तौक्ते चक्रीवादळाने राज्यात पाडले साडेपाच हजार विजेचे खांब

या चक्रीवादळामुळे राज्यातील जवळपास 46 लाख 41 हजार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला, तर 34 लाख 14 हजार ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.

106

‘तौक्ते’ चक्रीवादळाने व मुसळधार पावसामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर, कोल्हापूर, पुणे व राज्यातील इतर जिल्ह्यांतील 10 हजार 752 गावांतील वीज यंत्रणेचे नुकसान झाले आहे. राज्यात जवळपास साडेपाच हजार विजेचे खांब पडले असून, तारा तुटून जोरदार वारा व मुसळधार पावसाने फिडर ट्रिप झाले आहेत. राज्यात एकूण 1 हजार 546 उच्चदाब पोल वादळामुळे पडले. त्यापैकी 425 पोल पूर्ववत व दुरुस्त करण्यात आले आहेत. राज्यात एकूण 3 हजार 940 लघुदाब पोल वादळामुळे पडले, त्यापैकी 974 पोल पूर्ववत व दुरुस्त करण्यात आले आहेत. वादळ व पावसामुळे राज्यात 93 हजार 935 रोहित्रांमध्ये बिघाड झाला होता, त्यापैकी 68 हजार 426 दुरुस्त करण्यात आले आहेत.

नियंत्रण कक्षांची उभारणी

चक्रीवादळाची शक्यता लक्षात घेऊन ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी एक कृती आराखडा तयार करुन, विविध ठिकाणी नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचे निर्देश दिले होते. तसेच अधिकाधिक मनुष्यबळ या कामी लावण्याचे व लागणारी पुरेशी सामुग्री उपलब्ध करुन देण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार कोल्हापूर, पालघर, पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे आदींसाठी 24 तास कार्यरत असणारे नियंत्रण कक्ष वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली सध्या कार्यरत आहेत. तसेच विभाग स्तरावर 46 नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.

(हेही वाचाः अजून ८५ जण बेपत्ता! नौदलाचे शर्थीचे प्रयत्न सुरूच! )

13 हजार तंत्रज्ञांचे अहोरात्र काम सुरू

नुकसानाची व्याप्ती बघता सुमारे 622 रोहित्रे, सुमारे 350 किमी लांबीचे केबल, तसेच साडे तीन हजार किमी इतक्या लांबीच्या वायर्स व 20 हजार 500 खांब उपलब्ध करुन दिलेले आहेत. नुकसानग्रस्त भागातील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरण कंपनीने 13 हजार तंत्रज्ञांची मोठी फळी मैदानात उतरवली आहे. ज्यामध्ये स्वतःचे 9 हजारहून अधिक तसेच कंत्राटी पध्दतीवर कार्यरत 4 हजारहून अधिक इतके मनुष्यबळ सध्या वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी जीवाची पर्वा न करता कार्यरत आहे. हे काम करताना पाऊस, सोसाट्याचा वारा, उन्मळून पडलेली झाडे, बिघाड असलेली दूरसंचार यंत्रणा, खराब झालेले रस्ते या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच या कामासाठी 200 हून अधिक लहान मोठे ट्रक्स, सुमारे 50 क्रेन्स व जेसीबी मशीन आणि सर्व उपकरणांनी सज्ज अशा 200 चमू या कामासाठी अहोरात्र कार्यरत आहेत.

46 लाख ग्राहकांवर परिणाम

  • या चक्रीवादळामुळे राज्यातील जवळपास 46 लाख 41 हजार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला, तर 34 लाख 14 हजार ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.
  • चक्रीवादळाचा सगळ्यात मोठा फटका ठाणे जिल्ह्याला बसला असून, यामुळे 7 लाख 85 हजार 519  ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यापैकी आतापर्यंत जवळपास 5 लाख 50 हजार ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात यश मिळाले आहे.
  • दुसरा मोठा फटका रायगड जिल्ह्याला बसला असून, यामुळे 7 लाख 73 हजार 760 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता, तर जवळपास 5 लाख 10 हजार ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत झाला आहे.
  • पालघर- 5 लाख 88 हजार 743 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित, 2 लाख 44 हजार ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत झाला आहे
  • रत्नागिरी- 5 लाख 45 हजार 121 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता, 4 लाख 18 हजार 360 ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत.
  • सिंधुदुर्ग- 3 लाख 66 हजार 11 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला व जवळपास 67 हजार 166 ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात यश मिळाले.
  • नाशिक- 3 लाख 29 हजार 304 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित, तर 2 लाख 72 हजार ग्राहकांचा वीज पुरवठा पूर्ववत.
  • कोल्हापूर- 2 लाख 96 हजार 965 हजार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित, तर 2 लाख 49 हजार 601 ग्राहकांचा वीज पुरवठा पूर्ववत.

(हेही वाचाः मोंदीच्या गुजरात भेटीवरुन महाराष्ट्रात राजकीय ‘वादळा’ला जोर! संजय राऊत म्हणाले…)

  • सातारा- 4 लाख 36 हजार 768 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित, तर 4 लाख 8 हजार 89 ग्राहकांचा वीज पुरवठा पूर्ववत.
  • पुणे- 1 लाख 66 हजार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता, त्यापैकी 1 लाख 48 हजार 112 ग्राहकांचा वीज पुरवठा पूर्ववत.
  • सांगली- 1 लाख 55 हजार 543 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित, तर 1 लाख 53 हजार 715 ग्राहकांचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे.
  • विदर्भात एकूण 53 हजार 392 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता, तर जवळपास 50 हजार  ग्राहकांचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे.
  • मराठवाड्यात 1 लाख 5 हजार 142 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता, तर 1 लाख 3 हजार 924 ग्राहकांचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.