सध्या भाजप हा देशातील सगळ्यात मोठा पक्ष म्हणून नावारुपाला आला आहे. 2014 पासून आतापर्यंत विरोधकांनी अनेक आरोप करुन सुद्धा, मोदी लाटेपुढे त्यांचा काही निभाव लागला नाही. पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांचे निकाल नुकतेच जाहीर झाले. जरी बंगालमध्ये तृणमूलचे ‘खेला होबे’ झाले असले, तरी भाजपनेही शून्यावरुन ७७ जागांची मुसंडी मारत बंगालमध्ये आपला ‘विकास होबे’ केला. भाजपची सध्याची ही जी लाट देशात आहे, त्यामागे भाजप नेते व कार्यकर्त्यांचा संघर्ष आणि चिकाटी आहे. या नेत्यांपैकीच एक महत्त्वाचं नाव म्हणजे प्रमोद महाजन. केवळ केंद्रातच नाही तर राज्यातही युतीच्या मंदिराचा भक्कम खांब म्हणून, महाजन यांची ख्याती सर्वश्रुत आहे. पण हा खांब ढासळला आणि जे घडायला नको होतं, ते घडलं. त्यामुळेच आज महाजन आणि बाळासाहेब ठाकरे असते, तर राज्यातील युतीचं चित्रं वेगळं असतं, अशी एक चर्चा सध्या ऐकायला मिळत आहे.
देश पातळीवर महाजनांचा दबदबा
केंद्रात भाजपचा एक बुलंद आवाज म्हणून प्रमोद महाजन यांची ओळख होती. त्यांचं वक्तृत्त्व, राजकीय अभ्यास, सामाजिक भान, माणसं जोडण्याची कला, या सगळ्या गोष्टींमुळे हे मराठवाड्याचं रत्न तेव्हा देशभर झळाळत होतं. माजी पंतप्रधान आणि संपूर्ण देशाला पूजनीय असणारे अटलबिहारी वाजपेयी यांच्या किचन कॅबिनेटमधील(अत्यंत जवळचे) नेते म्हणून प्रमोद महाजन ओळखले जात. याचमुळे आपल्या राजकीय कारकीर्दीतून संन्यास घेताना, भाजपची धुरा लालकृष्ण अडवाणी आणि प्रमोद महाजन राम-लक्ष्मणाप्रमाणे समर्थपणे सांभाळतील, अशी घोषणा वाजपेयींनी केली होती. आता अशाप्रकारे देश पातळीवर आपला दबदबा निर्माण करणा-या प्रमोद महाजन यांचा महाराष्ट्रात भाजपची पायाभरणी करण्यातही सिंहाचा वाटा आहे.
माणसं जोडण्याची उत्तम कला
असं म्हणतात की,
“विजेते वेगळं काहीच करत नाहीत, तर जे काही करतात ते वेगळेपणानं करतात.”
हाच वेगळेपणा महाजनांच्या व्यक्तिमत्त्वाचा स्थायिभाव होता. माणसं जोडणं एकवेळ सोपं असेल, पण ती टिकवणं फार अवघड असतं. हेच अवघड काम आपल्याजवळ असणा-या मनमोकळ्या स्वभावाने महाजनांनी एकदम सोपं केलं. संघ स्वयंसेवक म्हणून भाजपचे कार्य करण्याची संधी जेव्हा महाजनांना मिळाली, तेव्हा केंद्रात फक्त भाजपचे दोन खासदार होते. पण तरीही हे पक्षाचे अपयश न मानता, वीस वर्षांत देशात आपली सत्ता असेल, असा आत्मविश्वास त्यांनी प्रकट केला. आणि त्यांचा तो विश्वास आज सार्थ ठरत आहे.
रथयात्रेचे खरे ‘सारथी’
90च्या दशकात भारतीय जनता पक्षाने आपला हिंदुत्वाचा मुद्दा चांगलाच उचलून धरला. रामजन्मभूमीच्या मुद्द्यावरुन देशभरातील हिंदूंना एका छताखाली आणण्याचं काम अडवाणींच्या रथयात्रेने केलं. पण या रथाचे खरे ‘सारथी’ होते, प्रमोद महाजन. या रथामुळेच कुठेतरी महाराष्ट्रातही भाजपची सत्तेच्या दिशेने घोडदौड सुरू झाली.
युतीचे दोन आधारस्तंभ
त्यावेळी महाराष्ट्रात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा झंझावात सुरू होता. मराठी माणसाच्या मनात आपल्या मराठी बाण्याची आणि अस्मितेची धगधगती मशाल जर कोणी पेटवली असेल, तर ती बाळासाहेबांनीच. समविचारी असल्यामुळेच बाळासाहेब आणि महाजन यांच्यात सलोखा वाढला. यातूनच पुढे हिंदुत्त्व आणि मराठी शक्ती राज्यात एकवटली आणि युतीच्या रामराज्याचा सेतू सांधला गेला. हे युतीचं मंदिर ढासळतंय की काय, अशी शंका निर्माण करणारी अनेक वादळं त्यावेळीही आली, पण बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन या दोन भक्कम आधारस्तंभांवर उभ्या असलेल्या या मंदिरात वादळी चक्राला परतावून लावण्याची ताकद होती.
आता युती तुटणार अशी चर्चा सुरू झाली रे झाली की, महाजनांचा एक फोन मातोश्रीवर जायचा, महाजन बाळासाहेबांना भेटण्यासाठी जायचे आणि त्या भेटीनंतर सर्व काही आलबेल व्हायचं. कारण कुठेतरी हिंदू आणि मराठी अस्मितेची या युतीच्या मंदिराच्या गाभा-यात पूजा बांधली जायची. पण महाजन आणि बाळासाहेब यांच्या जाण्याने आता ही जनतेच्या अस्मितेची लढाई न राहता, पक्षीय सामर्थ्याची आणि प्रतिष्ठेची लढाई झाली आणि त्यामुळेच युतीचं हे मंदिर कोसळलं. आज ना महाजनांसारखा नेता भाजपमध्ये आहे आणि ना ही बाळासाहेबांची पूर्वीची शिवसेना अस्तित्त्वात आहे…
Join Our WhatsApp Community