‘सबका साथ, सबका विकास’ हे वाजपेयींनाच शोभतं, राऊतांचा केंद्राला टोला

161

माजी पंतप्रधान, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची आज जयंती आहे. याच पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी बोलताना, शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले की, अटलबिहारी वाजपेयी हे हिंदुत्ववादी होते, पण ते धर्मांध नव्हते. हा देश सगळ्यांचा आहे, देशातील एकात्मता टिकली पाहिजे, याच भावनेने त्यांनी नेहमी काम केले. त्यामुळे जनता वाजपेयी यांच्याकडे एका पक्षाचा नव्हे, तर संपूर्ण देशाचा नेता म्हणून पाहत असते. ‘सबका साथ सबका विकास’ हे त्यांनाच शोभतं, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले.

भाजप पक्षाचे अडणवाणी आणि वाजपेयी हे स्तंभ

पंडित नेहरुंनंतर अटल बिहारी वाजपेयी हे सर्व राजकीय पक्षांचे ते लोकप्रिय नेते होते. ते आपल्या विचारधारेसोबत एकनिष्ठ होते. देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांचे कार्य आम्हाला जवळून पाहता आले. देशाचे नेतृत्व कसे असावे हा परिपाठ आम्हाला त्यांच्याकडून मिळाला. हिंदुत्वाच्या विचारधारेसोबत कधीही तडजोड न करता हा देश सगळ्यांचा आणि देशातील एकात्मतेवर भर देऊन राजकारण करणारे अटलबिहारी वाजयेपयी होते. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन भाजपा आणि शिवसेनेच्या झालेल्या युतीला वाजपेयी यांचे फार मोठे योगदान होते. बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे नाते होते. पंतप्रधान असताना, ते अनेक विषयांवरुन बाळासाहेबांसोबत चर्चा करत होते. आज जो भारतीय जनता पक्ष दिसत आहे त्याचे स्तंभ आहेत अडणवाणी आणि वाजपेयी. वाजयपेयींचे स्मरण आम्हाला कायम होत असते, असे संजय राऊत यावेळी म्हणाले.

 ( हेही वाचा :”बापाला दिलेला शब्द पाळण्यासाठी शेजारच्यांची मार्कशीट चोरायची नसते, तर…” )

पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची आज जयंती आहे. त्यानिमित्त देशभरातून त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. अटलबिहारी वाजपेयी यांच्या समाधीवर जाऊन पंतप्रधान मोदींनी त्यांना आदरांजली वाहिली. पंतप्रधान मोदींशिवाय राष्ट्रपती राम नाथ कोविंद, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि गृहमंत्री अमित शहा यांनीही माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.