महानगरापासून काही अंतरावर असलेल्या चंद्रपूर वेकोली क्षेत्रातील नांदगाव बंकरमधून स्लॅग (चुरी) कोलच्या जागी स्टीम कोलची (चांगल्या दर्जाच्या कोळश्याची) उचल होत असल्याची, धक्कादायक घटना मंगळवारी उघडकीस आली आहे. परिणामी त्यामुळे मायनिंग रॉयल्टी माध्यमातून शेकडो कोटींचे नुकसान होत असल्याचा, आरोप माजी खासदार नरेश पुगलिया यांनी गुरुवारी एका पत्रकार परिषदेत केला. दरम्यान यामुळे सदर जिल्हा आगामी काळात धनबाद जिल्हा होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री, महसूलमंत्री, गृहमंत्री व केंद्रीय कोळसा मंत्र्यांना पत्र लिहिले आहे.
मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार
विदर्भातील चंद्रपूर यवतमाळ व नागपूर या तीन जिल्ह्यांमध्ये दगडी कोळशाचे (स्टीम कोल) साठे मोठ्या प्रमाणात आहेत. रॉयल्टीमुळे दरवर्षी चंद्रपूर, यवतमाळ व नागपूर जिल्ह्याचा मिळून पंधराशे कोटीच्यावर राज्य सरकारला खनिज निधी प्राप्त होतो. त्यातून ३० टक्के निधी त्या-त्या जिल्ह्याला मेजर मिनरल्स रॉयल्टीच्या नावाखाली मिळत आहे. परंतु वेकोलिमध्ये कोळशाचा मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असून, यामध्ये कोळसा माफिया काही वर्षांपासून सक्रिय झाले आहेत.
( हेही वाचा: कोरोना लसीचे दोन डोस नाही, तर रेल्वे प्रवास नाही; मनाई कायदेशीरच! )
राज्य सरकारला राॅयल्टी द्या
चंद्रपूर जिल्ह्यात वेकोलिच्या पाच क्षेत्रांमध्ये अनेक खाणी असून, या खाणीतील सुमारे ३५ टक्के चांगला कोळसा, कोळसा माफिया दादागिरीच्या नावावर धनबाद स्टाइलने हजारो टन कोळशाची अफरातफर दिवशी करत असल्याचा, आरोप नरेश पुगलिया यांनी केला. त्यामुळे वेकोलिच्या परवान्यावर अवलंबून न राहता राज्य सरकारतर्फे महसूल विभाग, गृह विभाग व वेकोली या तिन्ही विभागांनी कोळश्याच्या प्रतवारीनुसार राज्य सरकारला रॉयल्टी मिळाली पाहिजे अशी व्यवस्था करावी. परिणामी त्यामुळे मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या कोळसा चोरीला आळा घालून, राज्य सरकारचे होणारे नुकसान टाळता येईल व जिल्ह्याला कोल माफियापासून वाचवता येईल असे पुगलिया यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community