जुगाराच्या नादी लागलेल्या एका नामांकित बँकेच्या मॅनेजरने स्वतःचे घर दाव्यावर लावल्यानंतर त्याने बँकेच्या १ कोटी ८० लाख रुपये जुगारात हरल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. जुगाराच्या व्यसनापायी अखेर या मॅनेजरला तुरुंगात जाण्याची वेळ आली आहे. बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी माटुंगा पोलिसांनी या बँक मॅनेजरला अटक केली आहे.
असा घडला प्रकार
विशाल गुरुडू असे या बँकेच्या डेप्युटी मॅनेजरचे नाव आहे. दक्षिण मुंबईतील सामान्य घरात वाढलेला विशाल गुरुडू हा आपल्या शिक्षणाच्या जोरावर एका नामांकित राष्ट्रीयीकृत बँकेच्या दादर ब्रँचमध्ये डेप्युटी मॅनेजर म्हणून नोकरीला लागला होता. विशाल हुशार असल्यामुळे बँकेकडून त्याला प्रशिक्षनासाठी पाठवले होते. बँकेच्या दादर ब्रँचचा संपूर्ण व्यवहार हाताळणारा विशाल गुरुड याला मात्र सट्टेबाजीचे व्यसन जडले होते.
“टेलिग्राम अॅपद्वारे, विशाल ‘एमके ऑनलाइन फॅमिली ग्रुप’मध्ये आला होता आणि त्याची ओळख सट्टेबाजांशी झाली होती, त्यांनी त्याला डायमंडेक्सच डॉट कॉम, डेल्टाएक्सच डॉट कॉम या वेबसाइटची लिंक दिली होती,” असे या प्रकरणाचे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक विनोद धुर्वे यांनी सांगितले. “त्याच्याकडे एक व्हॉट्सअॅप नंबर होता त्याद्वारे तो फुटबॉल, क्रिकेट सामने किंवा कोणत्याही चालू खेळावर पैज लावायचा” असे धुर्वे यांनी सांगितले. या सट्टेबाजीमुळे त्याला दक्षिण मुंबईतील त्याचे स्वतःचे घर विकावे लागले. त्यामुळे आता तो वरळीत भाड्याच्या घरात राहण्यास आहे. एवढं सर्व होऊन देखील त्याचा जुगाराचा नाद काही केल्या गेला नाही, गमावलेले पुन्हा मिळवण्याच्या नादापायी त्याने बँकेचे पैसे जुगारावर लावण्यास सुरुवात केली. बँकेत दिवसभरात भरली जाणारी रोकड पैकी काही रोकड तो मित्र, नातलग यांच्या खात्यावर वळते करून त्यांच्या खात्यावरून हे पैसे ऑनलाईन जुगारावर लावत होता.
(हेही वाचा – लगेच अभ्यास नको, आधी मुलांना शाळेत रुळू द्या!)
विशालने एकूण ११ मित्र नातलग यांच्या खात्याचा वापर करून बँकेचे सुमारे १ कोटी ८० लाख रुपये जुगारावर हरला. अखेर बँकेत एवढ्या मोठ्या रक्कमेचा गोंधळ बँकेच्या मुख्य मॅनेजरच्या लक्षात येताच त्यांनी विशाल गुरुडूकडे याबाबत चौकशी केली असता मी तपासून बघतो असे उत्तर विशालने दिले. दरम्यान बँकेने माटुंगा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी या अर्जावरून तपास करून गुन्हा दाखल करून विशाल गुरुडू याला अटक करण्यात आली. त्याने सर्व कबुली पोलिसांकडे दिली आहे. मात्र जुगारात हरलेली बँकेची रक्कम कशी मिळवायची हा प्रश्न पोलिसांना पडला आहे.
Join Our WhatsApp Community