मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांच्या सेवा निवासस्थानाचे निर्धारित वेळेत काम पूर्ण करा!

69

दररोज हजारो रुग्णांचे प्राण वाचवणाऱ्या शीव येथील लोकमान्य टिळक महापालिका सर्वसाधारण रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांची ही सेवा निवासस्थाने असून, या सेवा निवासस्थांनाचे काम निर्धारित वेळेत व दर्जेदाररितीने पूर्ण करावे, असे प्रतिपादन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले. शीव येथील लोकमान्य टिळक महापालिका सर्वसाधारण रुग्णालयाच्या सायन कोळीवाडा येथील सेवा निवासस्थानाच्या पुनर्विकास कामाचे भूमिपूजन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते आज ०६ मार्च रोजी सायन कोळीवाडा महापालिका कर्मचारी निवासस्थान, जयशंकर याग्निक मार्ग, सायन कोळीवाडा, सायन येथे पार पडले, त्यावेळी आयोजित कार्यक्रमात महापौर बोलत होत्या.

आयुक्तांचे मानले आभार

महापौर किशोरी पेडणेकर मार्गदर्शन करताना यावेळी म्हणाल्या की, कोविड काळामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चांगले काम केले आहे. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनामुळे कोरोना नियंत्रणात आणण्यात मोठ्या प्रमाणात यश आले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने मुंबईतील रस्ते, फुटपाथ, चौक यांचे सौंदर्यीकरण तसेच महापालिका रुग्णालय, शाळा यांची दर्जोन्नती करून मुंबईकरांना सेवा सुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे. महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांचा बौद्धिक व शारीरिक विकास होण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहे. महापालिकेच्या शाळेतील मुलांना फुटबॉलचे धडे देण्यात येत आहे. या सर्व कामांना गती दिल्याबद्दल महापौरांनी महापालिका आयुक्त यांचे आभार मानले.

( हेही वाचा: उकडतंय म्हणून मोकळी हवाही मुंबईकर घेऊ शकत नाहीत, का ते वाचा )

इतरांनाही प्रेरणा मिळावी

विरोधी पक्ष नेते तथा स्थानिक नगरसेवक रवी राजा यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले की, आरोग्यसेवेमध्ये मुंबई ही प्रथम क्रमांकावर असून महापालिका कर्मचाऱ्यांच्या सेवा निवासस्थानांचे बांधकाम हे माझ्या प्रभागात होत आहे. याबद्दल स्वतःला भाग्यवान समजतो. याठिकाणी सतरा माळ्यांचा तीन इमारती उभ्या राहत असून, संपूर्ण कर्मचारी अभिनंदनास पात्र असल्याचे ते म्हणाले. महापौर किशोरी पेडणेकर यांनी आपल्या संपूर्ण कार्यकाळात सर्वांना सोबत घेऊन काम केले आहे. त्याचप्रमाणे सर्व नगरसेवकांना सन्मान देऊन काम करत आहे. आज याठिकाणी ज्या इमारती उभ्या राहत आहेत त्या कामाचा दर्जा चांगला ठेवावा व या कामापासून इतरांनाही प्रेरणा मिळावी, अशी सदिच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

इमारती बांधण्याचे प्रस्ताव

शीव रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.मोहन जोशी यांनी आपल्या प्रास्ताविकातून कार्यक्रमाच्या आयोजनाची रूपरेषा मांडली. सद्यस्थीतीत असलेल्या इमारतींची संख्या ०७ इमारती (प्रत्येकी तळमजला ०३ मजले) आहे. सदनिकांची संख्या ही ११२ सदनिका (कर्मचारी निवासस्थान) आहे.  प्रस्तावित पुनर्बाधणीनंतर इमारतींची संख्या ०३ इमारती (प्रत्येकी तळमजला १७ मजले) असणार आहे. प्रस्तावित पुनर्बाधणीनंतर सदनिकांची संख्या ३९३ सदनिका (कर्मचारी निवासस्थान) 1-बीएचके राहणार आहे. एकूण बांधकामाचे क्षेत्र हे ३,२१,१८० चौ .फूट आहे.कामाचा कालवधी हा ०३ वर्षाचा आहे. लोकमान्य टिळक रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसाठी तळमजला १७ मजल्यांचे तीन इमारती बांधण्याचे प्रस्ताविले आहे. सदर इमारतीमध्ये प्रत्येकी १३१ सदनिका असून एकूण ३९३ सदनिका (कर्मचारी निवासस्थान) आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.