अंधेरीतील एन.एस.फडके मार्ग आणि तेली गल्ली जंक्शन येथे ग्रेड सेपरेटरचे काम ऑक्टोबर २०१८ पासून हाती घेण्यात आले आहे. हे २४ महिन्यांमध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु आधीच दोन वर्ष विलंबाने सुरु केलेल्या या कामांच्या कंत्राटदाराला अतिरिक्त कामांचा भार वाढवून कंत्राटदाराला अतिरिक्त ३२ कोटी रुपयांचा खर्च विनानिविदा करण्यात आल्याची बाब आता समोर आली.
नवीन कंत्राटदाराची नेमणूक न करता काम सुरू
अंधेरी पूर्व येथील ना.सी.फडके मार्ग आणि तेली गल्ली जंक्शन येथे महापालिकेच्यावतीने पुलाची उभारणी करण्यासाठी मार्च २०१६ रोजी कंत्राट कामाला मंजुरी देण्यात आली आहे. १२४.१७ कोटी रुपयांचे हे कंत्राट काम मंजूर करण्यात आले होते. हे काम २४ महिन्यांमध्ये पूर्ण करणे अपेक्षित असतानाच कंत्राटदार जे. कुमार यांनी या कामाला १ ऑक्टोबर २०१८ पासून सुरुवात करण्यात आली आहे. मात्र, कंत्राटदाराने कामाला सुरुवात करण्यापूर्वीच ३ जुलै २०१८ रोजी अंधेरी रेल्वे स्थानकावरील गोपाळकृष्ण गोखले रेल्वे पुलाच्या पदपथाचा काही भाग कोसळला. या अपघातानंतर गोखले पुलाच्या दोन्ही बाजुच्या उताराचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात आले. स्ट्रक्चरल ऑडीट सल्लागार सी.व्ही. कांड यांच्या मार्फत करण्यात आलेल्या अहवालात या पुलाचे दोन्ही बाजुंचे उतारमार्ग जीर्ण असल्याचे आढळून आले. त्यामुळे प्रशासनाने या कामांसाठी नवीन कंत्राटदाराची नेमणूक न करता तेली गल्लीच्या पुलाच्या बांधकामासाठी निवड केलेल्या जे. कुमार कंपनीकडून हे काम करून घेतले.
(हेही वाचा – आता महापालिकेला घेता येणार मुंबईतील ‘अनधिकृत’ बांधकामांचा शोध!)
कंत्राट रकमेपेक्षा २६ टक्के रक्कमेत वाढ
तसेच तेली गल्ली पुलाच्या बांधकामाचा पाया रचताना त्यामध्ये पाण्याची जलवाहिनी असल्याने आराखड्यात बदल करण्यात आले. या भूमिगत वाहिन्यांवरून पोर्टल फ्रेमचे बांधकाम या दोन्ही कामांमुळे तेली गल्लीच्या पुलाच्या बांधकामाचा खर्च वाढल्याची बाब समोर आली आहे. स्थायी समितीने मंजूर केलेल्या कंत्राट रकमेपेक्षा २६ टक्के रक्कम आता वाढली आहे. त्यामुळे ३२.१८ कोटींची अतिरिक्त वाढ झाली आहे. त्यामुळे तेली गल्ली पुलाच्या बांधकामाचा खर्च १२४ कोटी रुपयांवरून १५६.१५ कोटी रुपये एवढा झाला आहे. या कंत्राटाचा कालावधी प्रत्यक्षात काम सुर झाल्यापासून २४ महिने अर्थात ३० सप्टेंबर २०२० पर्यंत होता. परंतु इतर कामांची सोपवलेली जबाबदारी आणि बांधकामात केलेल्या बदलामुळे कंत्राट कामांच्या खर्चाबरोबरच या पुलाच्या बांधकामाचा कालावधीही १८ डिसेंबर २०२१ पर्यंत वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community