मुख्यमंत्र्यांनी जनतेच्या तोंडाला पाने पुसली! भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची टीका

रिक्षाचालक साधारणपणे दरमहा सरासरी दहा हजार रुपये कमावत असताना त्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी अवघ्या दीड हजार रुपयांची घोषणाही अशीच तोंडाला पाने पुसणारी आहे, असे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले.

131
राज्यात पंधरा दिवसांच्या संचारबंदीच्या नावाखाली प्रत्यक्षात लॉकडाऊन लागू करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गरीब गरजू वर्गाला मदत केल्याचा आव आणला असला तरी प्रत्यक्षात अत्यंत तुटपुंजी तरतूद करून जनतेच्या तोंडाला पाने पुसली आहेत, अशी तीव्र प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.

अवघ्या दीड हजार रुपयांची घोषणा!

चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज्यात निर्बंधांची घोषणा करताना मुख्यमंत्र्यांनी सामान्य जनतेला मोठी मदत केल्याचे दाखवत शब्दांचे खेळ केले, पण त्यांनी केलेल्या घोषणा फसव्या आहेत. अन्न सुरक्षा योजनेत ज्या गरीब कुटुंबांना स्वस्तात धान्य मिळते त्यांना दर महिना प्रति कुटुंब केवळ १०५ रुपये त्यासाठी खर्च करावे लागतात. राज्य सरकारने या कुटुंबांना महिनाभरासाठी मोफत धान्य देण्याची घोषणा केली, तरी प्रत्यक्षात प्रती कुटुंब १०५ रुपयांचाच भार सोसलेला आहे. रिक्षाचालक साधारणपणे दरमहा सरासरी दहा हजार रुपये कमावत असताना त्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी अवघ्या दीड हजार रुपयांची घोषणाही अशीच तोंडाला पाने पुसणारी आहे. एकूणच हातावर पोट असणाऱ्यांना मदत करण्यासाठीच्या घोषणा फसव्या आहे.

व्यापाऱ्यांचे काय?

त्यांनी सांगितले की, सर्व काळजी घेऊन शक्य ते उद्योगधंदे चालू ठेवण्यास परवानगी देत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. परंतु, त्यांनी व्यापाराविषयी काहीही उल्लेख केला नाही. राज्यात अत्यावश्यक सेवा वगळता सर्वकाही बंद ठेवण्याचा आदेश असल्याने त्याचा जबरदस्त फटका व्यापाऱ्यांना बसणार आहे. खरे तर पुरेशी काळजी घेऊन व्यापाऱ्यांना काम करण्याची परवानगी द्यायला हवी होती. केवळ निर्बंध लादायचे आणि फारशी मदतही करायची नाही या महाविकास आघाडी सरकारच्या धोरणामुळे कुटुंबे उध्वस्त होण्याची भीती आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.