नागपूर, लातूर पाठोपाठ आता वसई-विरारमध्येही ओमायक्रॉन विषाणूने प्रवेश केला आहे. वसई-विरार येथे राहणा-या रुग्णासह मुंबईत सात नवे ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. मात्र पहिल्यांदाच आरोग्य विभागाने मंगळवारी नवी नोंद असलेल्या सहा रुग्णांना घरी विलगीकरणाचा सल्ला दिला आहे. राज्यातील ओमायक्रॉनबाधित रुग्णांचा आकडा आता २८ वर पोहोचला आहे.
८ पैकी एका रुग्णाचा दिल्ली आणि एकाचा राजस्थानात प्रवास
मंगळवारी आढळून आलेल्या एकाही रुग्णाने परदेशात प्रवास केल्याची नोंद नसल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. मात्र ८ पैकी एका रुग्णाने दिल्ली आणि एका रुग्णाने राजस्थानात प्रवास केल्याची नोंद आहे. आठही रुग्णांचे स्वॅब नमुने जनुकीय चाचणीच्या तपासणीसाठी डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात आले होते. ओमायक्रॉनची तपासणी पॉझिटिव्ह आल्याचा अहवाल मंगळवारी पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
(हेही वाचा आधी प्रस्तावावर शंका, तरीही अध्यक्षांनी मंजूर केला!)
- मंगळवारी नोंद झालेल्या ८ रुग्णांपैकी ३ स्त्रिया आणि ५ पुरुष रुग्ण आहेत
- या ८ रुग्णांचा वयोगट २४ ते ४१ वर्ष आहे
- ३ रुग्णांना लक्षणे नव्हती तर ५ रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे होती
- या रुग्णांच्या निकटवर्तीयांचा शोध सुरु आहे
- ७ रुग्णांचे लसीकरण पूर्ण झालेले आहे तर एकाचे लसीकऱण पूर्ण झालेले नाही