जालना येथे एका रुग्णालयात जाऊन भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस शिवराज नारियलवाले या तरुणाला पोलिसांनी लाठ्या काठ्यांनी अमानुष मारहाण केली. याचे राजकीय पातळीवर तीव्र पडसाद उमटले. पोलिस मारहाण करत असलेला व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यावर सर्वसामान्यांमधूनही संतप्त प्रतिक्रिया येऊ लागली. त्यामुळे अखेर मारहाण करणाऱ्या ५ पोलिसांना पोलिस अधीक्षक विनायक देशमुख यांनी निलंबित केले, तसेच अतिरिक्त पोलिस अधीक्षकांच्या माध्यमातून या प्रकरणाची चौकशी करण्याचा आदेश दिला.
(हेही वाचा : भाजप पदाधिकाऱ्याला पोलिसांकडून अमानुष मारहाण! निलंबनाची मागणी!)
काय आहे प्रकरण?
१० एप्रिल रोजी दर्शन देवावले या तरुणाचा अपघात झाल्याने त्याला जळगावातील दीपक रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस शिवराज नारियलवाले हे त्या ठिकाणी आले असता पोलिस त्याठिकाणी मयत तरुणाच्या नातेवाईकांना शिवीगाळ करत होते, याचे शिवराज चित्रीकरण करत होते, म्हणून पोलिसांनी नारियलवाले यांना लाठ्याकाठ्याने अमानुष मारहाण केली, अक्षरशः काठ्या तुटेपर्यंत मारले. याचा सोशल मीडियातून तीव्र शब्दांत निषेध होत होता. त्यामुळे ही मारहाण करणाऱ्या पोलिसांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, अशी मागणी भाजपचे आमदार अतुल भातखळकर, आमदार राम सातपुते, भाजपचे आमदार बबनराव लोणीकर, चित्रा वाघ यांनी केली होती. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याना पत्र लिहून कारवाईची मागणी केली होती.
Join Our WhatsApp Community