शरद पवार हे अनेक वर्षे काँग्रेसच्या हवेलीत राहिले आहेत. पण ही माडी मोडकळीस आल्याचे कळताच त्यांनी माडी सोडली. त्यानंतर पवारांनी राष्ट्रवादीच्या नावाने नवीन माडी बांधली. आता पवारांनी काँग्रेसच्या माडीलाच टेकू दिलेला आहे. तुमची माडी कधीही पडू शकते हे त्यांनी दाखवून दिले आहे, अशा शब्दांत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी काँग्रेसवर टीका केली. शरद पवार यांनी काँग्रेसवर टीका करण्यापेक्षा काँग्रेसच्या झेंड्याखाली यावे आणि काँग्रेसची शक्ती वाढवावी, अशी ऑफर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. त्यानंतर बराच वाद निर्माण झाला आहे. त्यामध्ये आता दानवे यांनी उडी घेतली आहे.
ईडी, सीबीआय काँग्रेसची देन!
ईडी आणि सीबीआय ही काँग्रेसची देन आहे. काँग्रेसच्या काळातच अशोक चव्हाण यांची सीबीआय चौकशी झाली होती. लालू प्रसाद यादव यांची चौकशी झाली होती. आपल्याच लोकांना काँग्रेसने चौकशी केली होती, असे सांगत या यंत्रणा त्यांना तक्रारी मिळतात. त्यानुसार त्या कारवाई करतात. सर्व यंत्रणा या स्वतंत्र यंत्रणा आहेत, असेही दानवे म्हणाले. केंद्र सरकारने राज्यांना ओबीसी आरक्षणाबाबतचा अधिकार दिला आहे. त्यामुळे राज्य सरकारने आता त्याबाबतची पावले उचलण्याची गरज आहे, असे सांगतानाच भाजप आधी ओबीसींसाठी आरक्षित असलेल्या जागेवर ओबीसींना उमेदवारी देईल. अनेक ठिकाणी तर आधीच फॉर्म भरण्यात आले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Join Our WhatsApp Community