रुग्ण वाढ तरीही रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण कमी

130

मुंबईतील रुग्णांची संख्या वाढत असल्याने पुन्हा एकदा जंबो कोविड सेंटर आणि महापालिकेची रुग्णालये कार्यान्वित करण्यात आली असली, तरी तेवढ्या प्रमाणात रुग्णालयात उपचारासाठी दाखल होण्याची गरज भासत नाही. रुग्ण वाढत असले, तरी उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याचे प्रमाण कमीच आहे. मुंबईकरांना कोरोना पॉझिटिव्ह झाला, तरी घाबरण्याचे कारण नाही. केवळ काळजी घेणे आवश्यक असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होते. ९० ते ९५ टक्के रुग्णांवर घरीच राहून उपचार करता येत असून रुग्णालयांमध्ये दाखल करण्याचे प्रमाण अत्यल्प असल्याचे स्पष्ट होत आहे.

खाटांच्या तुलनेत ७.८ व ९ टक्के रुग्ण दाखल

मुंबईत मागील काही दिवसांपासून कोविड बाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. दरदिवशी १५० ते २०० टक्क्यांनी रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने मुंबईतील यापूर्वी वापरात असलेली जंबो कोविड सेंटर आणि नव्याने बनवण्यात आलेली कोविड सेंटर कार्यान्वित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. परंतु मागील काही दिवसांमध्ये आढळून आलेल्या बाधित रुग्णांपैकी बहुतांशी रुग्ण हे घरीच उपचार घेताना दिसत आहे. मागील दोन दिवसांमधील आकडेवारी पाहता शुक्रवार व शनिवारी अनुक्रमे उपलब्ध खाटांच्या तुलनेत ७.८ व ९ टक्के रुग्ण दाखल झाले होते.

(हेही वाचा मुंबईत कोविड बाधितांची रुग्ण संख्या ६ हजार पार)

घाबरण्याचे कारण नसले तरी काळजी घ्या

मुंबई महापालिकेने कोविड बाधित रुग्णांच्या वाढीव संख्येमुळे विविध कोविड सेंटर आणि रुग्णालयांमध्ये ३० हजार ५६५ रुग्ण खाटा तयार करण्यात आल्या आहेत, त्यात शुक्रवारी आणि शनिवारी २,३०० व २,७६० रुग्णांना दाखल झाले होते. त्यामुळे कोरोना, ओमायक्रॉन, डेल्टा आदींचा संसर्ग वाढत असला तरी रुग्णालयांमध्ये दाखल करण्याइतपत रुग्णांची प्रकृती गंभीर होत नाही. त्यामुळे मुंबईकरांना घाबरण्याचे कारण नसले तरी काळजी घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे महापालिका डॉक्टरांचे म्हणणे आहे.

काय म्हणतात आरोग्य मंत्री?

कोविडसह ओमायक्रॉन व डेल्टा बाधित रुग्णांचा संसर्ग वाढत असल्यान नागरिकांनी लग्न सोहळा, धार्मिक व सामाजिक कार्यक्रम, राजकीय कार्यक्रमांमध्ये गर्दी करणे टाळावे असे आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना स्पष्ट केले. सध्या जेवढ्या कोविड चाचण्या करण्यात येत आहेत, त्याच्या दहा टक्के पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहे. मात्र, हे जरी प्रमाण कमी असले तरी ‘चलता है’ अशा अविभार्वात न राहता प्रत्येक नागरिकांनी संसर्ग टाळण्याच्यादृष्टीकोनातून योग्य ती प्रतिबंधात्मक काळजी घ्यायला हवी, असेही त्यांनी स्पष्ट केले. या वाढत्या रुग्ण संख्येचा आढावा घेऊन राज्याचे मुख्यमंत्री पुढील निर्णय घेऊन त्याबाबतची घोषणा करतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.