अंबानी प्रकरण : मुंबई पोलिसाचा ढिसाळपणा, एनआयएची अचूकता! 

काही तपास यंत्रणेकडून तपासात त्रुटी राहून जातात आणि त्याचा फायदा गुन्हेगार घेतो आणि या गुन्ह्यातून तो सुखरूप बाहेर येतो, अनेक गुन्ह्यांत असे प्रकार घडत असतात.

124
गुन्हा घडल्यापासून त्यातील गुन्हेगारांना अटक करून ते शिक्षेस पात्र ठरल्यापर्यंतची जबाबदारी तपास यंत्रणेची असते. तपास यंत्रणेला किंवा त्यातील तपास अधिकाऱ्याला अशा वेळी महत्वाची भूमिका पार पाडावी लागते. गुन्ह्यातील पुरावे, साक्ष, प्रत्यक्षदर्शी, पंचनामे आणि तांत्रिक पुरावे यांची जुळवा जुळव करून ते न्यायालयापर्यंत पोहचवण्यापर्यंतचे काम तपास यंत्रणेकडे असते. यामध्ये जराशी देखील चूक झाल्यास यातून गुन्हेगार अलगद बाहेर पडण्याची शक्यता अधिक असते.

तपासात त्रुटी राहिल्याने गुन्हेगाराला फायदा होतो! 

गुन्ह्याचा तपास करण्यासाठी प्रत्येक तपास यंत्रणेची आपली एक वेगळी पद्धत असते. केंद्रीय तपास यंत्रणा असो अथवा राज्यातील पोलीस दल असो, प्रत्येक जण आपापल्या परीने गुन्ह्याचा तपास करून गुन्हेगाराला त्याच्या शिक्षेच्या ठिकाणी आणून ठेवतात. काही तपास यंत्रणेकडून तपासात त्रुटी राहून जातात आणि त्याचा फायदा गुन्हेगार घेतो आणि या गुन्ह्यातून तो सुखरूप बाहेर येतो, अनेक गुन्ह्यात असे प्रकार घडत असतात. सध्या मुंबईत देशभर गाजत असलेल्या मुकेश अंबानी स्फोटकांनी भरलेली मोटार प्रकरण आणि या मोटारीचा मालक मनसुख हिरेन या हत्येचे प्रकरण या दोन्ही गुन्ह्यांचा तपास सध्या राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयए करीत आहे. या गुन्ह्यात एकूण तीन तपास यंत्रणांनी सुरुवातीला तपास केला मात्र गुन्ह्याची व्याप्ती आणि हा गुन्हा संवदेनशील असल्याकारणाने या दोन्ही गुन्ह्यांचा तपास एकाच यंत्रणेकडे सोपवण्यात आलेला आहे.

अंबानी प्रकरण : तपास यंत्रणेसमोर आव्हान!

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईत असलेल्या अंटालिया या आलिशान बंगल्याच्या आवारात २५ फेब्रुवारी २०२१ रोजी एक स्कॉर्पिओ मोटार संशयितरित्या उभी केलेली आढळून आली होती. सर्वात प्रथम घटनास्थळी गांवदेवी पोलीस आणि मुंबई गुन्हे शाखेचे पथक त्या ठिकाणी दाखल झाले होते. मोटारीची तपासणी करण्यात आल्यानंतर मोटारीत जिलेटीन कांड्या (स्फोटके) आणि गाड्यांचे नंबरप्लेट आणि एक चिठ्ठी आढळून आली होती. या चिठ्ठीत मुकेश अंबानी यांना उद्देशून धमकी देण्यात आली होती. देशातील सर्वात मोठ्या उद्योगपतीला आलेली धमकी आणि त्यांच्या घराजवळ मिळून आलेली स्फोटकांनी भरलेल्या मोटारीमुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. हे कृत्य कोण्या अतिरेकी संघटनेचे आहे का? याचा तपास करण्यासाठी राज्य दहशतवाद विरोधी पथक आणि केंद्रातील राष्ट्रीय तपास यंत्रणा पुढे आली. मुंबई पोलीस, दहशतवाद विरोधी पथक आणि राष्ट्रीय तपास यंत्रणा या तिन्ही तपास यंत्रणेने आपापल्या परीने तपास सुरू केला होता, मात्र या गुन्ह्याचा अधिकृत तपास मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे असल्यामुळे या दोन्ही तपास यंत्रणेला यात अधिकृतपणे ढवळाढवळ करता येत नसल्यामुळे त्यांची प्रथम कोंडी झाली होती. मात्र या संबंधित दुसरी घटना घडल्यानंतर मात्र दहशतवाद विरोधी पथक आणि एनआयएला या गुन्ह्यात अधिकृत तपास करण्याची मुभा देण्यात आली.

