कोविडबाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे आता समर्पित कोरोना केंद्रांमधील रुग्ण खाटांची संख्या वाढवण्यात येत आहे. त्यांतर्गत वरळीतील नेहरू विज्ञान केंद्रात १५० रुग्ण खाटा आणि पोद्दार आयुर्वेदिक महाविद्यालयात २२५ रुग्णखाटा वाढवण्यात आल्या आहेत. वरळीतील नॅशनल स्पोर्टस् क्लब ऑफ इंडिया (एनएससीआय) येथील विद्यमान समर्पित कोरोना आरोग्य केंद्रातील रुग्ण खाटांची क्षमताही ५०० वरुन वाढवून, ती आता ८०० इतकी करण्यात आली आहे. ही कार्यवाही येत्या आठवड्यात पूर्ण करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
१ हजार १७५ रुग्ण खाटा उपलब्ध होणार
नेहरू विज्ञान केंद्र, पोद्दार महाविद्यालय व एनएससीआय मिळून एकूण १ हजार १७५ रुग्ण खाटा उपलब्ध होणार आहेत. कोविडबाधित रुग्णांसाठी अतिरिक्त रुग्ण खाटा वाढल्यामुळे रुग्णांना उपचारासाठी सुविधा प्राप्त होणार आहे. विशेष म्हणजे या सर्व रुग्ण शय्यांमधील एकूण ७० टक्के रुग्ण खाटा या ऑक्सिजन पुरवठ्याच्या सुविधांसह उपलब्ध करुन देण्यात आल्या असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले. दरम्यान, नेहरू विज्ञान केंद्रातील कोविड रुग्णालय उभारण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेला नयन समुहाने सामाजिक उत्तरदायित्वातून सहकार्य केले आहे.
(हेही वाचाः आता रुग्णालयातून थेट हॉटेलमध्ये व्हावे लागणार दाखल! मुंबई महापालिकेचा निर्णय)
आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण
या वाढीव रुग्ण खाटांच्या कोविड काळजी केंद्राचे लोकार्पण राज्याचे पर्यटन, पर्यावरण मंत्री व मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते सोमवारी सायंकाळी व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे पार पडले. यावेळी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, बेस्ट समितीचे अध्यक्ष आशीष चेंबूरकर, जी/दक्षिण प्रभाग समितीचे अध्यक्ष दत्ता नरवणकर, अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल, नगरसेविका तथा माजी महापौर हेमांगी वरळीकर, नगरसेवक संतोष खरात, उपायुक्त विजय बालमवार, जी/दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त शरद उघडे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
Join Our WhatsApp Community