चिपळूणच्या परशुराम घाटातील वाहतूक रात्री ‘या’ वेळेत राहणार बंद!

85

मुंबई-गोवा महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूणजवळ परशुराम घाटात चौपदरीकरणाचे काम सुरू असताना मंगळवारी दुपारी दरड कोसळली. त्यामुळे बंद झालेली वाहतूक सात तासांनी एकेरी मार्गावर सुरू करण्यात आली आहे. मात्र सावधगिरी म्हणून या घाटातील वाहतूक सायंकाळी ७ पासून सकाळी ७ पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.

दरड दुर्घटनेमुळे घाटात दोन्ही बाजूंनी वाहतूक कोंडी

मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात चौपदरीकरणाचे काम सुरू असतानाच आज सकाळी पावणे अकराच्या सुमारास दरड कोसळली. या दरडीखाली दोन पोकलेन आणि त्यांचे चालक अडकले आहेत. घटनास्थळी मदतीसाठी तात्काळ अन्य यंत्रणा दाखल झाली आहे. घाटातील मध्यवर्ती ठिकाणी चौपदरीकरणाकरिता डोंगर कटाई सुरू आहे. त्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा कामी लागली आहे. रस्त्याच्या वरील बाजूस पोकलेनने खोदाई केली जात असतानाच बाजूचा डोंगराचा भाग खाली आला. त्यामध्ये दोन पोकलेन अडकले. तसेच त्याचे चालकही त्यामध्ये अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी अन्य पोकलेन तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. दरड दुर्घटनेमुळे घाटात दोन्ही बाजूंनी वाहतूक कोंडी झाली. दरड हटवण्याचे काम सुरू करण्यात आले. त्यामुळे सात तासांनी एकेरी वाहतूक सुरू करण्यात यश आले हाते.

(हेही वाचा – मुंबईतील मंजूर शौचालयांमधील ३,२१८ शौचकुपांची कामे गुंडाळली!)

दरड कोसळल्याने ग्रामस्थांमध्ये पुन्हा भीती

याआधीही पावसाळ्यात परशुराम घाटात दरडीचा धोका निर्माण झाला होता. त्यामध्ये पेढे येथील एका घरावर दरड कोसळून तिघांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर चार दिवसांपूर्वीच एक भला मोठा दगड पेढे बौद्धवाडीतील घरावर येऊन मोठे नुकसान झाले होते. या घटनेनंतर राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी, ठेकेदार कंपनी आणि ग्रामस्थांची बैठक झाली. बैठकीत काही ठोस उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्याची अंमलबजावणी सुरू होण्यापूर्वीच दरड कोसळल्याने ग्रामस्थांमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.