मागील दोन दिवसांपासून पावसाने आता संपूर्ण राज्यात मोर्चा वळवला आहे. त्यामुळे कोकणसह आता पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातही पावसाची जोर बॅटिंग सुरु आहे. त्यामुळे आता कोल्हापुरात २०१९ साली आलेल्या महापुराच्या आठवणीने चिंता वाढली आहे, तर कोकणात अक्षरशः पावसाने कहर सुरु केला आहे. परिणामी मुंबई-गोवा महामार्ग बंद करण्यात आला आहे.
कोल्हापुरात ३९ बंधारे पाण्याखाली!
कोल्हापूर मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तब्बल ३९ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तसेच २०१९ साली ज्या पंचगंगा नदीने कोल्हापूरला पाण्याखाली घेतले होते, त्या पंचगंगा नदीने पुन्हा रौद्ररूप धारण केले आहे. याठिकाणी पंचगंगा नदीने धोक्याची पाळली ओलांडली आहे. पाणी नदीच्या पात्राबाहेर पडले आहे. बुधवारी रात्री नदीची पाणीपातळी ३६ फुटांवर गेली. जिल्ह्यातील एकूण ३९ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. याशिवाय धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण अधिक आहे. चंदगड, आजरा, कोवाड या भागात अतिवृष्टी झाली आहे. यामुळे परिसरातील नद्यांची पाणीपातळी वाढल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोल्हापूर ते गगनबावडा रोड काल रात्रीपासून वाहतुकीस बंद केला आहे. मांडुकली आणि खोकुर्ले याठिकाणी रस्त्यावर पाणी आले आहे. त्यामुळे गगनबावड्याला जाणारा मार्ग बंद ठेवला आहे. तर कासारी नदीच्या पाणी पात्रात वाढ झाल्याने बर्की गावात जाणाऱ्या पुलावर पाणी आले असून बर्की गावचा संपर्क तुटला आहे. शिवाय कोल्हापूर जिल्ह्यातील 39 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. दरम्यान, कोल्हापूर जिल्हासाठी एनडीआरएफच्या २ टीम पुण्याहून कोल्हापूरकडे रवाना झाली आहे. एनडीआरएफच्या एका टीममध्ये २५ जवान आहेत. परभणी जिल्ह्यात ओढे ,नाले, नद्या ओसंडून वाहू लागल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. लोअर दुधना प्रकल्प ८४ टक्के भरल्याने प्रकल्पाच्या १२ दरवाज्यांमधून १२१९२ क्युसेकने पाणी दुधना नदीपात्रात सोडण्यात आले आहे. त्यामुळे दुधना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
(हेही वाचा : पुन्हा कसारा घाटात कोसळली दरड! ‘या’ लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द!)
पावसामुळे मुंबई-गोवा महामार्ग बंद
सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यामधील चिपळूणच्या वशिष्टी पुलाला पाणी लागले असून वशिष्टी पूल वाहतूकीस बंद करण्यात आला आहे. महामार्गावर काही ठिकाणी पाणीच पाणी झाले असून त्यामुळे वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत. हा पूल वाहतुकीसाठी बंद केल्यामुळे मुंबई-गोवा महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
उल्हास नदीचे पाणी पुलाला टेकले!
कर्जत आणि दहवलीला जोडणाऱ्या उल्हास नदीवर पुलाला पाणी लागले आहे. रात्रभर पाऊस चालू होता त्यात रात्री १ वाजल्यानंतर जोरदार पाऊस झाल्याने ओसवाल नगर, इंदीरा नगर हा परिसर पाण्याखाली होता. जवळपास पहिल्या मजल्याला पाणी लागले होते. दहवली गावातील गावकरी रात्रभर जागे आहेत. अनेक चारचाकी, दुचाकी गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गावकऱ्यांच्या माहितीनुसार १९८९ला अशाच प्रकारची परिस्थिती निर्माण झाली होती. मुसळधार पावसामुळे भिवंडी शहर व ग्रामीण भागातील अनेक भागात सखल भागात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. यामध्येच भिवंडी शहरातील तसेच ग्रामीण भागातील हजारो घरात पाणी शिरले आहे. शहरातील तीन बत्ती भाजी मार्केट, म्हाडा कॉलनी, शेलार नदी नाका बंदर मोहल्ला, ईदगाह , कारीवली, तांडेल मोहल्ला, मेट्रो हॉटेल, मिटपाडा, पडघा, महापोली या परिसरात पावसाचे पाणी शिरले आहे.
(हेही वाचा : मुंबईकरांना खुशखबर! तानसा, मोडकसागर भरला!)
Join Our WhatsApp Community