हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात विविध भागात अवकाळी पावसाने (Unseasonal Rain ) हजेरी लावली आहे. या पावसाचा शेती पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसल्याचे चित्र आहे. मुंबईसह कोकण, उत्तर महाराष्ट्र, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच २८ एप्रिलपर्यंत देशाच्या पूर्व भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
( हेही वाचा : WHO चा मोठा दावा! भारतातील आणखी एका कंपनीचे कफ सिरप दूषित)
राज्यात अवकाळी पावसाचे (Unseasonal Rain) सावट
पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या ठिकाणी जोरदार वारे वाहून पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक या भागात सुद्धा जोरदार वारे वाहतील असे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, मराठवाड्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून गारपीट होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मराठवाड्याप्रमाणे विदर्भातही गारपीट होण्याची शक्यता आहे.
शेतीचे नुकसान
सध्या अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain ) राज्यातील शेती-पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पुढील पाच दिवस राज्यात कोणत्याही भागात उष्णतेच्या लाटेची शक्यता नसल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. पुन्हा एकदा हवामान विभागाकडून अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आल्याने शेतकऱ्यांपुढे नवे संकट उभे राहिले आहे. आंबा, द्राक्ष, केळी, संत्रा या फळबागांसह गहू, हरभरा, मका, मोहरी, ज्वारी या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
Join Our WhatsApp Community