प्रेमभंग झालेल्या २४ वर्षीय तरुण प्रियकराला परत मिळवण्यासाठी एका बाबा बंगालीच्या नादाला लागली. त्याने प्रियकराला परत मिळवून देण्यासाठी घुबडाचा आणि बकऱ्याचा बळी देण्याचा उपाय सांगून, या तरुणीकडून लाखो रुपये उकळले. सर्व होऊनही प्रियकर परत न आल्यामुळे निराश झालेल्या तरुणीने अखेर बाबाची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल केली. तरुणीच्या तक्रारीनंतर नवी मुंबई पोलिसांनी या बंगाली बाबाच्या मीरा रोड येथून मुसक्या आवळल्या आहेत.
जाहिरात वाचली आणि…
बाबा कबीर खान बंगाली (३३) असे या बंगाली बाबाचे नाव आहे. मूळचा उत्तर प्रदेशातील मेरठ येथे राहणारा बंगाली बाबा हा सध्या मीरा रोड येथे वास्तव्यास होता. नवी मुंबईत राहणा-या एका तरुणीचा २०१९ मध्ये प्रेमभंग झाला, तिचा प्रियकर तिला सोडून गेल्यामुळे ती नैराश्यात होती. ट्रेन मधून प्रवास करत असताना तिला बंगाली बाबाची जाहिरात दिसली, ‘प्रेमभंग, करणी, काळीजादू, जादूटोणा, भूत पिशाच्च इत्यादींवर १०० टक्के उपाय’ असा मजकूर लिहिलेली जाहिरात या तरुणीने वाचून त्या जाहिरातीत दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला.
(हेही वाचाः चिमुकल्यासमोर वडिलांची धारदार कोयत्याने हत्या! पिंपरी-चिंचवड हादरले)
सांगितले हे उपाय
फोनवर बाबा कबीर बंगाली नाव सांगत त्याने तो मेरठच्या दर्ग्यात असल्याचे सांगून, तुला तुझा प्रियकर आणि त्याचे प्रेम पुन्हा मिळवून देतो अशी खात्री दिली. प्रेमात आंधळी झालेल्या या तरुणीने बाबाच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन तुम्ही उपाय सांगा मी करायला तयार आहे, असे सांगून बाबा बंगालीला उपाय करण्यास सांगितला. सावज समोरुन चालून आल्यामुळे बाबाने तिला तुझा प्रियकर तुला पुन्हा आणून देतो यासाठी काळीजादू करावी लागेल, असे सांगून त्यासाठी घुबड, बकरी, यांचा बळी द्यावा लागेल, तसेच घुबडाची मान, काळ्या मांजरीचे पंजे, काळी बाहुली सामान इत्यादी वस्तू लागतील आणि खर्च खूप होईल, असे बाबाने या तरुणीला सांगितले.
(हेही वाचाः मुंबईत १०० किलो गोल्ड पोटॅशियम डायसायनाईड जप्त)
तब्बल साडे चार लाखांचा गंडा
खर्च होऊ द्या उपाय करा, असे सांगून या तरुणीने बाबा बंगालीला थोडे-थोडे करुन साडे चार लाख रुपये ऑनलाईन पाठवले. बरेच महिने उलटूनही बाबाने केलेला उपाय लागू पडत नसल्याचे बघून, या तरुणीने दिलेले पैसे परत दे नाहीतर पोलिसांत तक्रार करेन, अशी धमकी बाबाला दिली. बाबाने देखील तू पोलिसात गेली तर काळी जादू तुझ्यावर उलटवून तुझा अपघात घडवून आणेन, अशी धमकी तरुणीला दिली. दोन वर्ष उलटल्यानंतर या तरुणीने अखेर खारघर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेने सुरू केला. अखेर गुन्हे शाखेने तांत्रिक तपासावरुन बाबा कबीर बंगाली यांच्या मीरा रोड येथून मुसक्या आवळून त्याला अटक केली. या बाबाने अशी अनेकांची आर्थिक फसवणूक केली असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
Join Our WhatsApp Community