मुंबईकरांच्या नशिबी रस्त्यांवरील खड्ड्यांचे भाग्य आलेले असतानाच, आता पदपथ(फूटपाथ)वरुनही धड चालता येत नाही. संपूर्ण मुंबईत फूटपाथ पॉलिसीची अंमबजावणी केली जात नसून, त्यावरुन नागरिकांना धडपडत चालावे लागते. मुंबई महापालिकेच्या सभागृहनेत्या विशाखा राऊत यांच्या प्रभाग क्रमांक १९१ मधील टी.एच. कटारिया मार्ग आणि लेडी जमशेटची मार्गावरील फूटपाथवरचे पेव्हर ब्लॉक मागील दोन वर्षांपासून काढून ठेवण्यात आले आहेत.
पण आजतागायत या फूटपाथची सुधारणा करण्यात न आल्याने आजही रहिवाशांना मातीतील खड्ड्यातून अडखळत चालावे लागत आहे. जर सभागृहनेत्यांच्या प्रभागात ही अवस्था असेल तर संपूर्ण मुंबईतील इतर नगरसेवकांच्या प्रभागांमध्ये काय अवस्था असेल, याची कल्पना करू शकत नाही.
(हेही वाचाः किती दिवस आदळत, आपटत चालणार? फोटो काढा, आम्हाला पाठवा)
दोन महिन्यांनंतरही सुधारणा नाही
मुंबईत रस्त्यांवरील खड्ड्यांप्रमाणेच फूटपाथचीही अवस्था झाली आहे. तुटलेल्या, फुटलेल्या तसेच उखडलेल्या लाद्यांमुळे नागरिकांना फूटपाथवरुन धड चालता येत नसल्याने, हिंदुस्थान पोस्टने मोहीम राबवली आहे. या मोहिमेची सुरुवात मुंबई महापालिकेच्या सभागृहनेत्या विशाखा राऊत यांच्या प्रभागापासूनच सुरू केली जात आहे. यामध्ये प्रभाग क्रमांक १९१ मध्ये टी.एच.कटारिया मार्ग आणि लेडी जमशेटची मार्ग येथे नूतनीकरणाच्या नावाखाली फूटपाथवरील लाद्या काढल्या. दोन महिने उलटत आले तरी या फूटपाथची सुधारणा झालेली नसल्याचे प्रकरण समोर आले आहे.
फूटपाथवरही खड्डे
माटुंगा रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडे असलेल्या संत विश्वेश्वरय्या उड्डाणपुलापासून पुढे सुरू होणाऱ्या टी.एच. कटारिया मार्गाच्या डावीकडे असलेल्या फूटपाथवरील लाद्या दोन महिन्यांपूर्वी काढण्यात आल्या. या चौकापासून ते पुढे संदेश हॉटेल, महाराष्ट्र बँक, समाधान हॉटेल व पुढे काशीविश्वेश्वर मंदिरापर्यंत असलेल्या फूटपाथच्या लाद्या काढलेल्या असून, त्या दोन महिने झाले तरी बसवल्या नाही किंवा त्याचे सिमेंट काँक्रिटीकरणही करण्यात आले नाही. या फूटपाथवर मातीमुळे अनेक ठिकाणी खड्डे निर्माण झाले आहेत, तर काही ठिकाणी दगडांमुळे नागरिकांना धड चालताही येत नाही. त्यामुळे या भागातील नागरिक त्रस्त आहेत.
(हेही वाचाः साडेपाच वर्षांत पदपथांची सुधारणा किती?)
सभागृहनेत्यांचे दुर्लक्ष
या फूटपाथवरच्या लाद्या काढल्यानंतर याठिकाणी टाटाची केबल टाकण्यात आली. परंतु ते कामही होऊन महिना ते दीड महिना उलटला, तरीही महापालिकेला सुधारित धोरणानुसार या फूटपाथचे सिमेंट काँक्रिटीकरण करता आले नाही. तसेच स्थानिक नगरसेविका व सभागृहनेत्या विशाखा राऊत यांचेही याकडे लक्ष नाही. विशेष म्हणजे १५ मे नंतर पावसाळा संपेपर्यंत कोणालाही कोणत्याही प्रकारची युटीलिटी टाकण्यासाठी खोदकाम करण्यास परवानगी दिली जात नाही. परंतु याठिकाणी पदपथाच्या लाद्या पावसाळ्यात काढून त्याठिकाणी केबल टाकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या लाद्या केवळ केबल टाकण्यासाठी खोदकामादरम्यान काढल्याचे येथील दुकानदारांचे म्हणणे आहे.
फूटपाथवर पेव्हरब्लॉक, रॅबिटचा ढीग
लेडी जमशेटजी मार्गावरील सिटी लाईट सिनेमा, आयडीबीआय बँक ते पुढे राजाराणी ट्रॅव्हल्सच्या इमारतीपर्यंत लाद्या काढून दोन महिने उलटत आले तरी त्याची सुधारणा झालेली नाही. विशेष म्हणजे तीन वर्षांपूर्वी याच पट्ट्यांमध्ये पेव्हरब्लॉक बसवण्यात आले होते. तत्कालीन आयुक्त अजोय मेहता यांनी सर्व फूटपाथचे पेव्हरब्लॉक काढून सिमेंट क्राँक्रिटीकरण करण्याचे परिपत्रक जारी केल्यानंतर हे काम पार पडले होते. परंतु तेच पेव्हरब्लॉक आता काढून टाकल्यानंतरही दोन महिने त्याकडे लक्ष दिले जात नाही. याठिकाणी काढलेल्या पेव्हरब्लॉकचे, रॅबिटचे ढीग जमा करुन ठेवण्यात आले आहेत. ज्यावर कचरा टाकला जात असून यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरत असल्यामुळे नागरिक त्रस्त आहेत.
(हेही वाचाः क्लीन अप मार्शलच्या नाड्या महापालिका आवळणार, घेणार ‘हा’ निर्णय)
चांगल्या लाद्या काढल्या…
Join Our WhatsApp Communityयाठिकाणच्या सर्व लाद्या सुस्थितीत होत्या, तरीही त्या काढण्यात आल्या. पण त्यानंतर हे काम तातडीने होणे आवश्यक असतानाही दीड ते दोन महिने झाले तरी या कामाला गती नाही. याबाबत १५ दिवसांपूर्वी आपण स्वत: शिवसेना शाखेत जाऊन तक्रार दिली होती. आज या खोदलेल्या फूटपाथवरुन चालताना ज्येष्ठ नागरिकांचे हाल होत आहेत, त्यांना धड चालताही येत नाही. त्यामुळे जर आपल्याला हे काम वेळेवर करायचे नव्हते तर आपण या चांगल्या लाद्या का काढल्या?
-रुपेश जैन, दुकानदार