मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल(बीकेसी) येथील कोविड आरोग्य केंद्र (जम्बो कोविड सेंटर) संरचनेला तौक्ते चक्रीवादळाच्या प्रभावाने वाहणा-या वादळी वा-यांमुळे कोणतेही नुकसान पोहोचलेले नाही. या कोविड केंद्राची मुख्य संरचना स्थिर आहे. येथील वेटिंग रुमच्या छताला वादळामुळे हानी पोहोचू नये, म्हणून प्रशासनाने स्वतःच ते काढून ठेवले आहे. वादळ व पाऊस ओसरताच बीकेसी कोविड सेंटरमध्ये स्वच्छतेसह वेटिंग रुम पूर्ववत उभारण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.
महापालिका प्रशासनाची खबरदारी
तौक्ते चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मुंबईत ताशी सुमारे ८० किलोमीटर वेगाने वारे वाहून मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज महापालिकेला होता. त्यामुळे दक्षता घेऊन, खबरदारीचा उपाय म्हणून महापालिका प्रशासनाने या कोविड केंद्रातील २४३ कोविडबाधित रुग्णांना शनिवारी १५ मे रोजी रात्रीच इतर रुग्णालयांमध्ये सुरक्षितपणे स्थलांतरित केले आहे. महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या निर्देशानुसार अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य ती सर्व कार्यवाही करण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community