उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. पक्षात कोणतीही महत्त्वाची जबाबदारी न मिळाल्याने त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे कळते.
( हेही वाचा : Mhada Lottery : म्हाडाच्या अनामत रकमेत वाढ होणार? अल्प-अत्यल्प गटांमध्ये नाराजी, अर्ज करणे महागणार)
शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’
शिवसेनेत फूट पडल्यानंतर सुषमा अंधारे यांनी ‘शिवसंवाद’ यात्रांच्या माध्यमातून एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांवर टीकेची राळ उठवण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे अंधारे यांना सडेतोड उत्तर देण्यासाठी शिवसेनेने त्यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे यांना पक्षप्रवेश दिला होता.
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर वाघमारे यांनी सुषमा अंधारेंवर गंभीर आरोप केले होते. आम्ही (सुषमा अंधारे) पंधरा वर्षे सोबत काम केले. त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. त्यांनी पक्षप्रवेश करू नये, असे मला वाटत होते. त्यांचा हा निर्णय मला पटला नाही. त्यामुळे आम्ही विभक्त झालो. सुषमा अंधारेंना इतिहासाची पुस्तकं कुणी दिली? हा खरा प्रश्न आहे, असेही ते म्हणाले होते.
पक्ष सोडण्याचा निर्णय का घेतला?
पक्षप्रवेशाच्या वेळी वाघमारे यांनी सुषमा अंधारेंच्या विरोधात निवडणूक लढणार असल्याचे म्हटले होते. “पक्ष जो आदेश देईल तो मला मान्य असेल. उद्या पक्षाने सांगितले निवडणूक लढा, तर सुषमा अंधारे असू दे किंवा इतर कोणीही मी निवडणूक लढेन,” असे वाघमारे म्हणाले होते.
परंतु, शिवसेनेकडून पक्षबांधणीत कोणतीही महत्त्वाची जबाबदारी दिली जात नसल्याने वैजनाथ वाघमारे नाराज होते. त्यामुळे त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याचे कळते. शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सोपवला आहे.
हेही पहा :
Join Our WhatsApp Community