मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये पवित्र पोर्टलकरून शिफारस झालेल्या शिक्षक पदाच्या उमेदवाराची मुलाखत व अध्यापन कौशल्य चाचणी घेण्यात येत नाही. या उलट खासगी व्यवस्थापनाच्या शाळांप्रमाणे मुंबई महापालिकेला अशा प्रकारचे शासनाचे निर्देश नाही. मात्र तरीही महापालिकेने नव्याने सुरु केलेल्या मुंबई पब्लिक स्कूल आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांसाठी रिक्त जागांवर शिक्षकांची निवड केल्यानंतर महापालिकेच्या जिल्हा प्रशिक्षण केंद्रामार्फत अध्यापन व संभाषण कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देत शिक्षकांची वेगळी फळी निर्माण करण्यावर भर दिला आहे.
( हेही वाचा : एसटीचे १ हजार संपकरी कामगार कामावर रुजू! साताऱ्यात वाढल्या फेऱ्या )
इंग्रजी माध्यमाच्या शाळांत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देता यावे यासाठी इंग्रजी भाषेतून पदवी प्राप्त झालेल्या २५० व ३०० शिक्षकांची नेमणूकही करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षकांची जी भरती केली जाते, त्या शिक्षकांच्या निवडीची यादी प्राप्त झाल्यानंतर महापालिका प्रशासनाने आपल्या स्तरावरही या निवड झालेल्या शिक्षकांचे इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व, ज्ञान, संवाद कौशल्य यांचे मुल्यमापन करत प्रत्यक्ष मुलाखत घेऊन त्यांची नियुक्ती करण्यात यावी आणि या प्रक्रियेसाठी इंग्रजी भाषेतील तज्ज्ञ व्यक्तींची समिती गठीत करण्याची मागणी शिक्षण समिती सदस्य साईनाथ दुर्गे यांनी केली होती.
अध्ययन कौशल्य तपासत उमेदवाराची निवड
परंतु शिक्षण विभागाने याप्रकारची समिती गठीत करण्याच्या दुर्गे यांच्या मागणीला केराची टोपली दाखवत फेब्रुवारी २०१९ नुसार स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खासगी शाळेतील प्रचलित शिक्षण सेवक यांची भरती रद्द करून राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांसह खासगी व्यवस्थापनाच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शाळांमधील रिक्त पदे अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणीतील गुणांच्या आधारे भरण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्या अनुषंगाने शासनाकडून पवित्र पोर्टल या संगणकीय प्रणालीद्वारे प्राप्त झालेल्या शिफारसपात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करून अर्हता, आरक्षण व विषयनिहाय निवड करण्यात आलेली आहे. हे शासनाचे निर्देश फक्त खासगी व्यवस्थापनाच्या शाळांना उमेदारवारांच्या मुलाखती व त्यांचे अध्ययन कौशल्य तपासून त्या आधारे निवड करण्याची मुभा देण्यात आलेली आहे, असे म्हटले आहे.
( हेही वाचा : बिबट्याचे हल्ले रोखण्यासाठी ‘आरे’त स्वच्छता अभियान! )
महापालिकेच्या मुंबई पब्लिक स्कूलच्या इंग्रजी माध्यमातील ३३९ रिक्त जागांसाठी आणि इंग्रजी माध्यमांकरता रिक्त असलेल्या ३२० अशाप्रकारे एकूण ६५९ पदांकरता २०१७ मध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीवर जाहिरात देण्यात आली होती. यामध्ये मुंबई पब्लिक स्कूलकरता ५७ आणि इंग्रजी माध्यमाकरता २७५ उमेदवारांची शासनाच्या शिफारशीनुसार निवड करण्यात आली होती. या निवड झालेल्या उमेदवारांपैकी शाळा निवड समुपदेशनासाठी हजर राहिलेल्या मुंबई पब्लिक स्कूलसाठी ४६ आणि इंग्रजी माध्यमाकरता २४६ उमेदवारांची नियुक्ती करण्यात आली होती, असेही शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
Join Our WhatsApp Community