मुंबईमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवल्यानंतर आता महापालिकेने महापालिकेची उपनगरीय रुग्णालये, जंबो कोविड सेंटर यामध्ये ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन निर्मितीच्या कामांना सुरुवात झाली आहे. जंबो कोविडमधील ऑक्सिजन प्लांटची निविदा प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आहे. मात्र, याबरोबर अन्य रुग्णालयांना लागणाऱ्या ऑक्सिजन सिलिंडरची गरज लक्षात घेता महापालिकेने ऑक्सिजन बॉटलिंग प्लांट उभारण्याचे काम हाती घेत आहे. त्यामुळे आता मुंबईची ऑक्सिजन लेव्हल खऱ्या अर्थाने वाढणार आहे.
ऑक्सिजन पुरवठ्याबाबत स्वयंपूर्ण होण्याचा प्रयत्न!
महापालिकेच्या अनेक रुग्णालयांमध्ये तसेच कोविड सेंटरमध्ये ड्युरा आणि जंबो सिलिंडरचे पुनर्भरण महापालिकेचा अधिकृत पुरवठादार यांच्या रबाळे अणि तुर्भे येथील प्लांटमधून करण्यात येत आहे. महापालिकेचे अधिकृत पुरवठादार हे इतर महापालिका रुग्णालये, खासगी रुग्णालये यांनाही ऑक्सिजन पुरवठा करत असल्यामुळे अत्यंत निकडीच्यावेळी महापालिकेला यांच्यावरती अवलंबून रहावे लागत आहे. त्यानुसार महापालिकेने कोविड रुग्णांना तातडीने ऑक्सिजनचा पुरवठा करणे शक्य व्हावे, तसेच कोविड रोग साथीमध्ये महापालिकेतील रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठ्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्याकरता माहुल येथील जागेमध्ये बीपीसीएलजवळ स्वत:चा जंबो सिलिंडर भरण्यासाठी वायू रुप ऑक्सिजन बॉटलिंग प्लांटची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला.
(हेही वाचा : भाजपने ८२ नगरसेवक टीकवून दाखवावेत! भाई जगताप यांचे आव्हान)
बीपीसीएल कंपनी नि:शुल्क ऑक्सिजन देणार!
या बॉटलिंग प्लांटमध्ये बीपीसीएल कंपनी पाईपद्वारे ऑक्सिजन वायू प्राप्त करून देणार आहे. यामध्ये दिवसाला १० ते १५ टन ऑक्सिजनचा पुरवठा होणार असून कोविड काळात या ऑक्सिजन पुरवठ्यासाठी बीपीसीएल कंपनी एकही पैसा महापालिकेकडून घेणार नाही. बीपीसीएल ही महापालिकेला नि:शुल्क ऑक्सिजन वायू उपलब्ध करून देणार आहे. या ऑक्सिजन वायूचा वापर करून आणीबाणीच्या काळात दिवसाला ७.१ क्युबिक मीटर क्षमतेचे १५०० जंबो ऑक्सिजन सिलिंडर भरण्यात येणार आहे. कोविडच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीच्या धर्तीवर हा ऑक्सिजन बॉटलिंग प्लांट महापालिकेच्या विविध रुग्णालयांना तसेच डेडीकेटेड जंबो सेंटर, इतर कोविड सेंटर, प्रसंगी खासगी रुग्णालये यांना विनाव्यत्यय ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी अत्यंत सोयीचे ठरेल, असा विश्वास यांत्रिकी व विद्युत विभागाने स्पष्ट केले. मुंबई महापालिकेच्यावतीने हे पहिलेच ऑक्सिजन बॉटलिंग प्लांट असून याच्या निर्मितीसह हमी कालावधी वगळता पाच वर्षाँची देखभाल, बॉटलिंग प्लांट चालवणे तसेच जंबो सिलिंडरची वाहतूक करणे यासाठी २१.२४ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. पुढील तीन महिन्यांमध्ये हा या प्लांटचे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. यासाठी मागवलेल्या निविदेमध्ये मॅक एंटरप्रायझेस ही कंपनी पात्र ठरली आहे.
उपनगरांत ऑक्सिजनच्या दोन ठिकाणी साठवण टाक्या
वाढत्या रुग्णसंख्येमुळे ऑक्सिजनच्या मागणीतही वाढ झाल्यामुळे, ऑक्सिजन उत्पादकांच्या आणि वितरकांच्या ऑक्सिजन पुरवठा यंत्रणेवर अतिरिक्त ताण पडत आहे. त्यामुळे महापालिकेच्या जागेवरच ऑक्सिजन साठवणूक टाक्या स्थापित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पूर्व उपनगर व पश्चिम उपनगरामध्ये दोन ठिकाणी साठवणूक टाक्या निर्माण केल्या आहे. प्रत्येकी ४० टन क्षमतेच्या या दोन ऑक्सिजन साठवणूक टाकी असून या टाकीद्वारे ड्युरा सिलिंडरचा मोठा प्रश्न सुटणार आहे. या दोन साठवणूक टाकीच्या निर्माणासाठी सुमारे चार कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. यासाठी नोमा इन्फ्रास्ट्रक्चर ही कंपनी पात्र ठरली असून चीनमधून या साठवणूक टाक्या खरेदी केल्या जाणार आहेत. नोमा इन्फ्रास्ट्रक्चर हे ऑक्सिजन साठवणूक टाक्यांचे चीनमधील उत्पादक नॅनटॉग सीआयएमसी एनर्जी लिमिटेड या कंपनीचे अधिकृत पुरवठादार आहेत.
(हेही वाचा : महापालिका निवडणुकीपूर्वीच काँग्रेसला कापरे भरले! अतुल भातखळकरांची टीका)
Join Our WhatsApp Community