आदित्य शिरोडकर यांच्या शिवसेना प्रवेशाने मनविसेचे ग्रहण सुटले

शिरोडकर यांच्या शिवसेना प्रवेशानंतर मनसैनिकांनी आनंदोत्सव साजरा केला.

84

मनसेचे सरचिटणीस आणि महाराष्ट्र विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर मनसैनिकांनी आनंदच व्यक्त केला आहे. आदित्य शिरोडकर यांनी पक्ष सोडल्यानंतर, मनसैनिकांनी मनविसेचे ग्रहण सुटले अशा शब्दांतच सोशल मीडियावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या. मात्र, आदित्य शिरोडकर यांना शिवसेनेत पाठवण्यात आल्याचे बोलले जात आहे.

मनसैनिकांनी साजरा केला आनंदोत्सव

शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व शिवसेना नेते व पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेचे सरचिटणीस व मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आदित्य शिरोडकर यांच्या रुपात मोठा मासा शिवसेनेने गळाला लावत मनसेला मोठा धक्का दिला. आदित्य शिरोडकर हे पक्षाच्या मोठ्या पदावर असले तरी ते पक्षात तेवढेसे सक्रिय नव्हते. त्यांच्यामुळे मनविसेची गती रोखली गेली होती. एका बाजूला युवा सेनेची घोडदौड सुरू असताना, दुसऱ्या बाजूला मनविसेचा प्रभाव कमी होत होता. आदित्य शिरोडकर हे मागील काही वर्षांपासून संघटनेपासून दूरच होते, त्यामुळे मनविसेचे मोठे नुकसान होत होते. त्यामुळे शिरोडकर यांच्या शिवसेना प्रवेशानंतर मनसैनिकांनी आनंदोत्सव साजरा केला. काहींनी तर मनसेचे ग्रहण सुटले अशाच पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्या. तर काहींनी थेटपणे अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

(हेही वाचाः मनसेला धक्का! आदित्य शिरोडकरांनी बांधले शिवबंधन!)

मनसेने शिरोडकर यांना काय दिले?

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला असून, भविष्यात त्यांच्याकडे मनविसेची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आधीच पद अडवून बसलेल्या शिरोडकर यांना बाजूला करायचे असल्याने त्यांनी आधीच शिवसेना प्रवेशाचा मार्ग निवडला असल्याचे बोलले जात आहे. आदित्य शिरोडकर यांचे वडील राजन शिरोडकर यांनी शिवसेनेत असताना राज ठाकरे यांच्यासह भारतीय विद्यार्थी सेनेच्या जडणघडणीत महत्वाची भूमिका बजावली होती. पण राज ठाकरे यांनी शिवसेना पक्ष सोडल्यानंतर राजन शिरोडकर यांनी त्यांच्यासोबतची मैत्री जपत त्यांच्यासोबतच पक्ष सोडला. त्यानंतर त्यांचे पुत्र आदित्य शिरोडकर यांना २०१४ लोकसभा निवडणुकीत दक्षिण मध्य मुंबईत उमेदवारी दिली, तसेच मनविसेचे अध्यक्ष तसेच पक्षाचे सरचिटणीस अशी पदेही दिली.

राज ठाकरेंनीच दिला हिरवा कंदिल

परंतु पक्षातील त्यांची कामगिरी समाधानकारक नसल्याने तसेच नेतृत्व क्षमता नसल्यानेच मनसेचे पदाधिकारी व मनसैनिक नाराज होते. त्यातच मनसेत अमित ठाकरे यांचे उमदे नेतृत्व पुढे आल्याने शिरोडकर यांना भीती निर्माण झाली होती. त्यामुळे भविष्यात यावरुन वाद नको, म्हणून राज ठाकरेंकडून हिरवा सिग्नल मिळाल्यानंतर शिरोडकर यांनी पक्षप्रवेश केल्याचे बोलले जात आहे.

(हेही वाचाः कुरार व्हिलेज झोपड्यांवर कारवाई! पोलिसांकडून नागरिकांना नग्न करून मारहाण!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.