राज्यात वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे आरोग्य व्यवस्थेवर कमालीचा ताण वाढला आहे. त्यामुळे देशभरातील देवस्थान मदतीला धावून आले आहेत. श्री साईबाबा शिर्डी संस्थान ऑक्सिजन प्लांट आणि आरटीपीसीआर चाचणीची लॅब उभारणार आहे. श्री तुळजाभवानी मंदिर ट्रस्टने ३०० खाटांचे कोविड सेंटर उभारण्यास घेतले आहे. श्री गजानन महाराज संस्थानने ५०० खाटांचे कोविड सेंटर उभारले आहे. आता अष्टविनायकापैकी एक तीर्थक्षेत्र असलेले श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टने कोविड सेंटर कोविड उभारले आहे. तसेच गुजरातमधील वडोदरा येथील स्वामी नारायण मंदिर ट्रस्ट यांनी मंदिराचेच कोविड सेंटरमध्ये रूपांतर केले आहे.
आतापर्यंत ४,७५३ रुग्णांवर उपचार!
२२ मे २०२० रोजी श्री लेण्याद्री गणपती देवस्थानचे उत्तर पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठे असलेले यात्रीनिवास ज्यामध्ये पंचवीस हजार चौरस फुटाचा सभामंडप, ६४ रूम व इतर दोन छोटे हॉल हे देवस्थानच्या विश्वस्त मंडळाने सर्वप्रथम शासनास विनामोबदला उपलब्ध करून दिले. श्री लेण्याद्रीच्या गिरिजात्मकाच्या पायथ्याशी असलेल्या कोविड सेंटरमध्ये २२ मे २०२० पासून आजतागायत ४,७५३ रुग्णांची नोंद झाली पैकी ४८६ रुग्ण पुढील उपचारासाठी शहरात पाठवण्यात आले. १,१२८ रुग्ण घरी बरे झाले, तर २,६८८ रुग्ण लेण्याद्री कोविड सेंटरमधून बरे होऊन सुखरूप घरी गेले. लेण्याद्री कोविड सेंटरमध्ये एका वेळेस ३५० रुग्ण राहू शकतील एवढी व्यवस्था केलेली आहे.
(हेही वाचा : कोरोनाकाळात देवस्थानांची होतेय ‘कृपा’! )
संपूर्ण मोफत उपचार!
कुठल्याही रुग्णाकडून एकही रुपया न घेता या ठिकाणी त्याला दाखल केले जाते, औषधे दिली जातात, ऑक्सिजन, पल्स, तापमान, शुगर दिवसातून तीन वेळा तपासली जाते. चहा, दूध, नाश्ता व दोन वेळेचे जेवण देखील दिले जाते. या यात्रीनिवास भाग दोनमधून देवस्थानला मिळणाऱ्या उत्पन्नाची पर्वा न करता तसेच कोरोना संपल्यानंतर हे सेंटर बंद झाल्यावर या भक्त निवासासाठी सुमारे एक कोटी रुपये दुरुस्तीसाठी खर्च येणार आहे. या सर्वांची परवा न करता विश्वस्त मंडळाने सामाजिक जाणीवेतून ही इमारत शासनास दिली आहे. त्यामुळे सर्व विश्वस्त मंडळ व जे शासकीय अधिकारी या कोविड सेंटरचे व्यवस्थापन व नियोजन करत आहेत, असे श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्ट, गोळेगावचे सचिव जितेंद्र बिडवई म्हणाले.
श्री स्वामीनारायण मंदिराचे कोविड रुग्णालयात रूपांतर!
श्री स्वामीनारायण मंदिर, वडोदरा यांनी १३ एप्रिलपासून ५०० खाटांचे कोविड रुग्णालय उभे केले आहे. याठिकाणी आधीच लिक्विड ऑक्सिजनची टाकी बसवण्यात आली असून पाईपने ऑक्सिजनचा पुरवठा होतो. काही दिवसांत येथे आयसीयू बेड आणि व्हेंटिलेटर बेड निर्माण करण्यात येणार आहे.
येथील यज्ञपुरुष सभागृहाचेही कोविड रुग्णालयात रूपांतर करण्यात आले आहे. याठिकाणी संत स्वतः रुग्णालयात फिरून रुग्णांची चौकशी करतात आणि त्यांच्यात सकारात्मकता वाढवतात.
Join Our WhatsApp Community