ज्येष्ठ उद्योगपती पद्मभूषण राहुल बजाज यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शासनाच्या वतीने गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्वर्गीय पद्मभूषण राहुल बजाज यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार सुप्रिया सुळे, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांनीही स्वर्गीय बजाज यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
राजकीय वर्तुळातील मान्यवर, उद्योगपतींनी घेतले दर्शन
स्वर्गीय बजाज यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उपविभागीय अधिकारी संजय आसवले, पुणे शहर तहसीलदार राधिका बारटक्के यांच्यासह उद्योग, कला, साहित्य, सांस्कृतिक, सामाजिक व विविध क्षेत्रातील नागरीक उपस्थित होते. ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांचे शनिवारी, 12 फेब्रुवारी पुण्यात निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. बजाज यांचा पार्थिव देह आकुर्डीतील बजाज कंपनीतील निवासस्थानी दुपारी 3 वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला होता. दरम्यान, राहुल बजाज यांच्या अंत्यदर्शसाठी अनेक राजकीय वर्तुळातील मान्यवरांनी, उद्योगपतींनी सुद्धा सकाळपासूनच हजेरी लावली होती. अंत्यदर्शनासाठी कंपनीतील कामगार वर्ग तसेच विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरा उपस्थितीत होते. उद्योगपती बजाज यांचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार, राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, शिवसेनेचे सरचिटणीस मिलिंद नार्वेकर आणि इतर उद्योगपती यांनी बजाज यांच्या निवासस्थानी उपस्थित राहून बजाज यांना श्रद्धांजली अर्पण केली.
(हेही वाचा ‘या’ देशांत व्हॅलेंटाईन डे साजरा होत नाही! ‘रोमन कॅथलिक चर्च’नेही व्हॅलेंटाईनचे नाव यादीतून वगळले)
Join Our WhatsApp Community