बेस्ट उपक्रमाच्या BEST Bus कर्मचाऱ्यांना बसचा प्रवास मोफत असून या सुविधेचा लाभ खासगी तत्वावर बस सेवा पुरवणाऱ्या संस्थांचे कर्मचारी घेत आहेत. त्यामुळे खासगी संस्थांचे सुमारे ७ हजार कर्मचारी असून त्यांच्याकडून मोफत बस सेवेचा लाभ घेतला जात असल्याने याला लगाम घालण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला आहे. यापुढे खासगी संस्थेच्या कर्मचाऱ्यांना ६५० रुपयांचा मासिक पास मोबाईल अँप द्वारे काढण्याची सुविधा दिली असून ही रक्कम खासगी कंपनीला देण्यात येणाऱ्या रकमेतून प्रति ६५० रुपये कापून घेतले जाणार आहेत. त्यामुळे आता बेस्टला या मासिक पास विक्रीतून महसूल मिळणार असून मोबाईल अँपवरील ग्राहकांच्या संख्येत वाढ होणार आहे.
बेस्ट उपक्रमाने BEST Bus प्रवासभाडे आकारणीच्या पध्दतीचे संपूर्णतः संगणकीकरण केलेले असून २१ डिसेंबर २०२१ पासून ‘बेस्ट चलो अॅप’ आणि ‘बेस्ट चलो स्मार्टकार्डच्या माध्यमातून तिकीट तसेच बसपास वितरणासाठी संगणकीय प्रणाली विकसित केलेली आहे. या प्रणालीअंतर्गत प्रवाशांप्रमाणेच बेस्ट उपक्रमाच्या सेवकवर्ग सदस्यांना देखील उपक्रमाच्या बसगाड्यांमधून प्रवास करताना ‘बेस्ट चलो मोबाईल अॅप’ च्या माध्यमातून बेस्ट कर्मचाऱ्यांना ‘सेवकवर्ग सदस्य बसपास उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे.
परंतु बेस्ट उपक्रमामध्ये BEST Bus सद्यस्थितीत खाजगी बस पुरवठादार आदींच्या माध्यमातून बस सेवा पुरवली जाते. या भाडेतत्वावरील बसगाड्या पुरवणाऱ्या संस्थांचे कर्मचारी उपक्रमाच्या कर्मचा-यांप्रमाणेच बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्यांमधून प्रवास करतात. सर्वच, बेस्ट उपक्रमाच्या कर्मचा-यांप्रमाणेच बस पुरवठाकार व्यवसाय संस्थांकडे कार्यरत असलेल्या कर्मचा-यांनाही ‘मोबाईल अॅप’च्या माध्यमातून बसपास उपलब्ध करुन देण्याचा निर्णय उपक्रमाने घेतला आहे.
बेस्ट बस BEST Bus पुरवठादार व्यवसाय संस्थांच्या कर्मचा-यांना ‘बेस्ट चलो अॅपच्या माध्यमातून मासिक बसपासची सुविधा उपलब्ध करून देत प्रतिदिन २५ रुपये आणि एकूण २६ दिवसांचा प्रवास कालावधी विचारात घेऊन ६५० रुपये मासिक बसपास निश्चित करण्यात आलेला आहे. बस पुरवठाकार व्यवसाय संस्थांच्या एकूण कर्मचा-यांची यादी बेस्ट उपक्रमाकडून मागविण्यात आली आहे. या यादीतील कर्मचारी आणि भविष्य निर्वाह निधी अंतर्गत असलेल्या कर्मचा- यांची ही यादी असून प्रत्येक महिन्याला संबंधित बस पुरवठाकार कंपनीच्या ३० टक्के देयकामधून प्रत्येकी ६५० रुपये प्रमाणे कर्मचा-यांच्या बसपासकरिताची एकूण रक्कम वजा करण्यात येईल. तसेच ज्यांच्याकडे भ्रमणध्वनी नाही, अशा कर्मचा-यांना ‘बेस्ट चलो स्मार्टकार्ड’ घ्यावे लागेल व त्या स्मार्टकार्डची किंमतही देयकामधून वजा करण्यात येईल,असे बेस्ट उपक्रमाने म्हटले आहे. सध्या पाच बस सेवा कंपनीकडून १५८० बसची सेवा घेतली जाते. या सर्व कंपन्यांकडे सध्या ७ हजार १३८ एवढे कर्मचारी आहे.
Join Our WhatsApp Community