अखेर अनिल देशमुख यांनी दिला राजीनामा!

मुंबई उच्च न्यायालयाने परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर, अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याबाबत निर्णय घेण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आल्याचे समजते.

110

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी लेटर बॉंब टाकत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी करण्यात येत होती. त्यामुळे आता अखेर अनिल देशमुख गृहमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याचे निश्चित झाले आहे. अनेल देशमुख वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा देणार आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी परमबीर सिंग यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी करण्याच्या दिलेल्या निर्णयावरुन, अनिल देशमुख गृहमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याचे समजते.

शरद पवारांसोबतच्या बैठकीत निर्णय

उच्च न्यायालयाने १५ दिवसांत परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश सीबीआयला दिले. त्यानंतर सीबीआय चौकशी चालू असताना स्वतः अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदावर राहणं हे योग्य नाही. त्यामुळे याबाबत निर्णय घेण्यासाठी शरद पवार यांनी सिल्व्हर ओक या आपल्या निवासस्थानी तातडीची बैठक बोलावली. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, आणि अनिल देशमुख उपस्थित होते. या प्रकरणाची चौकशी चालू असताना आपण गृहमंत्री पदावर राहू इच्छत नाही, असे अनिल देशमुख यांनी सांगितले. या त्यांच्या मागणीला शरद पवार यांनी संमती दिल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख आपला राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवणार असल्याचे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले.

(हेही वाचाः देशमुखांची विकेट पडली! दिलीप वळसे-पाटील असणार नवा खेळाडू?)

महाविकास आघाडीला दुसरा धक्का

महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून सरकारमधील अनेक मंत्र्यांवर आरोप झाले. याआधी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरुन वनमंत्री संजय राठोड यांच्यावर गंभीर आरोप झाल्याने त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला १०० कोटी वसूल करण्याचे टार्गेट दिल्याचा लेटर बाँब मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी टाकला होता. त्यानंतर नैतिकतेच्या प्रश्नावरुन देशमुख यांनी राजीनामा द्यावा अशी जोरदार मागणी करण्यात येत होती. त्यामुळे अखेर आता अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला आहे.

letter

(हेही वाचाः परमवीर सिंग यांच्या आरोपांची चौकशी सीबीआय करणार! )

काय आहे उच्च न्यायालयाचा निर्णय?

मुंबई उच्च न्यायालयाने अ‌ॅड. जयश्री पाटील यांच्या याचिकेवर निर्णय देताना परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची सीबीआयने प्राथमिक चौकशी करावी, असा निर्णय दिला. सीबीआयला १५ दिवसांमध्ये मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करावी लागणार आहे. १५ दिवसांत आपला अहवाल सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने जयश्री पाटील यांच्या याचिकेवर निरीक्षण नोंदवले की, अनिल देशमुख हे गृहमंत्री आहेत त्यामुळे पोलिसांकडून या आरोपांची निःष्पक्ष तपास होऊ शकत नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.