आगामी पालिका निवडणुकांमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणूक लढण्याची चर्चा वरिष्ठ पातळीवर सुरू असतानाच, स्थानिक पातळीवर मात्र वादाची ठिणगी पडली आहे. त्याचे कारण म्हणजे राष्ट्रवादीचे नेते आणि सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलेले वक्तव्य. सोलापुरातील एका कार्यक्रमात बोलताना दत्तात्रय भरणे यांनी मुख्यमंत्र्यांबाबत एक वक्तव्य केले होते. त्यावरुन सोलापूरचे शिवसेना पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाले असून, शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांनी पालकमंत्री भरणे यांना दम दिला आहे.
औकादीत राहून शब्द वापरा
पालकमंत्री भरणे मामा तुम्ही तुमच्या औकादीत राहून शब्द वापरा. आम्ही बाळासाहेब ठाकरे व उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिक आहोत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जीवावर तुम्ही सत्तेवर आला आहात. तुम्हाला तर जनतेने फेकून दिले होते, हे विसरू नका. तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या विरोधात अशी वक्तव्य करत आहात. तुमच्यात हिम्मत असेल आणि तुम्हाला आमच्या शिवबंधनाची ताकद पहायची असेल, तर सोलापूर जिल्ह्याची हद्द उजनी धरण ओलांडून दाखवा, असा इशाराच सावंत यांनी भरणे यांना दिला आहे.
(हेही वाचाः दिल्लीत बस्तान बसवण्यासाठी ‘धनुष्या’ला हवाय ‘हात’!)
योग्य वेळी शिक्षा देणारच
फक्त पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आदेश आहे आणि राज्यात महाविकास आघाडी आहे. आघाडीला तडा जाईल असे वक्तव्य कोणत्याही शिवसैनिक किंवा पदाधिकाऱ्यांनी करायचे नाही, या एका बंधनात राहून आम्ही खाली मान घालून गप्प बसलो आहोत. पण त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही आमच्या छाताडावर बसून कोणत्याही पद्धतीने नाचावे आणि आमच्या पक्षप्रमुखांबाबत गलिच्छ भाषा वापरावी. तुमच्या या वक्तव्याची योग्य वेळी योग्य ती शिक्षा दिल्याशिवाय हा शिवसैनिक शांत राहणार नाही, असा इशाराही सावंत यांनी दिला.
भरणेंना फिरू देणार नाही
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आमचे दैवत आहेत. त्यांच्याबाबत पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी काढलेले उद्गार निषेधार्ह आहे. अशा बेताल वक्तव्य करणाऱ्या पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना सोलापुरात फिरू देणार नाही, असा इशारा शिवसेनेचे पंढरपूर विभाग जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांनी दिला आहे.
(हेही वाचाः राज्यात रस्ते विकासकामांत शिवसेना लोकप्रतिनिधींचा खोडा! गडकरींचा लेखी आरोप)
वादाचे कारण काय?
गटनेत्यांनी, नगसेवकांनी, आयुक्तांनी मला परवानगी दिली आहे. इथे चांगले गार्डन आपल्याला करायचे आहे. त्यासाठी आपल्याला एक कोटी रुपये निधी द्यायचा आहे. तुमचा प्रस्ताव कधी येईल मला? असे बोलत असताना एका महिला पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचे नाव घेतले असता, ते मुख्यमंत्र्यांचे जाऊ द्या, मरु द्या, आपले आपण करु. मुख्यमंत्र्यांकडून आपण मोठा निधी घेऊ, आपण आपल्या पातळीवरुन सुरुवात करू. कलेक्टर आहेत, तुम्ही आहेत, आयुक्त आहेत. आपण सुरुवात करुया, असे वक्तव्य दत्तात्रय भरणे यांनी केले होते. त्यानंतर वाद निर्माण झाला. भरणे यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल केलेल्या वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री आमचे नेते आहेत, त्यांच्यावर माझे प्रेम आहे. माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला, असे म्हणत दत्तात्रय भरणे यांनी दिलगिरी व्यक्त केली.
Join Our WhatsApp Community