी हा सिंधुदुर्ग येथे राहणारा आहे. पॉल याने ख्रिसन परेरा (Chrisann Pereira) व्यतिरिक्त चार जणांना या प्रकारे ड्रग्ज प्रकरणात अडकवले असल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोरिवली येथे राहणारी अभिनेत्री ख्रिसन परेराची आई प्रमिला हिला २३मार्च रोजी एका व्यक्तीने मेसेज पाठवून मुलगी ख्रिसनला चित्रपटात चांगली भूमिकेचे काम मिळवून देण्यासाठी मदत करणार असल्याचा दावा मेसेजमध्ये करण्यात आला होता. मेसेज करणाऱ्याने परेरा यांना स्वत:ची ओळख रवी म्हणून करून दिली होती, त्यानंतर त्याने स्वतःची एक टॅलेंट मॅनेजमेंट कंपनी असल्याचा दावा केला. ख्रिसन परेराला (Chrisann Pereira) त्याने एका वेब सीरिजसाठी शारजाहमध्ये ऑडिशनला जाण्यास सांगितले.
१ एप्रिल रोजी निघण्याच्या एक दिवस आधी, रवीने ख्रिसन परेराची (Chrisann Pereira) एका हॉटेलमध्ये भेट घेऊन तिला एक ट्रॉफी (स्मृतीचिन्ह) देऊन ती ट्रॉफी शाहजाहमध्ये विमानतळावर तिच्या स्वागतासाठी येणाऱ्या एका व्यक्तीला देण्यास सांगितली. तिच व्यक्ती ख्रिसनला राहण्याची आणि ऑडिशनसाठी घेऊन जाण्याची सोय करेल असे त्याने तिला सांगितले.
ख्रिसन ही १ एप्रिल रोजी शारजाह विमानतळावर पोहोचली तेव्हा तिला घेण्यासाठी कोणीही आले नव्हते आणि हॉटेलचे बुकिंगही केले गेले नव्हते. त्यानंतर तिने वडिलांना फोन करून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आणून दिले. रवीने दिलेल्या ट्रॉफीबद्दल तिने वडिलांना सांगितले तेव्हा त्याला संशय आला आणि त्याने तिला पोलिसांकडे जाण्यास सांगितले. जेव्हा ती शारजा पोलिसांकडे गेली तेव्हा त्यांनी ट्रॉफी तपासली असता त्यात लपवून ठेवलेले गांजा आणि अफू हे अमली पदार्थ मिळून आले, याप्रकरणी शाहजाह पोलिसांनी ख्रिसन परेराला (Chrisann Pereira) अमली पदार्थ तस्करीत अटक केली.
अभिनेत्रीच्या आईबरोबर काय घडले होते?
ख्रिसनच्या कुटुंबियांना हा प्रकार कळताच त्यांनी मुंबई पोलिसांकडे संपर्क साधला आणि झालेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. सुरुवातीला हे प्रकरण पोलिसांनी गंभीरपणे घेतले नाही, अखेर ख्रिसनच्या कुटुंबीयांनी गुन्हे शाखेकडे संपर्क साधून त्यांना झालेला प्रकार सांगितला. हे प्रकरण गंभीरतेने घेऊन तपास सुरू करण्यात आला. या सर्व प्रकरणामागे एका बेकरीचा मालक अँथनी पॉल हा असल्याचे समोर आले. गुन्हे शाखा कक्ष १०च्या पथकाने प्रथम वाकोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अँथनी पॉल याला सोमवारी अटक करून चौकशी केली असता पॉल याची बहीण परेरा यांच्या इमारतीत राहण्यास होती. कोरोनाच्या काळात पॉल जेव्हा बहिणीला भेटायला गेला त्यावेळी मास्क लावण्यावरून ख्रिसन परेरा हिची आई प्रमिला परेरा हिच्यासोबत पॉलचे भांडण झाले होते, आणि दुसऱ्या वेळा परेरा यांच्या पाळीव कुत्रा हा पॉलवर भुंकला त्यावेळी दुसऱ्यांदा भांडण झाले आणि प्रमिला हिने पॉल याला सर्वांसमोर अपमानित केले होते. या अपमानाचा सूड घेण्यासाठी त्याने प्रमिला हिची अभिनेत्री मुलीला शारजाहमध्ये अटक करण्याची योजना आखली होती अशी माहिती तपासात समोर आली.
पॉल याने यापूर्वी ज्यांच्याशी त्याचे भांडण झाले होते अशा चार जणांसोबत त्याने हिच पद्धत आजमावली आहे. त्यापैकी तिघे त्याच्या जाळ्यात अडकले नाही मात्र क्लिटन नावाचा व्यक्ती त्याच्या जाळ्यात अडकला व त्याला देखील शारजाहमध्ये अटक झाली असून तो अजूनही तेथील तुरुंगात आहे, अशी माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने दिली.
अधिकारी यांनी सांगितले की, पॉल हा लोकांच्या सामानात ड्रग्ज लपवून परदेशात पाठवल्यानंतर, पॉल शारजाह विमानतळ पोलिसांना फोन करायचा आणि ड्रग्ज बाळगणाऱ्या व्यक्तीबद्दल त्यांना माहिती देत होता. त्यानंतर तो शारजाहमधील वकिलांना ओळखतो असे सांगून पीडितेच्या कुटुंबाकडून पैसे मिळवण्याचा प्रयत्न करायचा. परेराच्या बाबतीतही त्याने आपल्या मुलीची सुटका करण्यासाठी तिच्या आईकडे ८० लाख रुपयांची मागणी केली होती. ख्रिसन परेरा सोबत झालेल्या फसवणुकी बाबत मुंबई पोलीस शाहजाह पोलिसांशी संपर्क साधून सविस्तर माहिती व गुन्ह्याची कागदपत्रे पाठवून ख्रिसन परेरा निर्दोष असल्याचे पुरावे सादर करणार असल्याचे समजते.
(हेही वाचा – fake gold loan scam : नकलीला ठरवले असली; आपल्याच व्यक्तीकडून बॅंक फसली)
Join Our WhatsApp Community