जम्मू-काश्मीरसाठी असलेले वादग्रस्त 370 कलम रद्द केल्यानंतर मोदी सरकारचं देशभरात कौतुक करण्यात आलं होतं. आता शनिवारी नागपुरात झालेल्या एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलताना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॅा. मोहन भागवत यांनी याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. जम्मू-काश्मीर येथे राहणा-या समाजाला भारताचं नागरिक व्हायचं आहे. त्यामुळे त्यांच्यापर्यंत आपल्याला पोहोचायला हवं जेणेकरुन त्यांना भारतासोबत एकरुप करता येईल, असं ते यावेळी म्हणाले.
अशी होती परिस्थिती
नुकताच आपण जम्मू-काश्मीरचा दौरा केला आणि त्याठिकाणी विकासाचा मार्ग मोकळा झाला असल्याचं भागवत म्हणाले. गेल्या महिन्यात मुंबईत एका कार्यक्रमादरम्यान जम्मू-काश्मीरच्या मुस्लिम विद्यार्थ्यांचं असं म्हणणं होतं की, त्यांना भारताचा भाग बनून राहायचं आहे आणि आता ते कोणत्याही समस्येशिवाय भारतीय बनून राहू इच्छितात, असं त्यांनी नमूद केलं. यापूर्वी जम्मू आणि लडाखला भेदभावाचा सामना करावा लागत होता. काश्मीर खोऱ्यात खर्च होणाऱ्या साधनसंपत्तीच्या वापराचा ८० टक्के हिस्सा हा स्थानिक नेत्यांच्या खिशात जात होता आणि लोकांना त्याचा कोणताही लाभ मिळत नव्हता, असा आरोपही त्यांनी केला.
(हेही वाचाः हिंदू स्वतःच स्वतःचे धर्मांतर करून घेतात! मोहन भागवतांचे महत्वपूर्ण विधान)
परिस्थिती सुधारतेय
आता यामध्ये बदल घडत आहे आणि त्या ठिकाणचे लोक आनंदानं जीवन जगत आहेत. आपल्या मुलांच्या हाती पुस्तकांऐवजी दगड देणाऱ्या लोकांनी आता दहशतवाद्यांचं कौतुक बंद केलं आहे. आता तिथे निराळं वातावरण आहे. येणाऱ्या काळात त्या ठिकाणी निवडणुका होतील आणि नव्या सरकारची स्थापनाही होईल, असंही भागवत यांनी नमूद केलं आहे.
Join Our WhatsApp Community