(हेही वाचा : मनसुख हिरेन प्रकरणाचे मीरा रोड कनेक्शन? )

गुन्ह्यातील संशयित वाझे करायचा तपास!

मुंबई पोलिसाच्या गुन्हे शाखेचे विशेष युनिट म्हणून हा तपास सीआययू (गुन्हेगारी गुप्तवार्ता पथक) यांच्याकडे होता. या पथकातील अधिकाऱ्यांनी प्रथम स्फोटकांनी भरलेल्या मोटारीच्या मालकाचा शोध घेतला. या मालकाने आपली मोटार विक्रोळी येथून चोरीला गेली होती, अशी माहिती पोलिसांना दिली व मोटार चोरीचा प्रथम खबरी अहवालाची प्रत (एफआयआर) पोलिसांकडे सोपवली होती. सीआययुच्या पथकाने घटनास्थळापासून ते विक्रोळी येथून मोटार चोरीला गेली त्या मार्गावरील सर्व सीसीटीव्ही फुटेज मिळवले. याकामासाठी सीआययूने गुन्हे शाखेच्या इतर युनिटची देखील मदत घेतली होती. स्कॉर्पिओ ही मोटार कुठून कुठे गेली याबाबतची माहिती सीआययूच्या हाती लागली, तसेच या मोटारीच्या मागे आणखी एका इन्व्होवा मोटार दिसून आली होती. या इन्व्होवा मोटारीतून सायन प्रियदर्शनी जवळ स्कॉर्पिओ मोटारीत स्फोटके ठेवण्यात आली होती, इथपर्यंत माहिती गुन्हे शाखेच्या हाती लागली होती. त्यानंतर ‘जैश उल हिंद’ या कथित दहशतवादी संघटेनचा या गुन्ह्यात नाव आले या संघटनेने स्फोटके ठेवल्याची जबाबदारी स्वीकारली असल्याचे पत्रच सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या गुन्ह्यात गुन्हे शाखेच्या सीआययुने अनेक ठिकाणचे सीसीटीव्ही मिळवले होते स्कॉर्पिओ मालकाचा जबाब देखील घेण्यात आला होता. मात्र सीआययूचे तत्कालीन प्रभारी असलेले सचिन वाझे हे यांच्या तपासात संशय निर्माण होताच तत्कालीन मुंबई पोलिस आयुक्तांनी तपास अधिकारी बदलून एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्याकडे या गुन्ह्याचा तपास सोपवण्यात आला.

तपास सीआययूकडून एटीएस एनआयएकडे!

आठवड्याभराच्या तपासानंतर या गुन्ह्याशी संबंधित धक्कादायक घटना घडली ती म्हणजे स्कॉर्पिओ मालक मनसुख हिरेन यांनी आत्महत्या. मनसुख यांच्या आत्महत्येनंतर या गुन्ह्याला वेगळेच वळण लागले आणि संपूर्ण सीआययुचे युनिट संशयाच्या भोवऱ्यात आले आणि दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) ने यात प्रवेश केला. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात एटीएसने हत्याचा गुन्हा दाखल करून तपास सुरु केला. दरम्यान मुकेश अंबानी यांच्या घराजवळ मिळून आलेल्या स्फोटकांनी भरलेल्या मोटारीचा तपास देखील मुंबई पोलिसांकडून काढून तो राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) कडे सोपवण्यात आला. एनआयए आणि एटीएस या दोन्ही तपास यंत्रणा वेगवेगळ्या गुन्ह्याचा तपास करीत असले तरी या दोन्ही गुन्ह्याचा संबंध एकमेकांशी असल्यामुळे दोन्ही यंत्रणाना एकमेकांशी मदत घ्यावी लागत होती.

