सचिन वाझे प्रकरणानंतर मुंबई पोलिस दलात मोठे फेरबदल करण्यात येत आहे. मुंबईत ८ वर्षापेक्षा अधिक कार्यकाळ काढणाऱ्या ७२७ पोलिस अधिकारी यांची मुंबईच्या बाहेर बदली करण्यात येणार आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक ते पोलिस उपनिरीक्षक पदावरील ७२७ अधिकाऱ्यांची यादी तयार करण्यात आलेली आहे. येत्या काही दिवसातच या बदल्या होण्याची शक्यता आहे. एकाच वेळी एवढ्या संख्येने पोलिस अधिकारी यांना मुंबई बाहेर काढण्याची ही पहिलीच वेळ असून अनेक अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
८ वर्षापेक्षा अधिक काळ काढणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या!
अंटालिया स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्याकांड प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे, रियाझुद्दीन काजी, पोलिस निरीक्षक सुनील माने आणि शिपाई विनायक शिंदे यांना एनआयएने अटक केल्यानंतर मुंबई पोलिसांना देशभरात बदनामी झाली होती. त्यात भर म्हणून मुंबई पोलिस आयुक्त पदावरून परमबीर सिंग यांची उचलबांगडी करण्यात आली होती. पाठोपाठ माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर करण्यात आलेला १०० कोटीं वसुलीचा आरोपानंतर पोलिस दलाचे अधिकच खच्चीकरण झाले. या सर्व प्रकरणानंतर मुंबईचे नवीन पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी मुंबई गुन्हे शाखेत मोठे फेरबदल केले, अनेकवर्षे गुन्हे शाखेत काढणाऱ्या अधिकाऱ्यांची बदल्यानंतर आता मुंबई पोलिस दलात ८ वर्षापेक्षा अधिक काळ काढणाऱ्या अधिकाऱ्याच्या बदल्या करण्यात येणार आहे.
(हेही वाचा : दोन दिवसांच्या अधिवेशनात भाजप मैदान मारणार? अशी आहे रणनीती)
८९ वरिष्ठ पोलिस अधिकारी, २०० पेक्षा अधिक पोलिस निरीक्षकांचा समावेश
मुंबई पोलिस दलातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक ते पोलिस उपनिरिक्षक पदावरील ७२७ अधिकारी यांची यादीच तयार करण्यात आली आहे. त्यात ८९ वरिष्ठ पोलिस अधिकारी तर २०० पेक्षा अधिक पोलिस निरीक्षक यांचा समावेश आहे. या अधिकारी यांना तीन पसंतीच्या जिल्ह्याचे ठिकाण नमूद करण्यासाठी सांगण्यात आले आहे. बदली करण्यात आलेल्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक व पोलिस निरीक्षक यांच्यापैकी अनेक जणांचा सेवेतील कार्यकाळ काळ एक ते दोन वर्षावर येऊन ठेपला असून या बदलामुळे त्यांच्यात नाराजीचे वातावरण पसरले आहे, तर मुंबईत काही वर्षांपूर्वीच बदलून आलेल्या अधिकाऱ्यांना या बदल्याचे स्वागत केले आहे.
Join Our WhatsApp Community