आधीच सचिन वाझे प्रकरणावरुन राज्य सरकार विरोधकांच्या रडारवर असताना, आता मुंबई महापालिकेमध्ये देखील पेंग्विन गॅंग वाझेगिरी करत असल्याचा आरोप भाजप आमदार अमित साटम यांनी केला आहे. ऑक्सिजन प्लांटचे काम 32 दिवस पूर्ण होऊनही झाले नसल्याने, अमित साटम आक्रमक झाले आहेत. त्यांनी हायवे कंन्स्ट्रक्शन कंपनीला हे काम का देण्यात आले, असा सवाल उपस्थित केला आहे. मुंबई महापालिका प्रशासनाने १२ रुग्णालयांमध्ये मिळून १६ प्राणवायू निर्मिती प्रकल्प(ऑक्सिजन प्लांट) राबवण्याचे काम हाती घेत कामाला सुरुवात केली आहे. या ऑक्सिजन प्लांटचे काम एक महिन्याच्या कालावधीत पूर्ण होणे अपेक्षित होते, मात्र आता 32 दिवस पूर्ण झाले तरी काम पूर्ण झाले नसल्याने आता विरोधक आक्रमक झाले आहेत.
नेमकं काय म्हणाले साटम?
मुंबई महापालिकेने 84 कोटींचे कंत्राट हायवे कन्सक्ट्रशन नावाच्या कंपनीला दिले आहे. 16 ऑक्सिजन प्लांट उभे करण्याचे कंत्राट देण्यात आले असून, 30 दिवसांच्या कालावधीत हे काम पूर्ण करावे असे कंत्राटात म्हटले आहे. मात्र 32 दिवस पूर्ण झाले तरीही हे काम पूर्ण झालेले नाही. आधीच 84 कोटींचे कंत्राटाचे काम पूर्ण झाले नसताना, पालिकेन पुन्हा 320 कोटी रुपयांचे काम या कंपनीला दिले आहे. एवढेच नाही तर महाविकास आघाडीच्या एका मंत्र्याने देखील यावर आवाज उठवला असून, कंत्राटदारावर गुन्हा दाखल केला आहे. त्याला पुन्हा कंत्राट का देण्यात आले, असा सवाल अमित साटम यांनी उपस्थित केला. तसेच कोणती पेंग्विन गँग महापालिकेत वाझेगिरी करत आहे, असा सवाल उपस्थित करत आयुक्तांनी हे कंत्राट रद्द करावे अशी मागणी साटम यांनी केली आहे.
(हेही वाचाः ठाण्याच्या बारमधील वसुली किती आणि कुणासाठी ?)
असे मिळाले हायवे कंन्स्ट्रक्शन कंपनीला कंत्राट
मुंबई महापालिकेने दोन वर्षांपूर्वी कस्तुरबा रुग्णालयात प्रतिदिन सुमारे 500 घनमीटर(क्युबिक मीटर) क्षमतेचा प्राणवायू निर्मिती प्रकल्प उभारला आहे. तर जोगेश्वरीतील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा रुग्णालयामध्ये देखील वर्षभरापूर्वी प्रतिदिन 1 हजार 740 घनमीटर(क्युबिक मीटर) क्षमतेचा प्रकल्प उभारला आहे. याच धर्तीवर हे प्रकल्प उभारले जात असून, या 16 प्रकल्पांसाठी मागवलेल्या निविदेमध्ये हायवे कंन्स्ट्रक्शन कंपनी पात्र ठरली होती. या कंपनीला सुमारे 90 कोटी रुपयांचे कंत्राट बहाल करण्यात आले. मागील महिन्यात याबाबतचा प्रस्ताव मंजूर झाला असून, याचा कार्यादेश १४ जून २०२१ रोजी देण्यात आला.
इतका प्राणवायू निर्माण होणार
मुंबई महापालिका प्रशासनाने प्राणवायू उपलब्धतेबाबत कायमस्वरुपी उपाययोजना म्हणून, एकूण १२ रुग्णालयांमध्ये मिळून १६ प्राणवायू निर्मिती प्रकल्प उभारण्याचे निश्चित केले आहे. यामध्ये वातावरणातील हवेतून प्राणवायू निर्माण करुन तो रुग्णांना पुरवण्यासाठी या प्लांटची निर्मिती केली जात असून, या प्रकल्पांमधून प्रतिदिन एकूण ४३ मेट्रिक टन प्राणवायू साठा निर्माण होणार आहे.
(हेही वाचाः अग्निशमन दलातील असंतोषाची आग विझवण्याची गरज!)
Join Our WhatsApp Community