बारसूतील रिफानरी प्रकल्पाविरोधात आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतला असून शुक्रवारी, २८ एप्रिल रोजी त्यांनी सर्वेक्षणाच्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पोलिसांनी त्यांना अडवले. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाल्याचेही पाहायला मिळाले. दरम्यान, यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. स्थानिकांच्या संमतीशिवाय हा प्रकल्प पुढे नेणार नसल्याचे ते म्हणाले. तसेच प्रकल्पाला ७० टक्के पेक्षा जास्त लोकांचे समर्थन आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
राजापूर तालुक्यातील बारसू येथे प्रस्तावित रिफायनरीच्या विरोधात आंदोलकांनी मोर्चा काढण्याची तयारी करणारे खासदार विनायक राऊत यांच्यासह ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. बारसूनजीक रानतळे येथे ही कारवाई करण्यात आली.
(हेही वाचा Barsu Refinery : बारसू रिफायनरीवरून ठाकरे-पवारांमध्ये मतभेद? राजकीय चर्चांना उधाण! काय म्हणाले संजय राऊत?)
प्रकल्पामध्ये आडकाठी आणण्याचा प्रयत्न – उदय सामंत
हा तणाव का निर्माण झाला आहे, याच्या खोलाशी जाणे गरजेचे आहे. विद्यमान खासदारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. शेतकऱ्यांसोबत मुख्यमंत्री आहे. स्वत: पत्र देऊन एक्स्पोज झाल्याने काही करुन या प्रकल्पामध्ये आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बोलताना दिली. लोकांची डोकी भडकावण्याचे काम सुरु आहे. बाहेरचे लोक आंदोलनात सहभागी झाली आहेत. आंदोलकांचे काहीही म्हणणे असले तरी सरकार चर्चेसाठी तयार आहे, असेही उदय सामंत यांनी म्हटले.
Join Our WhatsApp Community