लाखो बांधकाम कामगारांना कोट्यावधींचा रुपयांचा निधी वितरित

एकूण १ लाख ५ हजार ५०० घरेलू कामगारांना प्रत्येकी दीड हजार रुपयांप्रमाणे, एकूण १५ कोटी ८२ लाख ५० हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

122

कोविडच्या दुसऱ्या लाटेच्या प्रार्दुभावामुळे राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. या काळात महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांना आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला. या निर्णयानुसार महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणी व नूतनीकरण झालेल्या घरेलू कामगारांसाठी पहिल्या टप्प्यात सक्रिय व जीवित नोंदणी असलेल्या एकूण १ लाख ५ हजार ५०० घरेलू कामगारांना प्रत्येकी दीड हजार रुपयांप्रमाणे, एकूण १५ कोटी ८२ लाख ५० हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे, अशी माहिती कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

घरेलू कामगारांना मोठा दिलासा

महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणी व नूतनीकरण झालेल्या १ लाख ५ हजार ५०० घरेलू कामगारांच्या बँक खात्यामध्ये थेट (डीबीटी)द्वारे प्रत्येकी दीड हजार रुपये वितरित करण्याची कार्यवाही विकास आयुक्त (असंघटित कामगार) यांच्या स्तरावरुन लवकरच करण्यात येत आहे. घरेलू कामगारांच्या खात्यात शासनातर्फे मिळणारा हा निधी थेट जमा होणार असल्याने, घरेलू कामगारांना मोठा दिलासा मिळणार असल्याचेही कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. 

(हेही वाचाः काँग्रेसनंतर आता राष्ट्रवादीचीही मदत! मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार 2 कोटी)

बांधकाम कामगारांना अर्थसहाय्य

घरेलू कामगारांप्रमाणेच राज्यातील नोंदीत सक्रिय १३ लाख बांधकाम कामगारांना महाराष्ट्र इमारत व  इतर बांधकाम कल्याणकारी मंडळांमार्फत दीड हजार रुपयांचे अर्थसहाय्य थेट त्यांच्या बॅंक खात्यामध्ये जमा करण्याची कार्यवाही सुरू आहे. राज्यातील १३ लाख बांधकाम कामगारांपैकी ९ लाख १७ हजार नोंदणीकृत बांधकाम कामगारांना अर्थसहाय्य करण्यात आले आहे. त्याशिवाय गेल्या वर्षीही या बांधकाम कामगारांना प्रत्येकी ५ हजार रुपयांची मदत करण्यात आली होती, असेही कामगार मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.