भारताला आणखी एका लसीची साथ! कोरोनावर ‘सिंगल’ डोसने होणार मात!

कोरोनावर जॉन्सन अँड जॉन्सनची लस ८५ टक्के प्रभावी असल्याचा कंपनीचा दावा आहे.

102

देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता निर्माण झाली आहे. देशात विविध राज्यात कोरोनाची रुग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी लसीकरणावर भर देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यासाठी आता सरकारने जॉन्सन अँड जॉन्सनच्या लसीला आपातकालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे यानिमित्ताने भारतात कोरोना प्रतिबंधात्मक लसींची संख्या ५ झाली आहे.

यापुरवही भारतात कोविशिल्ड, कोवॅक्सिन, स्पुटनिक आणि मॉडर्ना या लसींना परवानगी देण्यात आली होती. आता कोरोनाच्या लसीमध्ये आणखी एक भर पडली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी यासंदर्भात ट्विटरवरून घोषणा केली आहे. भारताने आपली व्हॅक्सिन बास्केट वाढवली आहे. जॉन्सन अँड जॉन्सनच्या सिंगल डोस कोविड-१९ लसीला भारतात आपातकालीन वापरास मंजुरी देण्यात आली आहे. आता भारतात कोरोनाविरोधात ५ लसींना परवानगी आहे. यामुळे देशाच्या कोरोनाविरोधातील लढ्याला पाठबळ मिळेल’, असे ट्वीट मनसुख मांडवीय यांनी केले आहे.

पहिलीच सिंगल डोस लस!

भारतात कोरोना प्रतिबंधात्मक लसीमध्ये स्पुतनिक-व्ही नावाची सिंगल डोसची लस येणार होती, नंतर आता जॉन्सन अँड जॉन्सनच्या सिंगल डोस लसीला परवानगी दिली आहे. भारतात परवानगी मिळालेली जॉन्सन अँड जॉन्सन ही पहिलीच सिंगल डोस लस असून दोनच दिवसांपूर्वी कंपनीने केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवला होता. या लसीचा एक डोस प्रभावशाली असल्याचा कंपनीचा दावा आहे. कोरोनावर जॉन्सन अँड जॉन्सनची लस ८५ टक्के प्रभावी असल्याचा कंपनीचा दावा आहे. तसेच साउथ आफ्रिका आणि ब्राझील व्हेरिएंटवरही प्रभावशील असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

(हेही वाचा : होय! तेजस ठाकरे राजकारणात येतोय!)

५० कोटी लसीकरणाचा टप्पा गाठला! 

कोरोनाप्रतिबंधात्मक ५व्या लसीमुळे देशात लसीकरणाला वेग येणार आहे. शुक्रवारीच भारताने ५० कोटी जणांच्या लसीकरणाचा टप्पा गाठला आहे. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक करणारे ट्वीट केले आहे. कोरोनाविरोधातल्या भारताच्या लढ्याला एक प्रबळ प्रेरणा मिळाली आहे. आपल्या लसीकरण मोहिमेने ५० कोटींचा टप्पा पार केला आहे. मला आशा आहे की यात उत्तरोत्तर भर पडत जाईल आणि सर्वांना मोफत लसीकरण मोहिमेमध्ये आपल्या नागरिकांना लस दिली जाईल, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.