भक्कम पुराव्यानिशी एनआयएकडून वाझेला अटक! 

मुकेश अंबानी स्फोटक प्रकरणाचा तपास एनआयएकडे येताच एनआयएच्या रडारवर सीआययु युनिट आले. सर्वात प्रथम सचिन वाझे आणि एनसीपी नितीन अलुकनुरे यांना चौकशीसाठी एनआयएने बोलावून घेतले. तीन ते चार दिवस सलग चौकशीनंतर एनआयएच्या हाती आलेल्या काही तांत्रिक पुराव्यावरून सचिन वाझेला अटक करण्यात आली. सचिन वाझेच्या अटकेनंतर तपासात या गुन्ह्यात आणखी अधिकारी अडकले असल्याची माहिती एनआयएच्या हाती लागली मात्र  एनआयए ने अद्याप त्यांना अटक केलेली नसली तरी त्याच्यावर चौकशीचा फेरा सुरु ठेवला आहे. एनआयएकडून तांत्रिक पुरावे जमा करण्यासाठी घटनास्थळी मिळून आलेले सीसीटीव्ही फुटेज, इतर ठिकाणी मिळून आलेले फुटेज,  या गुन्हयाचे सिन रिक्रिएट (पुन्हा नाट्यरूपांतर) करून भक्कम पुरावे तयार करण्यात येत आहे. एनआयएने अनेक ठिकाणी छापेमारी करून अनेक महत्वाचे पुरावे गोळा केले असून या दोन्ही गुन्ह्यात वापरलेल्या आतापर्यंत ८ महागड्या मोटारी विविध परिसरातून जप्त करण्यात आलेल्या आहेत. या मोटारीच्या तपासणीसाठी एनआयएने पुण्यावरून केंद्रीय न्यायवैधक विज्ञान प्रयोगशाळा येथील पथक मुंबईत बोलावून जप्त करण्यात आलेल्या मोटारीची तपासणी करण्यात आली आहे. या मोटारी कोणी, कुठे वापरल्या याबाबत पुरावे गोळा करण्यात येत आहे. तसेच सचिन वाझे यांचे संगणक, इतर मोबाईल फोन्स, डीव्हीआर, लॅपटॉप इतर वस्तू तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आलेल्या आहेत.

एटीएस आणि एनआयएमध्ये चुरस!

मनसुख हिरेन हत्येचा तपास करणाऱ्या एटीएसने मात्र या गुन्ह्यासंदर्भात अनेकांचा जबाब नोंदवून सीडीआरच्या माध्यमातून तपास करून विनायक शिंदे आणि नरेश गोर या दोघांना अटक केली. एटीएसच्या तपासात बऱ्याच गोष्टीचा उलगडा झाला असून मनसुख हिरेन याच्या हत्येत सचिन वाझे हेच मुख्य आरोपी असल्याचा शिक्कामोर्तब एटीएसने केला आहे. आपल्या हातून तपास जात असल्याचे बघून एटीएसने घाईघाईने सचिन वाझे यांच्या राहत्या घरी, त्याचे कार्यालय, गोडाऊन या ठिकाणी छापेमारी करून अनेक पुरावे गोळा केले. एटीएसने या गुन्ह्याचा उलगडा केल्यानंतर पत्रकारांना अधिकृतपणे माहीत देऊन पत्रकार परिषद घेऊन केलेल्या तपासाची माहिती जाहीर केली. तेच एनआयएने अद्यापपर्यंत त्याच्या तपासाबाबत गुप्तता पाळली आहे. एनआयएकडून जी काही माहिती बाहेर येत आहे त्यात ती अधिकृत आहे कि नाही याला देखील त्यांच्याकडून अधिकृत दुजोरा दिला जात नाही. एनआयएची तपास करण्याची पद्धतच वेगळी असून त्यांनी आतापर्यंत पुरावे गोळा करण्यावर भर दिला आहे, त्यांनी भक्कम पुराव्याशिवाय सचिन वाझेला सोडून इतर कुणालाही अटक केलेली नाही. या प्रकरणात अनेक अधिकारी व इतर व्यक्तीच्या चौकशा मात्र सुरु आहेत.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.