सेव्हन हिल्स रुग्णालयात (Seven Hills Hospital) मोफत वैद्यकीय सेवा देण्याऐवजी महापालिकेच्यावतीने परवडणाऱ्या दरात वैद्यकीय उपचार देण्यात यावेत अशी जोरदार मागणी होत असतानाच आता या रुग्णालयावर अनेक संस्थांच्या नजरा लागून आहेत. सेव्हन हिल्स रुग्णालयाची (Seven Hills Hospital) कोविड स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणून ओळख निर्माण झाली असून कोविड नंतर हे रुग्णालय महापालिकेच्या माध्यमातून चालवले जात आहे. त्यामुळे या प्रशस्त आणि आलिशान अशा सेव्हन हिल्स रुग्णालयावर विविध संस्थाच्या नजरा खिळल्या असून हे रुग्णालय खाजगी सहभाग तत्वावर अर्थात पीपीपी वर चालवण्यास मिळावे यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
(हेही वाचा –Mumbai Metro : मुंबईतील ‘या’ मेट्रोमुळे ७ लाख वाहने गायब होणार )
असे ताब्यात आले सेव्हन हिल्स रुग्णालय
मरोळ येथील महापालिका रुग्णालयाच्या इमारतीसह भूभाग सेव्हन हिल्स हॉस्पिटल (Seven Hills Hospital) लिमिटेड व सोमा इंटरनॅशनल या संयुक्त भागीदारीतील कंपनीला २००४ मध्ये देण्यात आला होता. त्यानंतर २० जानेवारी २००५ मध्ये जागेचा करार करण्यात आला आणि त्यानंतर १३ डिसेंबर २०१३ मध्ये महापालिकेसोबत केलेला सामंजस्य करार करण्यात आला होता. त्यानुसार महापालिकेच्या अटी व शर्तीनुसार सेव्हन हिल्स रुग्णालय सुरु होते. परंतु सामजस्य करारातील अटींचा भंग केल्याने तसेच नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याने, या रुग्णालयाच्या व्यवस्थापनाला महापालिकेने २४ जानेवारी २०१८ रोजी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यानंतर न्यायालयीन वादात या रुग्णालयाचा ताबा महापालिकेकडे आला असला तरी आजही याबाबत लढा सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. तत्कालीन अतिरिक्त आयुक्त डॉ अश्विनी जोशी यांच्या प्रयत्नाने न्यायालयात योग्य बाजू मांडल्याने हे रुग्णालय महापालिकेला कोविड काळात ताब्यात घेणे शक्य झाले.
हेही पहा –
संस्थांची जोरदार फिल्डिंग
दरम्यान कोविड काळात तात्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या शिफारशीनुसार सेव्हन रुग्णलयात १५० खाटांची आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. याठिकाणी आयसीयू वॉर्ड डॉक्टरसह त्यांनी उपलब्ध करून दिले. मात्र ही वैद्यकीय सुविधा देताना रिलायन्सने अप्रत्यक्ष रुग्णलयात शिरकाव करून भविष्यात हे रुग्णालय चालवण्यास घेण्याचा विचार केला होता. त्यामुळे कोविड नंतर आजही रिलायन्सचा (Seven Hills Hospital) ताब्यात हे वॉर्ड असून आजही रिलायन्सचे नाव यावर झळकत आहे. त्यामुळे सेव्हन हिल्स ऐवजी या रुग्णालयाचे नाव रिलायन्स असा उल्लेख महापालिकेच्या प्रसिद्धी पत्रकात झाला होता. त्यामुळे ठाकरे सरकारच्या काळात रिलायन्स ने हे रुग्णालय चालवण्यास घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर आता राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या परिचित संस्थेनेही हे रुग्णालय पीपीपी तत्वावर चालवण्यास मिळावे यासाठी जोरदार फिल्डिंग लावली असल्याची माहिती मिळत आहे.
कर्करोग व मल्टीस्पेशालिटी रुग्णालय बनवा, भाजपची मागणी
अंधेरी मरोळमधील सेव्हन हिल्स रुग्णालयाची (Seven Hills Hospital) वास्तू पूर्णत: बांधून तयार आहे, तसेच यासाठी लागणारे मनुष्यबळही उपलब्ध असल्याने या रुग्णालयाचे रुपांतर कर्करोग व मल्टीस्पेशालिटी रुग्णालयामध्ये करण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे. प्रशासनाने त्याप्रमाणे निर्णय घेत कार्यवाही करावी आणि जनतेला आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी भाजपचे माजी नगरसेवक अभिजित सामंत यांनी केली होती.
मोफत ऐवजी परवडणाऱ्या दरात सेवा द्या
महापालिकेच्या अर्थसंकल्प बाबत मागवलेल्या सूचनांमध्येही सेव्हन हिल्स रुग्णालयात (Seven Hills Hospital) मोफत वैद्यकीय सेवा देण्याऐवजी महापालिकेच्यावतीने परवडणाऱ्या दरात वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देत मध्यमवर्गीय लोकांसाठी याठिकाणी वैद्यकीय सुविधा देण्यात यावी अशी मागणी केली होती.ज्या मध्यमवर्गीयांना महापालिका रुग्णालयात उपचार करण्यास जाण्यासाठी भीती वाटते आणि जे रुग्ण तथा त्याचे त्यांचे नातेवाईक खासगी रुग्णालयाकडे वळतात, त्यांना सेव्हन हिल्समध्ये अत्याधुनिक दर्जाचे वैद्यकीय उपचार घेता येतील आणि मोफत सेवा नसल्याने सेव्हन हिल्समध्येही गर्दी वाढणार नाही, असे या सुचनामध्ये नमूद केले होते.
तरच सेव्हन हिल्स रुग्णालयाचा दर्जा राखता येईल
सेव्हेन हिल्स रुग्णालयाची (Seven Hills Hospital) वास्तू आणि त्यासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ उपलब्ध असून या वास्तूची दैनंदिन देखभाल आणि कर्मचारी आदींचा खर्च पाहता मुंबई महापालिकेला या ठिकाणी मोफत उपचार देणे शक्य होणार नाही. त्यामुळे किमान या ठिकाणी परवडणाऱ्या दरात रुग्णांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिल्यास या रुग्णालयाची दैनंदिन देखभाल आणि त्या रुग्णालयाचा दर्जा कायम राखण्यात महापालिकेला मदत होईल. गरीब रुग्णांना केईएम, शीव, नायरसह इतर उपनगरीय रुग्णालयात रुग्ण मोफत उपचारासाठी जाऊ शकतात. परंतु मध्यमवर्गीय रुग्णांना अति महागड्या मोठ्या रुग्णालयात जाणं परवडत नसल्याने त्यांना परवडणाऱ्या दरात वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणाऱ्या रुग्णालयाची नितांत गरज आहे. आणि ही गरज सेवन हिल्स रुग्णालयाच्या माध्यमातून मुंबई महापालिका पूर्ण करू शकेल असे काही महापालिका अधिकाऱ्यांचेही म्हणणे आहे.
Join Our WhatsApp Community