रेल्वेचा महापालिकेवर विश्वास

रेल्वेच्या हद्दीतील काम रेल्वे प्रशासनाकडूनच केले जाते, परंतु येथील युटीलिटीजच्या जाळ्यामुळे त्यांनी हे काम महापालिकेलाच करण्याची विनंती केली आणि महापालिकेने हे काम अल्पावधीत पूर्ण केले.

106

सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानक परिसरात तुंबणाऱ्या पाण्यावर मात करण्याचा प्रयत्न मुंबई महापालिकेकडून सुरू असून, या रेल्वे स्थानकाच्या रुळाच्या खालून तब्बल ४१५ मीटर लांबीची आणि १,८०० मिलिमीटर व्यासाची पर्जन्य जलवाहिनी मध्य रेल्वेद्वारे टाकण्यात आली. तर ही पर्जन्य जलवाहिनी मुंबई महापालिकेच्या मुख्य पर्जन्य जलवाहिनीला जोडण्यासाठी रेल्वे हद्दीच्या पुढील भागात २५ मीटर लांबीची एक अतिरिक्त ‘बॉक्स ड्रेन’ महापालिकेच्या वतीने टाकून, युटीलिटीज स्थलांतरित करण्यात आले. रेल्वेच्या हद्दीतील काम रेल्वे प्रशासनाकडूनच केले जाते, परंतु येथील युटीलिटीजच्या जाळ्यामुळे त्यांनी हे काम महापालिकेलाच करण्याची विनंती केली आणि महापालिकेने हे काम अल्पावधीत पूर्ण केले आहे.

रेल्वे वाहतुकीला होत होता अडथळा

महापालिका व मध्य रेल्वे यांनी अत्यंत चांगला समन्वय साधून केवळ ४ महिन्यांच्या कालावधीत एकूण तब्बल ४४० मीटर लांबीच्या व दोन वेगवेगळ्या प्रकारच्या पर्जन्य जलवाहिन्या बांधण्याचे आव्हानात्मक काम पूर्ण केले आहे. मुंबईमध्ये उपनगरीय रेल्वे रुळांवरील पावसाळी पाणी साचण्याच्या ठिकाणी मायक्रो टनेलिंगचे काम रेल्वे हद्दीत रेल्वे प्रशासनाकडून केले जात आहे. त्यासाठी आवश्यक तिथे मुंबई महापालिका आपल्या हद्दीत काम करत आहे. दक्षिण मुंबईतील सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकाजवळच्या परिसरात दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचून रेल्वे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असे.

(हेही वाचाः यंदा मनसे निर्बंधांची हंडी फोडणार!)

‘मायक्रो टनेलिंग’चा वापर

या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाच्या अभियंत्यांनी व मध्य रेल्वेच्या अभियंत्यांनी संयुक्तपणे अभ्यास करुन, फक्त नाल्यांवर अवलंबून न राहता, ‘रेल्वे ट्रॅक’च्या खाली ‘मायक्रो टनेलिंग’ पद्धतीने रेल्वे हद्दीतील पर्जन्य जलवाहिनी तयार करण्याचा निर्णय घेतला. यानुसार अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करुन व ‘मायक्रो टनेलिंग’ पद्धतीने बांधण्यात आल्यामुळे रेल्वे वाहतुकीला कोणताही अडथळा न येता, कौशल्यपूर्ण अभियांत्रिकीय काम करता येऊ शकले. हे काम पूर्ण करताना वेगवेगळ्या आव्हानांवर यशस्वीपणे मात करण्यात आली. मुंबई महापालिका आणि रेल्वे प्रशासनाने त्यासाठी योग्य ताळमेळ ठेवला, असे अतिरिक्त आयुक्त पी.वेलरासू ह्यांनी नमूद केले.

महापालिकेने हाती घेतले काम

पी. डिमेलो मार्गावर रेल्वे आयुक्त कार्यालय प्रवेशद्वारापासून मॅलेट बंदर जंक्शन पर्यंत सुमारे २५ मीटर अंतरात पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी, प्रारंभी रेल्वे प्रशासनाकडून १८०० मिमी व्यासाचा भूमिगत बोगदा(मायक्रो टनेलिंग) बांधण्यात येणार होता. मात्र नागरी उपयोगिता सेवांचे जाळे पाहता, रेल्वे प्रशासनाने महापालिकेला ही कामे करण्याची विनंती केली. त्यास मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल ह्यांनी मंजुरी दिल्यानंतर, महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाने हे काम हाती घेतले. पी. डिमेलो मार्ग हा वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याने वाहतूक विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त करुन, दिनांक १५ एप्रिल २०२१ रोजी हे काम सुरू करण्यात आले.

(हेही वाचाः लोकलसाठी भाजप व्होकल! सरकारला आणणार ट्रॅकवर)

या ठिकाणी २२० किलोवॅट क्षमता असलेली उच्च दाबाची टाटा कंपनीची विद्युत वाहिनी, ११० किलोवॅट क्षमता असलेली उच्च दाबाची टाटा कंपनीची विद्युत वाहिनी, बेस्ट विद्युत पुरवठ्याच्या वाहिन्या तसेच ७५० मिमी व्यासाच्या दोन मुख्य पेय जलवाहिन्या, ६०० मिमी व्यासाच्या दोन मुख्य पेय जलवाहिन्या, ४५० व्यासाच्या दोन मुख्य पेय जलवाहिन्या अशा वेगवेगळ्या उपयोगिता सेवा वाहिन्या होत्या.

या वेगवेगळ्या आव्हानांवर मात करुन अल्पावधीत उत्कृष्टपणे हे काम पूर्ण करण्यासाठी महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल आणि अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू ह्यांच्या निर्देशानुसार, उपआयुक्त (पायाभूत सुविधा) राजन तळकर यांच्यासह पर्जन्य जलवाहिन्या विभागाचे प्रमुख अभियंता कमलापुरकर, उप प्रमुख अभियंता विवेक राही, कार्यकारी अभियंता युवराज राऊत, दुय्यम अभियंता स्नेहल जाधव आणि श्रीकांत गोधडे यांनी हे काम पूर्ण करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. रेल्वे प्रशासनाच्या वतीने सीनिअर डिविजनल इंजिनिअर (दक्षिण) अर्पण कुमार, असिस्टंट डिविजनल इंजिनिअर (भायखळा) मनीष सिंग, सीनिअर सेक्शन इंजिनिअर (भायखळा) अरुण कुमार, सीनिअर सेक्शन इंजिनिअर (भायखळा) निशांत कुमार सिंग, सीनिअर सेक्शन इंजिनिअर (परळ) संजय पारधी, सीनिअर सेक्शन इंजिनिअर (सीएसएमटी) मोहम्मद एजाज आलम, कार्य प्रभारी (भायखळा) तरूण कुमार या अभियांत्रिकी पथकाने यात योगदान दिले आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.