आजवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या प्रकल्पाला स्थगिती दिल्याचे आपण ऐकले असेल. पण आता तर त्यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील निर्णयाला स्थगिती देण्याचे काम केले आहे. यामुळे आता महाविकास आघाडीमध्ये ठिणगी पडण्याची शक्यता आहे.
आव्हाडांच्याच निर्णयाला स्थगिती
टाटा कॅन्सर रुग्णालयाला शंभर सदनिका देण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी घेतला होता. मात्र त्यांच्या निर्णयाला मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे. मुंबईतील परळ विभागात हे कॅन्सर रुग्णालय आहे. या रुग्णालयात उपचारासाठी देशभरातून रुग्ण येत असतात. उपचारासाठी पुढील तारखेला येण्याचा खर्च त्यांना परवडत नसल्यामुळे, अनेक रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक रुग्णालयाच्या फुटपाथवर राहतात. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची ही दयनीय अवस्था पाहून, आव्हाड यांनी रुग्णालयाला म्हाडाच्या शंभर सदनिका देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता मुख्यमंत्र्यांनी त्या निर्णयाला स्थगिती दिली आहे.
(हेही वाचाः अखेर महाविकास आघाडीचे ठरले! नाराजी दूर करण्यासाठी हा काढला मार्ग!)
म्हणून दिली स्थगिती
शिवसेनेचे शिवडीचे आमदार अजय चौधरी यांनी याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाकडे तक्रार केली आहे. त्यामुळे यावर तपास करुन अहवाल सादर करावा, तोपर्यंत स्थगिती देण्यात यावी,अ सा शेरा मारत या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. अजय चौधरी यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले होते की, मी प्रतिनिधित्व करत असलेल्या शिवडी विधानसभा मतदार संघामधील सुखकर्ता को.ऑप.हौ.सोसायटी व विघ्नहर्ता को.ऑप.हौ.सोसायटी या पुनर्रचित इमारतीमध्ये ७५० मराठी कुटुंब राहत आहेत. या इमारती विकास नियंत्रण नियमावली ३३ (९) अंतर्गत पुनर्विकसित करण्यात आल्या असल्याने, त्या ठिकाणी म्हाडा प्राधिकरणास सदनिका उपलब्ध करुन देण्यात आल्या. या सदनिका म्हाडा मार्फत तयार करण्यात आलेल्या बहुत सूची मधील रहिवाशी व संक्रमण शिबीरातील रहिवाशी यांना कायमस्वरुपी राहण्याकरता देणे अपेक्षित होते. परंतु सदनिका त्यांना वितरित न करता कॅन्सरग्रस्त रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना राहण्याकरता टाटा रुग्णालयाला देण्याबाबत निर्णय गृहनिर्माण विभागाने घेतला आहे.
रहिवाशांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न
या निर्णयामुळे उपरोक्त इमारतींमधील ७५० कुटुंबामध्ये चिंतेचे व भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, भोईवाडा येथील म्हाडा गृह संकुलामधील तयार असलेली संपूर्ण इमारत कॅन्सरग्रस्त रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना राहण्याकरता देण्यात यावी, अशी मागणी सुखकर्ता व विघ्नहर्ता मधील रहिवाशांनी केली आहे. कोव्हिड-१९चा प्रार्दुभाव कॅन्सरग्रस्त रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात होत असल्याने, या सोसायटीमधील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच गृहनिर्माण विभागाच्या निणर्यामुळे उपरोक्त को ऑप. हौ. सोसायट्यांसह या परिसरातील कामगार स्व सदन, त्रिवेणी सदन, मेहता मेंशन, सिंधुदुर्ग इमारत, धरमशी मेंशन या इमारती मधील रहिवाशांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
(हेही वाचाः धक्कादायक! राजावाडी रुग्णालयाच्या आयसीयूत उंदराने रुग्णाचे डोळे कुरतडले! )
म्हणून गृहनिर्माण विभागाने घेतलेल्या टाटा रुग्णालयातील कॅन्सरग्रस्त रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी १०० रहिवाशी गाळे देण्याबाबतच्या निर्णयास तात्काळ स्थगिती दयावी व भोईवाडा येथील म्हाडा गृहसंकुलामध्ये टाटा रुग्णालयातील रूग्णांसाठी सदनिका वितरित करण्यात याव्यात, असे पत्र चौधरी यांनी लिहिले होते.