छत्रपती शिवाजी महाराज उद्याना (शिवाजी पार्क)वर एकवेम सार्वजनिक शौचालय असून याठिकाणी फिरण्यास येणाऱ्या लोकांची संख्या पाहता हे शौचालय अपुरे पडत आहेत. त्यामुळे आणखी एक सार्वजनिक शौचालय बांधण्याची मागणी होत असतानाच शिवाजी पार्ककरांना आता कुत्र्यांसाठीही सार्वजनिक शौचालय हवं आहे. शिवाजी पार्कवर कुत्रे उघड्यावर घाण करत असून या कुत्र्यांना फिरवण्यास आणणाऱ्या मालक तथा नोकरांकडून ही घाण साफ केली जात नाही. त्यामुळे कुत्र्यांमुळे होणाऱ्या घाणीच्या त्रासामुळे शिवाजी पार्कमधील जनतेकडून या कुत्र्यांकडून सार्वजनिक शौचालयाची व्यवस्था करण्याची मागणी महापालिकेकडे केली आहे.
दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यान (शिवाजी पार्क) येथील लाल मातीच्या धुळीमुळे गेल्या काही काळापासून आजूबाजूच्या परिसरात प्रदूषणाची मोठी समस्या निर्माण झाली आहे. तसेच याठिकाणी कायदा – सुव्यवस्था, फेरीवाले, पार्किंग अशा अनेक समस्यांचा स्थानिकांना सामना करावा लागत आहे. यावर सकारात्मक चर्चा करून तोडगा काढण्यासाठी खासदार राहुल शेवाळे यांच्या वतीने शिवाजी पार्क जिमखाना येथे ‘थेट संवाद’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला खासदार शेवाळे यांच्यासह, आमदार सदा सरवणकर, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश शिरवडकर, मनसे नेते संदीप देशपांडे, पोलीस उपायुक्त मनोज पाटील, अतिरिक्त पोलिस आयुक्त काकडे, महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे तानाजी यादव, पालिका उपायुक्त ( पर्यावरण) अतुल पाटील, उपायुक्त रमाकांत बिरादर, सहाय्यक आयुक्त प्रशांत सपकाळे, पालिकेचे माजी सल्लागार नंदन मुणगेकर यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
(हेही वाचा मोदींची पदवी मागणाऱ्या ‘आप’चे दोन डझनहून अधिक आमदार विनापदवीधर!)
या प्रसंगी बोलतांना शिवाजी पार्कमधील जनतेने कुत्र्यांमुळे होणाऱ्या अस्वच्छतेमुळे व त्यामुळे पसरणाऱ्या दुर्गंधीमुळे तीव्र नाराजी व्यक्त केली. या थेट संवाद कार्यक्रमात सहभागी झालेल्या शिवाजी पार्कमधील रहिवाशांनी या परिसरात कुत्रे बरेच आहेत. मैदान परिसरात रात्रीच्या वेळी तसेच सकाळी पाळीव कुत्रे आणले जातात. या कुत्र्यांनी केलेली घाण ही संबंधित मालकांनी साफ करणे आवश्यक आहे. परंतु काही मालक ही घाण साफ करत नाही. त्यामुळे या मैदानातील आतील तसेच बाहेरील बाजुस मोठ्याप्रमाणात पदपथावर घाण केली जात. त्यामुळे अशाप्रकारच्या कुत्र्यांमुळे होणाऱ्या घाणीसंदर्भात महापालिकेने विशेष ड्राईव्ह घेत त्यांच्याविरोधात दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी रहिवाशांनी केली. तर काही रहिवाशांनी तर शिवाजीपार्कमध्ये कुत्र्यांसाठी सार्वजनिक शौचालयाची व्यवस्था करून दिली जावी अशी मागणी केली.
यावर उपायुक्त रमाकांत बिरादर यांनी कुत्र्यांमुळे होणाऱ्या घाणीमुळे जी अस्वच्छता होते, याकरता ड्राईव्ह घेण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन रहिवाशांना दिले.
महिलांसाठी पिंक शौचालय उभारा
शिवाजी पार्कमध्ये सध्या स्काऊड अँड गाईडच्या शेजारी एकमेव पे अँड यूज सार्वजनिक शौचालय असून याव्यतिरिक्त एकही शौचालयाची व्यवस्था नाही. परिणामी फिरण्यास येणाऱ्या महिला आणि पुरुषांची मोठी गैरसोय होते. शिवाय खेळण्यास येणाऱ्या खेळाडुंचीही गैरसोय होत आहे. त्यामुळे शिवाजीपार्क जिमखाना शेजारी टेनिस कोर्ट तसेच आसपासच्या बाजुला उघड्यावर रात्रीच्या वेळी लघुशंका केली जाते. परिणामी मोठ्याप्रमाणात दुर्गंधी पसरते. त्यामुळे शिवाजीपार्कवर आणखी एक शौचालयाची व्यवस्था करावी व महिलांसाठी पिंक शौचालय उभारले जावे अशी मागणी रहिवाशांकडून केली आहे. याबाबतही उपायुक्त रमाकांत बिरादर यांनी पिंक शौचालय उभारण्याचा सकारात्मक विचार केला जाईल,असे आश्वासन दिले.
Join Our WhatsApp Community