राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील NCP नेत्यांना एकीकडे मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने पडू लागली असतानाच, दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष बदलाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. जयंत पाटील हे तब्बल पाच वर्षे या पदावर आहेत. काही नेते वर्षानुवर्षे एकाच पदाला चिकटून असल्यामुळे इतरांना संधी मिळत नसल्याची तक्रार अनेकजण करू लागले आहेत. पक्षांतर्गत सुरू असलेल्या या कुरबुरींनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर नाराजीचे स्वरूप धारण करू नये, यासाठी शरद पवार स्वतः सक्रिय झाले असून, त्यांनी ‘भाकरी फिरवण्या’चा निर्णय घेतल्याचे कळते.
राष्ट्रवादीत NCP प्रदेशाध्यक्ष पदासाठी अनेकजण इच्छुक आहेत. परंतु, अजित पवार यांची पक्षावरील पकड पाहता, त्यांच्या गटातील नेत्यालाच यावेळी संधी मिळेल, असे चित्र आहे. सध्या राजेश टोपे, धनंजय मुंडे आणि शशिकांत शिंदे यांची नावे प्रदेशाध्यक्ष पदासाठी चर्चेत आहेत. त्यात राजेश टोपे यांचे पारडे जड मानले जात आहे. आरोग्यमंत्री म्हणून कोरोनाकाळ त्यांनी केलेले काम राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहे. त्यामुळे त्यांना संधी दिल्यास ते सर्वमान्य नेतृत्त्व म्हणून पुढे येऊ शकतात.
(हेही वाचा Barsu Refinery : बारसू रिफायनरीवरून ठाकरे-पवारांमध्ये मतभेद? राजकीय चर्चांना उधाण! काय म्हणाले संजय राऊत?)
धनंजय मुंडे यांना देखील तरुण नेतृत्व म्हणून राष्ट्रवादीत NCP मोठा मान आहे. विधिमंडळ सभागृहात, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचार सभांमध्ये धडाडणारी तोफ म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळे त्यांचाही विचार केला जाऊ शकतो, असे कळते. शशिकांत शिंदे यांच्या नावाची चर्चा पाच वर्षांपूर्वी जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष झाले त्यावेळी सुद्धा होती. मात्र, काही कारणाने त्यांचे नाव मागे पडले. पश्चिम महाराष्ट्रातील चेहरा म्हणून त्यांचा नावाचा विचार होऊ शकतो, असे राष्ट्रवादीतील काहींचे म्हणणे आहे.
Join Our WhatsApp Community